महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढते आहे की सरकारी आदेशाने ती मुद्दाम वाढवली जात आहे? दहावीच्या यंदा उंचावलेल्या निकालाचे समाधान राज्य म्हणून महाराष्ट्राला मानता येईल का? यश आनंद देणारे असतेच, पण अशा यशाने काळजी वाटते..
यंदा दहावीच्या परीक्षेस बसलेल्या १५ लाख ७२ हजार मुलांपकी जे एक लाख ३४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, त्यापेक्षा उत्तीर्ण झालेल्यांविषयी पोटात अनुकंपा दाटून यावी अशी परिस्थिती आहे. पहिला वर्ग किंवा विशेष श्रेणी यांचा दर्जा अलीकडच्या काळात ३५ टक्क्यांवर येऊनदेखील बराच काळ लोटला. गतवर्षी तर दिल्ली विद्यापीठाच्या काही महाविद्यालयांत १०५ टक्क्यांवर प्रवेश बंद झाले. आता आपल्याकडेही तसे होईल. याचा अर्थ विद्यार्थी शंभर टक्क्यांहूनही अधिक गुण आता मिळवू शकतात. यास काय म्हणावे? त्यामुळे ८० टक्के वा अधिक गुण मिळवणारेदेखील हल्ली सुतकात जातात. जेमतेम पहिला वर्ग मिळवणाऱ्याचे हाल तर विचारू नका.. असे विद्यार्थी अनुत्तीर्णासमानच गणले जातात.. हे सगळेच मती गुंग करणारे आहे. यंदा शालान्त परीक्षेस सामोरे गेलेल्यांपकी जवळपास ९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे तर सर्वार्थाने भीतीदायकच. एखाद्या परीक्षेत इतके भरमसाट विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील तर त्या परीक्षेच्याच दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण व्हावयास हवे. तसे ते होत नसेल तर यंदाच्या या दहावीच्या निकालाचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात गुणवंतांचा पूर आला असून हे गुणवान आता उत्तरपत्रिकांतून मावेनासे झाले आहेत. खेरीज जी आठ टक्के मुले या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली आहेत, ती पाहता या निकालाचा दुसरा एक अर्थ काढता येईल. तो म्हणजे शासनाला खरे तर शंभर टक्के निकाल लावण्याचीच इच्छा आहे. पुढील वर्षी तसे करता यावे, यासाठी यंदाचा निकाल ही एक महत्त्वाची पायरी ठरू शकते. एके काळी विशेष श्रेणीला असलेले महत्त्व गेल्या काही वर्षांत संपुष्टात आले आहे. तरीही ७५ टक्के वा त्याहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा सुमारे पन्नास हजारांनी वाढली आहे. प्रथम श्रेणीतील ही वाढ तीस हजारांची आहे. द्वितीय ते प्रथम श्रेणीमधील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे सव्वा चार लाख आहे आणि उत्तीर्णाच्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्के आहे. तेव्हा या सगळ्या मुलांचे आयुष्य उत्तम गुणांनी मंडित झाल्याने फार उज्ज्वल होणार आहे असे कोणास वाटू शकल्यास त्यास दोष देता येणार नाही. परंतु तरीही गुणवत्तेचा हा पूर पाहून एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो म्हणजे, इतके सारे गुणवान पुढील आयुष्यात जातात कोठे?
त्याचे उत्तर शोधावयाचे झाल्यास वास्तवाचा आधार घ्यावा लागेल. अधिकाधिक मुले उत्तीर्ण होणे ही जर राज्याच्या हुशारीची मोजपट्टी असेल, तर मग त्या मुलांना या शिक्षणातून नेमके काय मिळाले, याचा अभ्यास कोण आणि कसा करणार? असे काही करण्याची गरज ना केंद्र सरकारला वाटते, ना राज्याला त्याचे महत्त्व कळते. भाषा, गणित, विज्ञान, अर्थशास्त्र, व्यापारशास्त्र याचे पुरेसे ज्ञान सध्याची शिक्षण पद्धती देत नाही. ते विद्यार्थ्यांना झगडून मिळवावे लागते. दहावीमध्ये उत्तम गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांस बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा दिल्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे हे ज्ञान किती कुचकामी आहे, याचे भान येण्यास दोन वर्षांचा काळ जावा लागतो. परीक्षा हे संकट आहे, की शिकवणे किंवा समजावून सांगणे ही कटकट आहे, याबद्दल पुरेशी स्पष्टता जोवर शिक्षणव्यवस्थेत येत नाही, तोवर अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्याचीच मनोवृत्ती बोकाळत राहणार, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण अधिक असले, तरीही हुशारी वाढत असल्याचे मात्र दिसत नाही. विद्यार्थ्यांना जगण्याच्या शर्यतीत पळण्यासाठी जे बळ शिक्षणाने द्यावे लागते, ते मिळत नसल्याने ही हुशारी थिजते. त्याबद्दल कोणाच्याही मनात जराही दु:खाची भावना दिसत नाही. शिक्षणाचा जगण्याशी आणि जगण्यासाठी काही मिळवण्याशी संबंध असतो, हे केवळ कागदोपत्री राहिलेले विचार महाराष्ट्रातही गेली अनेक वष्रे मागील पानावरून पुढे येत राहिले आहेत.
लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणास विरोध करताना राष्ट्रीय शिक्षणाची गरज व्यक्त केली आणि त्यासाठी शिक्षणसंस्था उभारली. असे करणे त्यांना आवश्यक वाटले, याचे कारण भारतीय मुलांना आवश्यक असणारे ज्ञान अधिक कसदारपणे मिळणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटत होते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेतही मोठे बदल घडून आले. शिक्षणाचा हेतू केवळ नागरिकांना साक्षर करणे असा असून चालणार नाही, तर जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट हवे. आपल्याकडे त्याचीच मोठी वानवा दिसते. गेल्या सहा दशकांत ज्या प्रचंड उलथापालथी झाल्या, त्याचा हवा तसा परिणाम भारतीय शिक्षणपद्धतीवर झाला नाही. त्यामुळे अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान या फेऱ्यांतून हे शिक्षण बाहेर पडू शकले नाही. देशाच्या विकासाला नेमकी कोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे, याचा भविष्यकालीन  विचार करण्याची क्षमता गमावून बसल्यामुळे हे घडले. काम करू शकणारे सर्वाधिक तरुण असलेला देश म्हणून जर जग भारताकडे पाहात असेल, तर हे सर्वाधिक संख्येने असलेले तरुण प्रत्यक्षात बहुसंख्येने अशिक्षित या वर्गात मोडणारे आहेत, ही स्थिती भयावह आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी त्याने फुशारून जाणे तर अधिकच काळजीचे. महाराष्ट्रातील विद्यार्थी एवढे हुशार झाले असतीलच, तर सरकारने यापुढील काळात शिक्षणक्रमाची काठिण्यपातळी अधिक वाढवण्यास आणि परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीचे कामही अधिक निरपेक्ष करण्याचे आदेश देऊन पाहण्यासही हरकत नाही. केवळ निकालातील उत्तीर्णाची संख्या फुगवून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची, की सर्वार्थाने शिक्षणाचा हेतू साध्य करायचा, याचा निर्णय घेण्याची वेळही आता उलटून चालली आहे. अलीकडच्या या अवाढव्य निकालास एक वेगळीच किनार असते. ती म्हणजे शिकवण्यांची. एके काळी फावल्या वेळात अर्थार्जनाचे साधन म्हणून शिक्षक वा शिकविण्याची हौस असलेले शिकवण्या  घेत. आता त्यांचे अक्राळविक्राळ व्यवसायात रूपांतर झाले असून हे शिकवण्यावाले संघटितपणे शासनाला आणि प्रचलित शिक्षणव्यवस्थेला आव्हान देऊ लागले आहेत. ऐंशीच्या दशकानंतर शिक्षण क्षेत्रास शिक्षणसम्राटांचे ग्रहण लागले होते. ते पूर्णपणे सुटायच्या आत या शिकवणीमाफियांनी शिक्षण क्षेत्रात धुमाकूळ घातला असून त्यांना आवरण्याची इच्छादेखील कोणी व्यक्त करताना दिसत नाही. हे शिकवण्यावाले, शिक्षण प्रशासन आणि शिक्षक यांची एक अभद्र युती सध्या शिक्षण क्षेत्रास नाचवताना दिसते. चार पसे हातात खुळखुळू लागलेल्या नवमध्यमवर्गास याची चाड नाही. बाजारात पसे फेकून काहीही विकत घेण्याची सवय लागलेला हा समाज तसेच चार पसे फेकून आपल्या पाल्यांसाठी गुणवत्तादेखील विकत घेण्यास सोकावलेला आहे. आपल्या पाल्याने काहीही करून यशस्वी होत राहणे हेच या वर्गासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे काही लाख रुपये खासगी शिकवण्यांवर खर्च करावयाची तयारी असलेला हा वर्ग असे निकाल आपल्या बाजारपेठीय कौशल्यास मिळालेली पोचपावती मानू लागतो.
आपल्याकडे नेमके तेच होताना दिसते. अशा व्यवस्थेत आपल्या मुला/मुलीस काय आवडते याचा विचार पालक करीत नाहीत आणि आपण शिकवतो म्हणजे काय, हा प्रश्न शिक्षकांना पडत नाही. एके काळी परीक्षांत अनुत्तीर्ण होणाऱ्यांच्या भविष्याविषयी काळजी वाटे. आता ती उत्तीर्ण होणाऱ्यांविषयी वाटते.