‘द फ्लड ऑफ फायर’ ही अमिताव घोष यांची कादंबरी म्हणजे अफू-युद्धाबद्दलच्या त्यांच्या तीन कादंबऱ्यांतील अखेरची, तिसरी. या त्रयीतील ‘द सी ऑफ पॉपीज’ (२००८) आणि ‘द रिव्हर ऑफ स्मोक’ (२०११) या कादंबऱ्या आधीच प्रकाशित झाल्या आहेत. या स्वतंत्र कादंबऱ्या म्हणूनही वाचता येतात. परंतु ‘आयबिस’ नावाचे जहाज तिन्ही कादंबऱ्यांत आहे- म्हणून ही ‘आयबिस ट्रायॉलॉजी’. नव्या ‘फ्लड ऑफ फायर’चे वैशिष्टय़ म्हणजे, वर्तमानकाळाबद्दल जणू भूतकाळातून आकाशवाणी व्हावी, तसा तिचा सूर आहे.. साम्राज्यवाद किंवा सत्ताकांक्षा, नायकत्व गाजवण्याची प्रवृत्ती आणि सामान्यजन, तसेच अर्थशास्त्र यांबद्दल ही कादंबरी काही म्हणू पाहाते. ‘गेली दहा वर्षे या कादंबरी-त्रयाच्या लिखाणात मी व्यग्र होतो, त्यामुळे त्यातील पात्रे यापुढेही माझ्यासह राहतील.. कदाचित निराळय़ा स्वरूपात पुढे कधीतरी येतीलही..’ अशी जवळीक या कादंबरीतून उलगडणाऱ्या विश्वाशी या लेखकाने साधली होती. घोष यांच्याशी झालेल्या प्रश्नोत्तरांचा हा संपादित अंश..
‘मुक्त व्यापारा’साठी ब्रिटिश आणि चिनी यांच्यात पहिले अफू-युद्ध (१८३९-४२) लढले गेले, पण या युद्धातून, ब्रिटन हा अफू खरेदी करण्याची सक्तीच चीनवर लादत होता, असे म्हणता येईल?
– अलबत! मी तर म्हणेन, दुसरे काहीच म्हणता येत नाही. ‘मुक्त व्यापारा’च्या नावाखाली चाललेला आजचा जो साम्राज्यवाद आहे, तोच तेव्हा या युद्धातून दिसला, असे म्हणावे लागेल. आज फरक इतकाच की, इंग्लंडऐवजी अमेरिकेकडे या युद्धाचा ध्वजदंड आला आहे. तेच, तसेच खरेदीची सक्ती लादणे आजही सुरू आहे. पुढे जाऊन असे म्हणता येईल की, इंग्लंडने अफू-युद्ध लढले ते व्यापाराच्या ‘मुक्ती’चा उद्घोष करीत आणि अमेरिकेने इराकवर युद्ध लादले तेही दहशतीपासून ‘मुक्ती’साठी.
तुमची पुस्तके वाचताना असे लक्षात येते की, वसाहतवादातून फोफावलेल्या भांडवलशाहीच्या सर्वागांवर आणि विशेषत: अमर्याद ‘वाढी’च्या कल्पनेवर तुम्हाला टीकाच करायची आहे..
– या प्रकारच्या भांडवलशाहीची मूळ कल्पनाच मुळी आणखी वाढत जायचे, ही आहे. वाढ म्हणजेच सर्वस्व आणि म्हणून वाढ झालीच पाहिजे, हा आग्रह अशी भांडवलशाही रुजवते. थांबेल तो संपेलच, अशी तजवीज या भांडवलशाहीच्या जगात असते. मग त्या कंपन्या असोत की देश. थांबला तो संपला, हेच खरे ठरते. अंतहीन वाढीचे हे चक्र काही देशांना फलदायीच ठरल्याचे दिसेल. परंतु हेदेखील अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले आहे की, वाढ ही अजिबात शाश्वत असू शकत नाही. मर्यादा आहेतच आणि त्या निसर्गानेच घातलेल्या आहेत.
भारतात आज वाढ महत्त्वाची मानली जाते आहे आणि त्यासाठी पर्यावरणीय मुद्दय़ांचे प्राधान्य डावलले जाते आहे, असा आक्षेप घेतला जातो. हीच चिंता तुम्हालाही वाटते का?
– हो. वातावरणीय बदल ही भारतासाठी वस्तुस्थिती आहे, तो धोका भारताला आहे. मी हे म्हणतो आहे कारण मी बंगालचा आहे आणि त्या राज्याला वातावरणीय बदलांचा धोका किती आहे हे मी पाहिले आहे. सुंदरबन भागात वारंवार जात असल्याने तिथे होत गेलेला ऱ्हास मी याचि डोळां पाहिला आहे. जमिनीत क्षार वाढत जाऊन ती मिठासारखी होते, समुद्र आणखी पसरत जातो आणि जमीन नाहीशी होते, असे तिथे सुरू आहेच. ‘समुद्रपातळी वाढण्याचा धोका’ इथे दिसतो आहे.
वाढ, आणखी वाढ, हीच जर वैचारिक भूमिका असेल, तर तिचा थेट परिणाम म्हणजे पाणीटंचाई. वाढीची वैचारिकता जिथे सर्वाधिक दिसते, त्या कॅलिफोर्नियाकडे पाहा ना.. प्रत्येकाचे मोठे घर, घरी दहा मोटारी, घरापुढे हिरवळ! या साऱ्याच्या मर्यादा तिथे दिसू लागल्या आहेत. कॅलिफोर्नियात पाणीटंचाई इतकी आहे की, पाण्याचे रेशनिंग करावे लागते आहे. आता हे नियमन, तुमच्या ‘फ्री मार्केट’ वैचारिकतेच्या बरोब्बर उलटेच आहे की नाही? म्हणजे या वैचारिकतेच्या मर्यादा तिच्या घरातच आता दिसू लागलेल्या आहेत. अख्ख्या उत्तर भारतातली शेती ही या ना त्या प्रकारे, उपलब्ध पाण्याच्या अतोनात वापरावर अवलंबून आहे. गंगेच्या वरच्या भागातील जलस्रोत आटले की – ‘आटले तर’ नव्हे- ते आटणारच आहेत.. तसे आटले की, या शेतीवर संकट येणार. मला कळत नाही की, अशाही स्थितीत आपण केवळ वाढ-वाढ असा जप कसा करू शकतो. निसर्गाने तुमच्यापुढे जे वाढून ठेवले आहे, ते तुम्ही पाहणारच नाही आणि तुमचेच मंत्र दामटणार, असे फार काळ चालू शकणार नाही.
त्या जुन्या युद्धामुळे भारत-चीन संबंधांवर काही परिणाम झाला का?
आपल्याला ते अफू-युद्ध वगैरे काही माहीतच नाही, इतके ते विस्मृतीत गेल्यामुळे आपल्याला काही आठवण्याचा प्रश्नच नाही, पण चीनचे तसे नाही. चीन ही इतिहासाचे पक्के भान असलेली संस्कृती आहे. त्यामुळे तिथे युद्धाची स्मृती विस्तृत प्रमाणात आहे. भारतीय लोक या युद्धात होते आणि ते चीनविरुद्ध लढले, याची जाणीवही तिकडे आहे.
अमृता दत्त – amrita.dutta@expressindia.com
(सविस्तर इंग्रजी मुलाखत ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या संकेतस्थळावर वाचता येईल.)