जर्मनीच्या चॅन्सेलरपदी तिसऱ्यांदा निवडून येऊन अँजेला मर्केल यांनी आपले प्रभुत्व पुन्हा सिद्ध केले . हे त्यांना जमले कारण आपली राजकीय आणि आर्थिक धोरणे ही पक्षीय तत्त्वज्ञानाच्या झापडबंद चौकटीत कधीही अडकू  दिली नाहीत. वरवर पाहता हे साधे वाटत असले तरी त्यास धैर्य लागते.
निर्णय वेळेत घेण्याच्या क्षमतेचा अभाव लहानपणी अँजेला कास्नर यांच्या टिंगलीचा विषय होता. साधी पोहण्याच्या तलावात उडी मारायची झाली तरी अँजेला तासन्तास विचार करायच्या. परंतु एके काळचा त्यांचा हा दुर्गुण आज जर्मनीच्या चॅन्सेलरपदी तिसऱ्यांदा निवडून येताना त्यांच्या कामी आला. दरम्यानच्या काळात अँजेला कास्नर यांच्या अँजेला मर्केल झाल्या होत्या आणि पूर्व जर्मनीतली एकेकाळची ही बुजरी तरुणी जर्मनीची पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली होती. वास्तविक ताज्या निवडणुकांच्या आधी मर्केल यांच्या अर्थविषयक धोरणांविषयी जर्मनीतील मध्यम वर्गात नाराजी होती. मर्केल यांनी गेल्या कित्येक वर्षांत कररचनेला हात लावलेला नाही, कोणत्याही सवलती दिलेल्या नाहीत आणि त्यात युरोपीय संघटनेचे लोढणे गळ्यात घेत जर्मनांना काटकसर करावयास लावले. त्यामुळे त्यांच्या विरोधात असंतोष होता. त्यामुळे या असेतोषाचे रूपांतर त्यांच्या विरोधातील मतांत होईल अशी अनेकांची अटकळ होती. ती खोटी ठरली. ताज्या निवडणुकीत त्यामुळे मर्केलबाईंच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाला जवळपास ४३ टक्के मते मिळाली. १९५७ सालानंतर इतक्या मोठय़ा मतांनी या पक्षास सत्ता मिळण्याची ही पहिलीच खेप. ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक हा पक्ष पुरुषधार्जिणा मानला जातो. परिणामी, या पक्षनेतृत्वात फार काही महिला आहेत, असेही नाही. तरीही या पक्षातील पुरुष धेंडांना बाजूला सारत मर्केलबाईंनी नेतृत्वाच्या लढाईत चांगलीच बाजी मारली. १९८९ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बर्लिनची भिंत कोसळून जर्मनीचे एकत्रीकरण सुरू झाले तो मर्केलबाईंचा राजकारणात धडे गिरवण्याचा काळ. त्या अर्थाने कम्युनिझमची अखेरची घटका भरीत असताना मर्केलबाईंनी राजकारणात उडी घेतली. परंतु त्याही वेळी त्यांचा स्वभाव बदललेला नव्हता. लहानपणी पोहण्याच्या तलावात उडी मारायची की नाही हे ठरवायला त्यांना जेवढा वेळ लागायचा, तेवढाच वेळ राजकारणात उडी घ्यायची की नाही, हे ठरवायला त्यांनी घेतला. अखेर त्यांनी ती घेतली आणि नंतर माजी चॅन्सेलर हेल्मेट कोहल यांच्या नेतृत्वाखाली उपमंत्री म्हणूनही काम केले. कोहल हे अँजेला यांना बेबी म्हणत आणि त्यांची वागणूकही पित्यासारखीच होती. परंतु राजकारणातील पित्याला जे करून दाखवणे जमले नाही, ते मर्केलबाईंनी केले. सलग तीन वेळा जर्मनीच्या चॅन्सेलर म्हणून तर त्यांनी बाजी मारलीच, परंतु तिसऱ्या खेपेस सत्तेवर येताना ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षासाठीही इतिहास घडवला. हे त्यांना का जमले, हे समजून घ्यायला हवे.