अमेरिकेतील अ‍ॅटलांटा सिटीमध्ये झालेल्या सौंदर्यस्पर्धेत भारतीय वंशाची एक तरुणी विजेती ठरली आणि त्याच दिवशी वॉशिंग्टनमधील नौदलाच्या तळामध्ये एका कृष्णवंशीय अमेरिकी नागरिकाने गोळीबार करून १३ जणांचा बळी घेतला. वरवर पाहता या दोन घटनांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. एक घटना जीवनातील तारुण्य आणि सौंदर्याशी निगडित आहे. दुसरी क्रौर्याशी. परंतु दोन्हींत एक समान धागा आहे. माथेफिरूपणाचा, हिंसेचा. भारतीय वंशाच्या तरुणीने मिस अमेरिका हा किताब जिंकल्यानंतर स्वत:स भूमिपुत्र मानत असलेल्या गोऱ्या लोकांकडून ज्या वंशवादी प्रतिक्रिया आल्या, त्या कोणत्याही आधुनिक समाजास अशोभनीय अशाच होत्या. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोणी तिला अरब म्हटले, तर कोणी मिस टेररिस्ट. अमेरिकी समाज हा आत्ममग्नांचा समाज असल्याचे म्हटले जाते. पण ही आत्ममग्नता त्यांना सामान्य भूगोलाच्या अज्ञानापर्यंतही नेत असेल असे कोणास वाटले नव्हते. ते या घटनेने सिद्ध केले. प्रसारमाध्यमे, इंटरनेट आदी साधनांची मुबलकता आणि सर्वव्यापकता असलेल्या समाजातील एक वर्ग, जे गोरे आणि थेट काळे नाहीत, ते सर्व दहशतवादी असे मानत असेल, तर त्या देशाला आपल्या शिक्षण आणि मूल्यव्यवस्थेचा नव्याने विचार करणे खरोखरच गरजेचे आहे. अमेरिकेतील सध्याची आर्थिक स्थिती ही अशा वंशवादी विचारसरणीस पोषक अशीच आहे. अमेरिकेतील एक टक्के श्रीमंत आणि बाकीचे ९९ टक्के यांच्या उत्पन्नात आज कधी नव्हे एवढी असमानता असून, दोनांतील एक अमेरिकी व्यक्ती एक तर गरीब आहे किंवा निम्नउत्पन्न गटातील आहे. रोजगाराची अवस्था आज जवळजवळ १९३०च्या महामंदीसारखी आहे. अशा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत तथाकथित भूमिपुत्रांमध्ये वांशिक-धार्मिक-जातीय-भाषिक श्रेष्ठत्वाची भावना निर्माण करणे सहज शक्य असते. अमेरिकेतील शिखांना अरब समजून त्यांच्यावर हल्ले केले जातात. भारतीय असो वा पाकिस्तानी, त्यांना पाकी अशीच ‘शिवी’ घातली जाते. हा भूगोल आणि राजकारण या दोन्ही पातळ्यांवरील अडाणीपणा तर आहेच, पण त्यामागे ही श्रेष्ठत्वाची फॅसिस्ट भावनाही आहे. बेरोजगारी असो वा दहशतवादी हल्ले, सामाजिक समस्या असोत वा वैयक्तिक कारणे, आपल्या या दु:खांना, हालअपेष्टांना इतरच जबाबदार आहेत आणि त्यांना त्याची शिक्षा दिली गेलीच पाहिजे, अशी तीव्र भावना या अशा घटनांच्या मागे असल्याचे सातत्याने दिसले आहे. वॉशिंग्टनमधील नौदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागील कारणे अजून उजेडात आलेली नाहीत. मात्र हा हल्ला करणाऱ्या अ‍ॅरन अ‍ॅलेक्सिस या ३४ वर्षांच्या कृष्णवर्णीय बौद्धधर्मीय तरुणाचा इतिहास पाहता त्याच्या हिंसाचारामागे कोणत्या प्रेरणा असू शकतात हे लक्षात येईल. तो नौसैनिक होता. मात्र त्याला वाईट वर्तणुकीमुळे सेवेतून बरखास्त करण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले की काय हे स्पष्ट होईलच. या हल्ल्यामागील कारणे कोणतीही असोत, या दोन्ही घटनांनी अमेरिकी समाजात वाढत चाललेला माथेफिरूपणा पुन्हा अधोरेखित केला आहे. हल्ल्याच्या या घटनेने अमेरिकेच्या लष्करी सुरक्षा यंत्रणांचीही रेवडी उडविली आहे. तुमच्याकडे अणुबॉम्ब असोत, की आंतरखंडीय क्षेपणास्त्रे. ती हल्लारोधक ठरू शकत नाहीत, हेही यातून पुनश्च स्पष्ट झाले आहे. हा दहशतवादी हल्ला नव्हता, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.