News Flash

लोकमानस: आमीर खानची बेगडी नैतिकता आणि सईचा प्रांजळपणा..

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने, जो पक्ष अधिक पसे देईल त्याचा प्रचार करणार असे म्हटल्यावर अनेकांना त्यात सवंगपणा दिसला. पण त्याला सवंगपणा म्हणणे घाईचे ठरेल.

| March 15, 2014 01:01 am

लोकमानस: आमीर खानची बेगडी नैतिकता आणि सईचा प्रांजळपणा..

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने, जो पक्ष अधिक पसे देईल त्याचा प्रचार करणार असे म्हटल्यावर अनेकांना त्यात सवंगपणा दिसला. पण त्याला सवंगपणा म्हणणे घाईचे ठरेल. संगीतकार -दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने शिवसेनेची जोरदार जाहिरात केली होती आणि त्याबद्दल तुमची शिवसेनेशी बांधीलकी आहे का, असे विचारल्यावर आपण हे पैसे मिळविण्यासाठी केले असा सहजपणे खुलासाही केला होता. वास्तविक पाहता अभिनेत्यांनी अधिक पसे मिळविण्यासाठी एखाद्या ब्रॅण्डची जाहिरात करणे काही नवे नाही.
ऊठसूट तत्त्वे आणि नैतिकतेच्या गप्पा मारत फिरणारा आमीर खान पूर्वी पेप्सीची जाहिरात करायचा. पुढे त्याने कोका कोलाची अक्षरश: वकिली केली होती. त्यामुळे अभिनेत्यांनी पसे अधिक मिळवायचा विचार करणे काही वेगळे नाही आणि गरही नाही. आपणसुद्धा अधिक पसे मिळवण्यासाठी एखादी नवीन नोकरी पकडतोच की. सई ताम्हणकर हिने पशाला प्राधान्य देणार हे जाहीर करून फारच बरे केले. म्हणजे जेव्हा ती एखाद्या पक्षाचा प्रचार करेल तेव्हा ती हे पैशासाठी करते आहे, किमान हे तरी लोकांना कळेल. वास्तविक पाहता निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या क्रेझ असलेल्या पक्षात सेलिब्रिटींनी शिरणे हे काही नवे नाही आणि त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे यच्चयावत सगळे पक्ष तिकीटही देतात. वर ही मंडळी तर ‘आपण कसे कायमच वैचारिकदृष्टय़ा (किंवा ‘मनाने’) सुरुवातीपासूनच पक्षाबरोबर होतो’ हे निलाजऱ्या भंपकपणाने सांगत असतात. उलट, या पाश्र्वभूमीवर सईचा प्रांजळपणा डोळ्यात भरणारा आहे.
सौरभ गणपत्ये, ठाणे

तारणहार शोधण्यात वावगे काय?
‘आप’त्ती व्यवस्थापन हा अग्रलेख (१४ मार्च) वाचला. केजरीवाल यांच्या मुंबई भेटीत जो गोंधळ झाला, त्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते. पण त्या लेखामध्ये आलेले तथाकथित ‘खाऊन-पिऊन सुखी’ वर्गाबद्दलचे उल्लेख खटकले. ‘खाऊन-पिऊन सुखी’ असणे, आíथक व्यवस्थेचे फायदे घेणे, उन्नतीकडून अधिक उन्नतीकडे जाणे.. हे सर्व चुकीच्या मार्गाने, लोकांची फसवणूक करून, बेदरकारपणे कायदे वाकवून, आपल्या महत्त्वाकांक्षेपायी संस्थात्मक पातळीवर भ्रष्टाचार रुजवून केले असेल तर असा तिरकस उल्लेख समजू शकतो. या वर्गातील बहुसंख्य लोक आपण बरे आणि आपले काम बरे अशा प्रकारे नोकरी करणारे आणि पापभीरू वृत्तीचे असतात. काही अपवाद हे सगळीकडे असणारच, तसे ते इथेही असतीलच.
मतदारांचा प्रत्येक वर्ग आपापले तारणहार कुठल्या ना कुठल्या पक्षात शोधतच असतो. काहींना असा तारणहार आपमध्ये दिसल्यास त्यात फारसे काही वावगे आहे असे वाटत नाही. एखाद्या असाध्य आजारावर आता वैद्यक शास्त्राच्या माध्यमातून उपाय होऊ शकत नाही असे वाटू लागले की माणूस भोंदूबाबाच्या नादी लागतो. वादाकरता आप हा असा भोंदू पक्ष आहे असे मान्य केले तरी शास्त्रीय उपाय आता होऊ शकत नाहीत ही भावना नाकारून चालणार नाही. मुंबईमध्ये आपच्या सभेत झालेल्या प्रसंगाचे ‘घृणास्पद, भीतीदायक आणि उन्मादी’ अशा शब्दांत केलेले वर्णन वाचून क्षणभर असे वाटले की पूर्वी ज्या सशस्त्र मोर्चाने महिला पोलिसांवर हात टाकला त्याचेच वर्णन आपण वाचत आहोत. ‘आप’ला वैचारिक विरोध ठीक आहे, पण त्याची अशी संभावना ‘लोकसत्ता’कडून होऊ नये असे वाटते.
प्रसाद दीक्षित, ठाणे

