निवडणुकांचे रण हे कुरुक्षेत्र असते असे म्हणतात, कारण इथेदेखील एकमेकांसमोर युद्धासाठी उभे ठाकलेले सारे एकमेकांचे राजकीय सगेसोयरेच असतात. साऱ्यांचा धर्म एकच, राजकारण हाच असतो. महाभारतात कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव आणि पांडव युद्धासाठी समोरासमोर उभे ठाकले, तेव्हा आपल्याच आप्तांशी लढाई करण्याच्या कल्पनेने अर्जुनाला कापरे भरले होते.  अशा स्थितीत, श्रीकृष्णाने त्याला युद्धाचा मंत्र दिला. समोर उभा ठाकलेला कुणीही आपला कितीही जवळचा असला, तरी युद्धभूमीवर तो प्रतिस्पर्धीच असतो, अशी युद्धनीती श्रीकृष्णाने सांगितली, तेव्हापासून राजकारणाने याच नीतीला आपले मानले. त्यातूनच निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडतात. कुणी साधुत्वाचा आव आणत कुणावर संधिसाधूपणाचा आरोप करतो. सध्या अशा आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू आहे.  हे सारे बेमालूम खरे वाटावे यासाठी उत्तम अभिनयाची जाण असावी लागते. कदाचित म्हणूनच, अभिनय आणि राजकारण यांची जवळीक झाली आणि चित्रपटसृष्टीचेही राजकारणाशी सूत जुळले. हे नाते जोडण्यासाठी आणि घट्ट करण्यासाठी जे कोणी जिवापाड धडपडले, त्यामध्ये समाजवादी पार्टीचे माजी नेते आणि आता अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाचे फतेहपूर सिक्रीचे लोकसभा उमेदवार अमर सिंह यांचे नाव अग्रक्रमावर आहे. राजकारणापासून चित्रपटसृष्टीपर्यंत सहज वावर आणि गूढ दबदबा असलेल्या अमर सिंहांच्या व्यक्तिमत्त्वालादेखील एक गूढ असे वलय आहे. राजकारणातील अनेकांशी त्यांची पक्षभेदापलीकडील मत्री आणि चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांशी असलेली सलगी हाही चच्रेचा आणि उत्सुकतेचा विषय होऊन राहिला होता. कितीही राजकीय संकटे आली, आरोप झाले, तरी आपल्या पाठीशी अमर सिंह आहेत, ही एक भावनाच एके काळी अनेकांना दिलासादायक वाटत असे. अमर सिंह पाठीशी नसते, तर आम्ही रस्त्यावर आलो असतो, अशा शब्दांत कधीकाळी चित्रपटसृष्टीचा आद्यनायक अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन यांनी अमर सिंहांचे ऋण जाहीरपणे व्यक्त केले होते. पुढे अमर सिंहांच्या राजकीय ग्रहस्थितीला ग्रहण लागले. संसदेतील नोट फॉर व्होटप्रकरणी भाजपच्या खासदारांसमवेतच अमर सिंहांनाही तुरुंगाची हवा खावी लागली. समाजवादी पार्टीतील अनेकांशी बिनसल्यामुळे व मुलायमसिंहांसोबतच्या महत्त्वाकांक्षेच्या वादामुळे ते राजकारणातही काही काळ एकटे पडले. त्यांच्या या विजनवासी स्थितीतही अभिनेत्री जयाप्रदा यांनी त्यांना साथ दिली, पण बच्चन मात्र त्यांच्यापासून बाजूला राहिले. कदाचित त्या रागाची मळमळ आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमर सिंहांना असह्य़ झाली असावी. त्यामुळेच बच्चन पती-पत्नीवर संधिसाधूपणाचा ठपका ठेवत अमर सिंहांनी तोंडसुख घेतले. अमिताभ बच्चन हे गुजरातचे सांस्कृतिक दूत म्हणून नरेंद्र मोदींची पाठराखण करतात, तर त्यांच्या पत्नी समाजवादी पार्टीची साथ देतात. बच्चन पती-पत्नीची ही भूमिका हा स्वतंत्र चच्रेचा मुद्दा असला, तरी अमर सिंहांना मात्र त्यांच्या भूमिकेत भविष्यातील संधिसाधूपणाचा वास येऊ लागला आहे. याच अमर सिंह यांनी समाजवादी पार्टीत असतानाही अन्य सर्व पक्षांतील अनेकांशी साधलेली जवळीक हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय होता. अमर सिंहांसोबतचे सर्वपक्षीय नेत्यांचे संबंध हे एक राजकीय गूढ मानले जायचे. असे व्यक्तिमत्त्व असलेल्या या नेत्याने अचानक साधुत्वाचा मुखवटा परिधान करून बच्चन पती-पत्नीवर संधिसाधूपणाचा आरोप सुरू केल्याने निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावरही करमणुकीच्या चार घटका अनुभवायला मिळणार का, याविषयीची उत्सुकता वाढीला लागेल. यापलीकडे आणखी काही घडेल असे सध्या तरी दिसत नाही..