यातील अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे मर्केलबाईंनी राजकीय तत्त्वज्ञान हा मुद्दा बाजूलाच ठेवला. याचा अर्थ त्यांनी सर्व तत्त्वांस तिलांजली दिली असे नाही, तर आपली राजकीय आणि आर्थिक धोरणे हे पक्षीय तत्त्वज्ञानाच्या झापडबंद चौकटीत कधीही अडकू  दिली नाहीत. वरवर पाहता हे साधे वाटत असले तरी त्यास धैर्य लागते आणि प्रसंगी आपल्या पारंपरिक मतदारांकडून रोष ओढवून घेण्याचा धोका पत्करावा लागतो. मर्केलबाई तसा धोका पत्करण्यास कधीच कचरल्या नाहीत. त्याचे अनेक दाखले देता येतील. जर्मनीत पर्यावरणवादी पक्ष आणि संघटना यांना मोठा जनाधार आहे. या पक्षांनी अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात मोठी हवा तयार केली होती. पण मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाचा अणुऊर्जेस विशेष विरोध होता असे नाही. तरीही २०११ साली जपानमध्ये फुकुशिमा येथे आण्विक हाहाकार होताच एका क्षणात मर्केल यांनी जर्मनीतील सर्व अणुभट्टय़ा बंद करून टाकल्या आणि २०२२ पर्यंत जर्मनीला अणुऊर्जामुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. मर्केल यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणवादी पक्षांचा पायाच खचला. परिणामी आताच्या निवडणुकीत त्या पक्षांच्या मतांत घट झाली. तसेच त्यांनी अत्यावश्यक लष्करी सेवेबाबतही केले. इस्रायलप्रमाणे जर्मनीतही तरुणांना लष्करी सेवा अत्यावश्यक करण्याविषयी चर्चा सुरू होती आणि त्या संदर्भातील कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता. या कायद्यास डाव्या पक्षांचा विरोध होता. या मुद्दय़ावर जनतेचाही पाठिंबा डाव्या पक्षांना मिळत असल्याचे लक्षात आल्यावर या कायद्याचा मसुदा मर्केलबाईंनी रद्दच करून टाकला. त्यामुळे पंचाईत झाली ती डाव्या पक्षांची. समाजवादी आणि डाव्या पक्षांना त्यांनी आणखी एका मुद्दय़ावर असेच निष्प्रभ करून टाकले. जर्मनीत सर्वसाधारण आयुष्यमान वाढले आहे. त्यामुळे माणसे जास्त जगतात. परंतु आर्थिक विपन्नावस्था ही क्रियाहीन वृद्धत्वासाठी मोठा चिंतेचा विषय असते. कारण वाढत्या महागाईस तोंड देत जगावे लागते आणि उत्पन्नाची साधने मात्र मर्यादितच असतात. हा मुद्दा समाजवादी आणि डाव्या पक्षांनी हाती घेतल्यावर मर्केल यांनी एका निर्णयाद्वारे वृद्धांच्या निवृत्तिवेतनात आणि तद्आनुषंगिक कर सवलतीत घसघशीत वाढ केली. साहजिकच तोही मुद्दा त्यांनी निकालात काढला. त्यामुळे त्यांचे सर्व विरोधक निष्प्रभ होत गेले. मात्र असे करताना त्यांनी विरोधकांच्या प्रत्येक मागणीपुढे मान तुकवली असे नाही. डाव्या पक्षांनी मध्यमवर्गाच्या कर सवलतीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती मात्र