इंदरकुमार गुजराल हे राजकारणातील चमकदार व्यक्तिमत्त्व नव्हते. परंतु, काही वेळा अशा व्यक्ती काही कायमस्वरूपी काम करून जातात. गुजराल यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत असे कायमस्वरूपी काम केले. ते वर्षभरसुद्धा पंतप्रधानपदावर राहिले नाहीत, पण या काळात आणि त्याआधी परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला महत्त्वाची दिशा दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील सभ्य व सुसंस्कृत राजकारणाची झलक गुजराल यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असे. पालिका राजकारणापासून पंतप्रधानापर्यंत सर्व पदांवर त्यांनी काम केले असले तरी मस्तवाल राजकारणाचा स्पर्शही त्यांनी स्वत:ला होऊ दिला नाही. त्यांनी अनेक खाती सांभाळली. परंतु परराष्ट्र राजकारण हाच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता व तेथेच त्यांनी ठसा उमटविला. इंदिरा गांधींनी त्यांना योग्य वयात हेरले व त्यांच्यावर निरनिराळ्या जबाबदाऱ्या टाकल्या. आणीबाणीच्या काळात संजय गांधींचा मस्तवालपणा त्यांनी खपवून घेतला नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. ते मोजके बोलत, पण त्यामध्ये खोल अर्थ असे. अफगाणिस्तानमधील घुसखोरी महागात पडणार आहे असा इशारा त्यांनी रशियाला दिला होता व तो खरा ठरला. विश्वनाथ प्रताप सिंग व देवेगौडा यांच्या काळात परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना त्यांना काही अडचणीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. परंतु, श्रीलंकेतील सैन्य परत घेण्याचा त्यांचा निर्णय पुढे योग्य ठरला. पंतप्रधान होताच त्यांनी परराष्ट्र धोरणाचे सुकाणू आपल्याला हवे तसे वळवून घेतले. बडय़ा राष्ट्रांच्या कह्य़ात न जाता शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यावर त्यांनी भर दिला. पाकिस्तानबरोबर सलोख्याचे व्यवहार करायला प्राधान्य दिले. माले येथे नवाझ शरीफ यांच्याबरोबर झालेली बैठक फलदायी ठरली. फक्त पाकिस्तानच नव्हे तर चीन, नेपाळ व बांगलादेश या देशांशी संबंध सुधारण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. बांगलादेशबरोबर पाणीवाटपाचा करार घडवून आणला. पाकिस्तानबाबत त्यांनी दाखविलेल्या उदार धोरणावर बरीच टीका त्या काळी झाली होती. परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयातील गट त्यांच्याविरोधात गेले होते. परंतु, गुजराल आपल्या धोरणावर ठाम राहिले. पुढे वाजपेयी यांनी तीच भूमिका घेतली, इतकेच नव्हे तर नवाझ शरीफ यांच्याशी बोलताना गुजराल यांचेच शब्द वापरले. नरसिंह राव यांनी पूर्वेकडील राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला होता. त्या धोरणाला गुजराल यांनी निश्चित दिशा दिली व आज मनमोहन सिंग तेच धोरण राबवीत आहेत. राजकारणात असूनही गुजराल व्यासंगी होते. उर्दू काव्यावर त्यांचे प्रेम होते. साहित्यिकांमध्ये त्यांची ऊठबस असे. भाषेवरील त्यांची पकड परराष्ट्र खात्यात उपयोगी पडे. व्यासंगी असूनही अहंकाराचा स्पर्श झालेला नव्हता. यामुळे सर्व पक्षांत त्यांना मित्र मिळाले. नेहरूंच्या काळाचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसत असे. पाश्चात्त्य साहित्य व विचारधारा पचवूनही त्यांनी भारतीयत्व गमावले नव्हते. त्यांच्या अनौपचारिक बोलण्यात पंजाबी शब्द सहज येत. शालीन, सुसंस्कृत, व्यासंगी राजकारणी पाहण्याची सवय आता राहिलेली नाही. मुत्सद्दय़ांचे महत्त्व आपल्या देशाला लवकर कळत नाही आणि त्यामुळे त्यांची दखलही घेतली जात नाही. यामुळे गुजराल लोकप्रिय झाले नाहीत. परंतु, आशियातील मित्र राष्ट्रांमध्ये भारताबद्दल विश्वास निर्माण करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची व ऐतिहासिक भूमिका बजावली.