‘बंद’ला घृणास्पद का नाही म्हणत?
‘आप’त्ती व्यवस्थापन या अग्रलेखात केजरीवाल यांच्या मुंबई भेटीच्या वेळी झालेल्या गोंधळाला ‘घृणास्पद’ असे म्हणणे ही अतिशयोक्ती वाटते. वास्तविक मुंबईत या ना त्या कारणाने ‘बंद’ चे आवाहन केले जाते आणि ते पूर्वनियोजित असते, तेव्हा याहून कितीतरी मोठा गोंधळ होतो परंतु त्यास असे संबोधले जात नाही. असे ‘बंद’ आयोजित करणे आणि ते यशस्वी करून दाखवणे हे एका हाकेसरशी होऊ शकते आणि तो प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यात विरोधी पक्षांइतकेच सत्ताधारी पक्ष पुढे असतात. लोकांच्या होणाऱ्या गरसोयीला तेव्हा काडीचीही किंमत नसते. त्यावेळी भीतीदायक वातावरण नसते असे म्हणता येत नाही आणि हे सर्व राजकीय लाभासाठी केले तरी त्यास घृणास्पद म्हटले जात नाही.
असे का? केजरीवालांच्या भेटीच्या वेळी चर्चगेट स्टेशनातील सुरक्षा दरवाजांच्या लाकडी कमानी कोसळताना काही चित्रवाहिन्यांनी दाखवल्या, पण मुळात त्या एवढय़ा तकलादू वाटतात की एरवीसुद्धा लोकांचा कुठलाही तसा हेतू नसताना केवळ लोकांच्या रेटय़ाने त्या पडू शकतात असे वाटते. त्यामुळे या पूर्वनियोजित नसलेल्या पण झालेल्या गोंधळाकडे वेगळ्या दृष्टीने बघितले पाहिजे.
मुकुंद नवरे, गोरेगाव (पूर्व)

‘तारणहार’ हवाच कशाला?
बंगाली बाबा लोकांना झुलवतात अगदी तसेच काम सध्या केजरीवाल करत आहेत आणि त्यांच्यामागे अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे ‘मेणबत्ती सोडून टोपी घातलेला’ ‘खाऊन पिऊन सुखी असलेला’ असा जो वर्ग आहे तो माझ्या मते, फक्त संधिसाधूंचा वर्ग आहे. प्रस्थापित पक्षात आपल्याला कोण विचारणार नाही म्हणून असल्या नवख्या पक्षात जाऊन प्रस्थापित होणे या लोकांना जास्त सोयीस्कर वाटते. ज्या देशात चिकित्सा करणे पाप समजले जात होते, त्या देशातील लोकांकडून आणखी कोणत्या अपेक्षा करायच्या? अगोदर काँग्रेस मूर्ख बनवत होती. मध्ये मोदींनी हेच केले. आज केजरीवालसुद्धा मूर्ख बनवत आहेत आणि मतदारसुद्धा मूर्ख बनवणाऱ्यांची वाट बघत असतो. म्हणून जोपर्यंत देशातील जनता विचार करत नाही तोपर्यंत या देशात लुटारूंची संख्या वाढतच जाणार. त्यासाठी कोणीतरी येईल आणि देशाचे किंवा आपले भले करेल हा विचार सोडला पाहिजे.

प्रमोद गोसावी, पनवेल

केजरीवाल यांना समज देणे आवश्यकच!
‘‘आप’त्ती.. दृष्टिकोनापुरती’ हे पत्र (लोकमानस, १४ मार्च) वाचले. दैनंदिन व्यवहारातील नियमभंग आणि आपचे केजरीवाल यांच्या निमित्ताने केले गेलेले नियमभंग यांची तुलना करणे आणि त्यांना सारखे लेखणे बरोबर वाटत नाही. सामान्य माणसांकडून होणारे नियमभंग काही अंशी अगतिकतेतून आणि दुसरे म्हणजे विशिष्ट भारतीय मानसिकतेमुळे होत असतात आणि ते भारतात सगळीकडेच होत असतात आणि आपल्याकडून काही गरकृत्य होते आहे याची जाणीवही कित्येकांना नसते तसेच ती माणसे समाज बदलण्याच्या घोषणा करणारे आणि इतरांना शिस्तीचे धडे देणारे नसतात. कोणाला शहाणपण शिकविण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. पण केजरीवाल आणि आपसमर्थक हे समाजाला बदलून टाकणारे लोकांना शिस्त आणि नियम पाळावयास सांगणारे महाभाग असतात आणि त्यांच्याचकडून हे असे वागणे अपेक्षित नसते आणि केवळ त्यासाठी त्यांच्यावर टीका करणे आणि त्यांना समज देणे आवश्यक ठरते. एका अतिशय व्यापक आणि अनेक बाजू असणाऱ्या प्रश्नाची एका तत्कालीन आणि ‘आप’कालीन प्रश्नाशी सांगड घालणे योग्य म्हणता येत नाही
रघुनाथ बोराडकर, कोथरूड (पुणे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:01 am

Web Title: amirs spurious ethics and sai tamhankars candor
Next Stories
1 हा स्पष्टवक्तेपणा? नव्हे, सवंगपणाच!
2 अस्थानी खर्च आता थांबवायला हवेत..
3 ‘बागुलबुवा’ की निलाजरा खेळ?
Just Now!
X