तत्त्वशून्य राजकारणाच्या काळातही तत्त्वाधिष्ठित  राजकारण न सोडणाऱ्या  सा. रे. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळे बारकावे पूर्णतया जाणलेला एक जाणता विचारवंत, कर्तृत्वसंपन्न राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाच्या ९४ व्या वर्षांपर्यंत आपले सारे जीवन समाजासाठी वेचलेल्या सा. रे. पाटील यांना आयुष्याने खूप वेगवेगळे अनुभव दिले. त्यातून त्यांना जे शिकायला मिळाले, ते फार थोडय़ा जणांच्या वाटय़ाला येऊ शकेल. समाजवादी विचारसरणी अनुसरताना राजकारणही करायचे, तर नीतिमूल्यांपासून दूर जाता येत नाही, हे जाणलेल्या पाटलांनी १९५७ पासून ते १९९० पर्यंत अपक्ष राहून निवडणुका जिंकण्याचा विक्रम करून दाखवला, याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रांजळपणा हे होते. समाजात काही चांगले घडण्यासाठी आपली प्रत्येक कृती कारणीभूत ठरायला हवी, असा हट्ट त्यांनी आयुष्यभर धरला. त्यासाठी कोणत्याही तडजोडीला जागा दिली नाही. राजकारणाच्या प्रारंभीच्या काळातील विचारांची लढाई अखेरच्या पर्वात संपलेली जाणवल्याने व्यथित झालेल्या पाटलांनी आपले सारे आयुष्य संस्थात्मक कार्यात व्यतीत केले. राष्ट्र सेवा दलाचा जातिनिर्मूलनाचा कार्यक्रम असो, की धर्मनिरपेक्ष विचारांसाठीचा कृती कार्यक्रम असो,    सा. रे. पाटील यांनी त्यातून आपल्या जगण्यासाठी मोठी शिदोरी प्राप्त केली. राजकारण हा तसा न परवडणारा विषय आहे. त्याच्याकडे जेव्हापासून परवडण्याचे साधन म्हणून पाहिले गेले, तेव्हापासून आपले राजकारण तत्त्वांपासून आणि समाजहितापासून दूर लोटले गेले, असे त्यांना वाटत असे. एखादा परिसर व्यक्तीच्या नावाने ओळखला जाण्याचे भाग्य फार थोडय़ांच्या वाटय़ाला येते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुका हा सा. रे. पाटील यांची कर्मभूमी होती. श्रीदत्त सहकारी साखर कारखाना हे त्यांच्या कर्तृत्वाचे सुखनिधान. नव्या तंत्रज्ञानाला सचोटीची जोड देऊन त्यांनी हा कारखाना आदर्श होण्यासाठी अविरत कष्ट केले. कारखान्यातील कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी त्यांनी अमलात आणलेल्या विविध योजना म्हणजे त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष आविष्कार होता. कारखान्याबरोबर बँक, शिक्षणसंस्था,  रुग्णालय अशा अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीला घरघर लागली असताना, पाटील यांच्यासारख्या धुरंधरांमुळे काही आशा वाटावी, अशा परिस्थितीत त्यांचे निधन होणे ही चळवळीचीच मोठी हानी आहे. ‘साधना’ साप्ताहिकाच्या जडणघडणीतील त्यांचा वाटाही असाच  मोलाचा. नव्या विचारांना आडकाठी न करता, ते समजावून घेत आपलेसे करण्याएवढी बौद्धिक क्षमता फारच थोडय़ा नेत्यांपाशी असते. सा. रे. पाटील हे त्याला अपवाद होते. आपण काही चुकीचे करायचे नाही, चांगले काम घेऊन पुढे जायचे ही त्यांची अंत:प्रेरणा होती. शेतीचे तंत्रज्ञान समजावून घेता घेता त्यात नवे प्रयोग करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. जगभर हिंडून मिळवलेली माहिती भारतीय संदर्भात कशी उपयोगी पडू शकेल, याचा विचार करून त्यांनी केलेले प्रयोग यशस्वी झाले. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अशा तिन्ही पातळ्यांवर सा. रे. पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने स्वच्छ चारित्र्याचा ध्यास धरलेल्या एका अस्सल राजकारण्याचा अंत झाला आहे.