चित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो. त्यानंतर आपल्यासमोर चित्रं मांडतो. रविवर्मानी सरस्वतीचं ओळख-रूप वापरून, त्याला आभासी वास्तवाचा साज चढवला. त्यात प्रत्यक्ष मानवाकृती, पाश्र्वभूमीतला निसर्ग अगदी हुबेहूब आला; पण त्या रूपात त्यांनी स्वत:च्या मनातील नायिका मिसळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रं व सभोवतालचं जग यात दोन गोष्टी समान आहेत. एक- दोन्ही आपल्याला डोळ्यांनी दिसतात. दोन- दिसण्याचा, दृश्याचा मूलभूत गुण आभास आहे, त्यामुळे चित्रं व सभोवतालच्या जगाचं दिसणं आभासात्मक असतं.
आपल्याला सभोवतालच्या जगाचं ज्ञान ज्ञानेंद्रियांमुळे होतं. आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे सभोवतालच्या जगाचं, त्यातील वस्तूंचं स्पर्श, गंध, रूप, चव व ध्वनी संवेदना स्वरूपात आपल्याला ज्ञान होतं. वस्तूंकडे वेगवेगळ्या बाजूंनी, कोनातून पाहिलं की, वस्तूची वेगवेगळी रूपं दिसतात. पाच ज्ञानेंद्रियांनी होणाऱ्या संवेदनांमुळेही अशीच विविध रूपं तयार होतात. अशा प्रकारे आपण आपल्या मनात सभोवतालच्या जगाची अगणित रूपं, प्रतिमा साठवून ठेवत असतो.
या दृश्य व विविध संवेदना रूपांसोबत आपण या रूपांशी संबंधित आपले प्रतिसाद, कृती, त्या करायची पद्धत, त्यांचा परिणाम, त्या संबंधातील स्मृती व या रूपाशी संबंधित भाषेचा वापर या सर्व गोष्टी आपण आपल्या मनात, मेंदूमध्ये साठवून ठेवत असतो.
दृश्य व संवेदना रूपांसह कृती व भाषा रूपं ही मेंदूत साठवल्याने मेंदूत या सर्व रूपांची एक गोधडी तयार होते. ही विविध रूपं एकत्र येऊन काही नवीनच रूपंही तयार होत असतात. आपला मेंदू गुगलसारख्या एका मोठय़ा शक्तिशाली सर्च इंजिनप्रमाणे हे सर्व प्रकारचं ज्ञान साठवत राहतो व गरज असेल तसा वापरत राहतो.
रोजच्या जीवनात आपण अनेक व्यक्तींशी बोलतो. या संवादांमध्ये काय घडत असतं? त्याचं स्वरूप काय असतं? संवादाचं स्वरूप समजण्यासाठी आपण त्यांच्यासारख्याच काही गोष्टींची उदाहरणं पाहू, ज्यामुळे संवादामध्ये, त्यांच्या गाभ्यामध्ये काय होतं ते पाहू शकू, समजू शकू.
लहान मुलं आकार जुळवण्याच्या खेळात किंवा कोडी सोडवताना त्रिकोण, चौकोन, गोल आदी आकार त्याच आकारांच्या खळग्यात भरतात. आकारांच्या चकत्या किंवा वस्तू व खळगे यातलं साम्य ओळखण्याची कृती त्यात महत्त्वाची असते. पेशन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पत्त्यातील खेळात, उलटलं जाणारं प्रत्येक पान बदाम-चौकट आदी विभागणीनुसार किंवा पत्त्यातील चढत्या-उतरत्या क्रमाने आपण जुळवतो.
या दोन्ही खेळांत प्रतिमांतलं साम्यं, नातं, ओळखणे-जुळवणे अत्यंत महत्त्वाचे असते. ते समजलं नाही, तर हे खेळ खेळता येणार नाहीत. संवादाचंही असंच असतं. संवाद कमीत कमी दोन व्यक्तींमध्ये घडतो. त्याचा मूलभूत हेतू सहमतातून एकमत होणे हाच असतो. प्रतिमातील खेळांत नातं, जुळणी व एकमत होण्याची प्रक्रिया ही या अर्थासारखी आहे. याचं कारण आपण संवाद साधताना प्रतिमांचीच देवाणघेवाण करत असतो. हो हे खरंय! जरी आपल्याला असं वाटलं की, आपण संवादात फक्त भाषा, बोलीभाषा वापरतो तरीही आपण बोलताना आवाजाचे चढ-उतार वापरतो, त्यांच्याद्वारे ध्वनीच्या प्रतिमा वापरतो. बोलताना हातवारे, चेहऱ्याचे हावभाव अशा प्रतिमा वापरतो. या प्रतिमा वापरून आपण संवाद विषयाबाबतच्या आपल्या मनातील प्रतिमा आपण दुसऱ्या व्यक्तीसमोर उलगडून दाखवतो, शेअर करतो- प्रतिमांचा डाटा शेअर करतो. आपल्या या कृतीला प्रतिसाद म्हणून दुसरी व्यक्ती ‘बोलते’, तिच्या मनातील असंख्य प्रतिमा उलगडून दाखवते. त्यातल्या जितक्या प्रतिमांत साम्य, सारखेपणा असतो तितकं आपलं म्हणणं दुसऱ्याला कळलंय, पटलंय, समजलंय असं आपण समजतो. या साम्याची पातळी समाधानकारक असेल तर ठीक, नाही तर आपण अजून काही सांगतो, मांडतो, प्रतिमांची देवाणघेवाण करतो, अशातून एकमतावर यायचा प्रयत्न करतो.
