News Flash

अरबस्तान व इस्लाम धर्म

जगातील अनेक देश ही ‘इस्लामधर्मीय राष्ट्रे’ आहेत. त्यातील अनेक देशांमध्ये लोकशाही असलीच तर ती केवळ देखाव्यापुरती असून ते मानवी हक्कांचा मानही राखीत नाहीत.

| June 1, 2015 12:24 pm

जगातील अनेक देश ही ‘इस्लामधर्मीय राष्ट्रे’ आहेत. त्यातील अनेक देशांमध्ये लोकशाही असलीच तर ती केवळ देखाव्यापुरती असून ते मानवी हक्कांचा मानही राखीत नाहीत. कुराणातल्या ‘बहुविधता’ या तत्त्वाला नाकारून ते धर्मनिरपेक्षतेला हराम म्हणजे पाप मानतात..
इस्लाम हा धर्म अरबस्तानात स्थापन झालेला असून नंतरच्या काळात जगभर पसरून आज लोकसंख्येच्या मापाने जगात तो ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल नंबर दोनचा व जगातील एक महत्त्वाचा धर्म बनलेला आहे. भांडखोर, दुराचारी व बहुदेवतांचे मूर्तिपूजक असलेल्या व दैन्य, दास्य, मद्यपान वगैरे दोषांनी जर्जर झालेल्या अरबी टोळ्यांमध्ये, ईश्वरनिष्ठ महंमदाने, निर्भयपणे एकेश्वरवादाचा प्रचार करून त्यांना शिस्त लावून सुसंस्कृत केले. महंमदचा अर्थ प्रशंसित असा असून त्याचा जन्म मक्केत कुरेशी नावाच्या प्रतिष्ठित जमातीत, पण गरीब घरात इ.स. ५७० मध्ये झाला. आई-वडील लहानपणीच वारल्याने त्याचा चुलता व आजोबा यांनी त्याचे संगोपन केले. महंमद हा अशिक्षित, पण चिंतनशील वृत्तीचा आणि अत्यंत प्रामाणिक म्हणून सर्वानी नावाजलेला माणूस होता. लहान वयातच नोकरीच्या निमित्ताने त्याने सीरियापर्यंत प्रवास केला होता व तिथे ज्यू व ख्रिस्ती धर्मगुरूंबरोबर त्याचा संबंध आला होता. काही काळ मेंढपाळ म्हणून काम केल्यानंतर त्याने मक्केतील खदिजा नावाच्या एका श्रीमंत व घरंदाज विधवेकडे नोकरी केली. ती त्याच्याहून पंधरा वर्षे मोठी होती. पुढे तिने महंमदाच्या रूपगुणविचारांनी प्रभावित होऊन त्याच्याशी लग्न केले. मक्केजवळील एका गुहेत एकटाच बसून तो ईश्वराचे चिंतन करीत असे. चिंतनातून अंतर्मुख होत होत, त्याच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी ईश्वराने त्याला ज्ञानप्राप्तीसाठी निवडले असे मानले जाते. त्यातून त्याने इस्लाम धर्म स्थापन केला. खदिजा त्याची पहिली शिष्या झाली. इस्लामचा अर्थ ईश्वराज्ञापालन (विनोबांच्या भाषेत ‘हरिशरणता’) असा असून ‘ईश्वरावरील अविचलित श्रद्धा’ हेच इस्लाम धर्माचे मूलतत्त्व आहे. नंतर महंमदाला ‘रसूल’ म्हणजे अल्लाचा दूत म्हणजेच ईश्वराचा प्रेषित (पैगंबर) मानले जाऊ लागले. इस्लाम धर्माचे अनुयायी जगात मुसलमान म्हणून ओळखले जातात व कुराण हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. ज्ञानप्राप्तीनंतर भावविवश अवस्थेत तेवीस वर्षे महंमद जे बोलत गेला त्याचे संकलन त्याच्या मृत्यू (इ.स. ६३२) नंतर करून कुराण बनलेले आहे. कुराण हा ईश्वर अल्लाचा शब्द (अपौरुषेय) आहे, असे इस्लाम धर्मात मानतात आणि मूर्तिपूजा हे पाप मानतात.