त्यांनी अजिबात मान्य केली नाही. त्याचप्रमाणे आर्थिक सुधारणाही काही केल्या नाहीत. पण आपण हे का करू शकत नाही, हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे एकीकडे मध्यमवर्गासाठी नवनव्या सवलतींचा आग्रह धरणारे राजकीय पक्ष होते तरी त्याच वेळी त्या मध्यमवर्गाला आपली आर्थिक अपरिहार्यता समजावून सांगणाऱ्या चॅन्सेलरही होत्या. हा नवमध्यमवर्ग त्याच वेळी युरोपीय संघटनेच्या प्रश्नावर आपल्या राष्ट्रप्रमुख जगातील अनेकांना, त्यातही अन्य युरोपीय नेत्यांना, कसे सामोरे जात आहेत हेही पाहत होता. युरोपीय संघटनेस आर्थिक संकटाने घेरलेले असताना फ्रान्सचे आधीचे अध्यक्ष निकोलस साकरेझी असोत की विद्यमान होलाँ, किंवा ब्रिटनचे डेव्हिड कॅमेरून किंवा ग्रीसचे पापादोस. यांतील एकाच्याही दडपणाला मर्केल यांनी भीक घातली नाही आणि सगळ्यांचा तीव्र विरोध असतानाही त्या सर्वाना कठोर काटकसर करायला लावली. वास्तविक या अन्य युरोपीय देशप्रमुखांप्रमाणे युरोपीय बँकेच्या ख्रिश्चन लेगार्ड यांनाही मर्केल यांची सर्व मते मान्य होती, असे नाही. पण तरीही मर्केल यांनी आपल्याला हवे तेच केले आणि तेच बरोबर होते हे जगाला दाखवले. कोणत्याही प्रश्नाकडे शास्त्रीय नजरेने पाहणे हे त्यांचे वैशिष्टय़. याचे कारण त्या पेशाने रसायन शास्त्रज्ञ आहेत. एक समस्या घेतली की तिच्या खोलात जायचे, सर्वागाने विचार करायचा आणि मग जो योग्य वाटेल तो निर्णय घ्यायचा आणि निष्ठेने अमलात आणायचा, हा त्यांचा स्वभाव. या त्यांच्या पद्धतीमुळे निर्णयप्रक्रिया लांबते म्हणून त्यांच्यावर टीका झाली. परंतु मर्केलबाईंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही. जर्मन हे स्थैर्यास प्राधान्य देतात. त्यामुळे मर्केल यांचेच एके काळचे अर्थमंत्री पीर स्टेनब्रुक यांच्या सोशल डेमॉक्रॅटिक या पक्षास मतदारांनी नाकारले. ते व्यवस्थेत फार बदल करू पाहत होते आणि या कठीण समयी इतका बदल जर्मन मतदारांना नको होता. परिणामी त्यांच्या पक्षाची मते घटली आणि ती मर्केल यांना मिळाली.
मर्केलबाई चॅन्सेलर झाल्या तरी त्यांना कुटुंबासाठी अजून स्वत: स्वयंपाक करणे आवडते. लोक काय म्हणतील याची फिकीर न बाळगता त्या जमेल तेव्हा भाजी वगैरे खरेदीलाही स्वत: जातात आणि वॅग्नेर सांगीतिकांचे प्रयोग कधीही चुकवत नाहीत. चॅन्सेलर झाल्या म्हणून आपली सदनिका सोडून त्या काही बंगल्यात राहायला गेल्या असेही झाले नाही. स्वत:ही शास्त्रज्ञ असलेले त्यांचे पती हेही प्रकाशझोतापासून लांब राहतात आणि कोणत्याही पातळीवर सरकारच्या कामात लुडबुड करीत नाहीत. या त्यांच्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य जनतेने मर्केलबाईंचे नामकरण मुट्टी.. म्हणजे माता.. मर्केल असे केले आहे. सलग तिसऱ्यांदा सत्तेची दोरी त्यांच्या हाती देऊन जर्मनांनी आपल्या राष्ट्रस्वभावाचे दर्शन घडवले आहे.