गंमत हीच आहे की, आपला संवाद हा प्रतिमांची देवाणघेवाण आहे हे आपल्या सहज ध्यानात येत नाही; पण प्रतिमांची देवाणघेवाण असल्यानेच, मोबाइल वापरताना एसएमएसपेक्षा व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम अ‍ॅप ‘चांगली’ वाटतात, कारण या अ‍ॅपमध्ये शब्द, वस्तूंच्या प्रतिमा, मानवाकृती व मानवी कृतींची चित्रं, चेहऱ्यांचे हावभाव अशी आपल्या मनातील सर्व प्रकारच्या प्रतिमांच्या सारखीच ‘प्रतिमा साधनं’, अक्षरं, भाषा घटक, प्रकार उपलब्ध असतात. ज्यांचा एकत्रित वापर करून आपण आपलं म्हणणं, म्हणजेच ठरावीक विषयाबाबतची ‘प्रतिमा’ निर्माण करू शकतो, शेअर करू शकतो, पाठवतो, सांगतो.
आपण एवढी शास्त्रीय चर्चा कशासाठी करतोय? हा खटाटोप याकरिता की, शब्दआधारित भाषा व चित्राची दृश्यं भाषा यात काही भेद नाही. त्या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या भाषा त्यांच्या मुळात वेगळ्या नाहीत. त्यांचा वापर करण्याच्या पद्धती, त्यांचा स्वरूप-हेतू हा सारखाच असतो. याचं कारण हे की, आपल्या मनातील हा भेद नाहीसा झाला, की चित्रं पाहणं, समजणं सहजशक्य होईल.
कोणत्याही भाषारचनेनुसार चित्रकार जगातील असंख्य वस्तूंची ओळख-रूपं व इतर संवेदनांमुळे तयार झालेली रूपं चित्रांत वापरतो. लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आभास हा त्यांचा स्वभाव असतो. परिणामी, चित्रांतल्या प्रतिमा व प्रत्यक्षातील वस्तूची रूपंही सारखीच भासतात, दिसतात. चित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो. त्यानंतर आपल्यासमोर चित्रं मांडतो. त्यामुळे कितीही प्रत्यक्षासारखं दिसलं तरीही चित्र हे छायाचित्र नव्हे; ते रचलेलं, तयार केलेलं असतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. भारतातले प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी हेच केलं; पण त्यांची चित्रं बघताना आपल्या हे लक्षात आलं नाही. रविवर्मा यांनी पुराणकथांतील देव-देवता, प्रसंग यांना आभासी वास्तव रूपांत चित्रित केलं. आपण त्यापूर्वी या देव-देवतांच्या मूर्ती, मंदिरातील शिल्पं पाहत होतो; पण त्यात आभासी-वास्तवाचा ‘खरेपणा’ कमी होता. परिणामी रविवर्मा यांच्या चित्रांनी आपल्या समाजाला भुरळ घातली.
रविवर्मानी सरस्वतीचं ओळख-रूप वापरून, त्याला आभासी वास्तवाचा साज चढवला. त्यात प्रत्यक्ष मानवाकृती, पाश्र्वभूमीतला निसर्ग अगदी हुबेहूब आला; पण त्या रूपात त्यांनी स्वत:च्या मनातील नायिका मिसळली. तिशीतली, फिक्कट गव्हाळ रंगाची, केरळी स्त्रीप्रमाणे जाड कुरळे केस सोडलेली, पांढरीशुभ्र जरीकाठी साडी नेसलेली आणि हो, ही साडी पाचवारी आहे, ज्याला जुन्या काळातल्या नऊवारी नेसणाऱ्या बायका ‘इऽश्श! गोल्ड साडी’ म्हणून नाक मुरडायच्या ती. गंमत ही की, आभासी वास्तवामुळे आपण त्यांची नायिका आपण आपल्या मनातील सरस्वती आहे असं समजून पाहतो. अशा पद्धतीने रविवर्मा व आपल्या मनातील प्रतिमा जुळतात व आपल्याला रविवर्मा यांच्या चित्रांची भाषा उमगते आणि चित्र समजलं असं वाटतं. त्यांचं चित्र आपल्याला खरंच कळलं का?
ता.क.- ही प्रतिमा आपल्या समाजाला इतकी भावली, स्वीकारली की, या पाचवारी साडीतल्या सरस्वतीची पेणच्या मूíतकारांनी मूर्तीही बनवली, जी भेट म्हणून दिली जाते.

मराठीतील सर्व कळण्याची दृश्यं वळणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An analysis of art of painting
First published on: 17-01-2015 at 01:48 IST