अल्ला हा अनेक देवांपैकी महत्त्वाचा देव नसून  ‘एकमेव’ (एकमेवत्वावर भर) देव आहे. कुराणातील अल्ला ज्यू व ख्रिस्ती धर्मीयांचा एकमेव ईश्वराहून काहीसा वेगळा आहे तरी स्वर्ग, नरक, सैतान, आत्मा, सृष्टिनिर्मिती, सृष्टीचा शेवट इत्यादी कल्पना कुराणाने बव्हंशी जुना करार व बायबलवरूनच घेतलेल्या दिसतात. ज्यूंचे प्राचीन प्रेषित व ख्रिश्चनांच्या येशूलाही ते प्रेषितच मानतात; पण येशूला ते ईश्वराचा पुत्र मानीत नाहीत. त्यांच्या मते ईश्वराला पुत्र असणे शोभत नाही. इस्लाम धर्मातही आदम व ईव्ह ही दोघे ईश्वरनिर्मित आदिमानव आहेत. ईश्वराने सहा दिवसांत आकाश, तारे, ग्रह यांसह पृथ्वीवरील सर्व सृष्टी आणि सात स्वर्ग वगैरे निर्माण केले. ईश्वराने माणसाची निर्मिती काळ्या मातीपासून किंवा ‘गोठलेल्या रक्तापासून’ केली आणि पुरुष व स्त्री यांना एकाच आत्म्यापासून (वेगवेगळ्या आत्म्यांपासून नव्हे) निर्माण केले, असे कुराणात सांगितले आहे. कुराणात आत्म्याचा उल्लेख आहे, पण त्याचा विशेष ऊहापोह नाही. इहलोकीचे जीवन म्हणजे खेळ असून, परलोकीचे जीवन हेच खरे जीवन आहे, असे कुराण सांगते. प्रेषित महंमद हा आयुष्यभर अल्लाच्या प्रेमाने भारावलेला असूनही त्याने स्थापिलेला धर्म हा आज जगातील एक महत्त्वाचा ‘प्रवृत्तीपर’ धर्म आहे. त्यात संन्यास, ब्रह्मचर्य किंवा संसारत्यागाचा उपदेश नाही. मात्र इतर सर्व धर्माप्रमाणे त्यात सद्विचार व सदाचाराचा भर देऊन उपदेश आहे.
ज्यू धर्माने मध्येच स्वीकारलेले ‘सैतान’ हे पात्र (कॅरॅक्टर) ख्रिस्ती धर्मात आले तेव्हा त्याचे सामथ्र्य कमी करून त्याला घेतले गेले व त्याला आकाशातील बापाबरोबर लढण्याएवढे सामथ्र्य न ठेवता, त्याला त्याच्या आज्ञेत आणले गेले. नंतर आलेल्या कुराणानेसुद्धा ‘दुष्टाव्याचा कर्ता’ म्हणून ‘सैतान’ ही संकल्पना स्वीकारली खरी, पण इब्लिस हे नाव देऊन व त्याचे सामथ्र्य आणखी कमी करून त्याला घेतले. कुराणातील सैतान हा अल्लाच्या नोकरासारखा असून, अल्लानेच त्याला दुष्ट कर्मे करण्याची परवानगी (हुकूम) दिलेला आहे, असे कुराण सांगते. ख्रिस्ती व इस्लाम या दोन धर्मातील ईश्वरांमध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की, ‘आकाशातील बाप’ हा प्रेमळ व दयाळू असून ‘अल्ला’ हा कडक न्यायदाता स्वामी, मालक असून आपण त्याचे सेवक आहोत.
महंमदाने अरब टोळ्यांमधील भ्रामक व अनीतिमान चाली नष्ट करून, टोळीगणिक बहुदेवता मानण्याऐवजी, त्यांना एकेश्वरवाद शिकवून त्यांच्यात एक सामाजिक, सांस्कृतिक उत्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांच्यात ज्ञानार्जनाची आस्था निर्माण होऊन तिथे एक सांस्कृतिक अभिसरण घडून आले. एका अशिक्षित माणसाने ‘विद्याभिरुची वाढविली’ हे म्हणणे काहीसे चमत्कारिक वाटत असले तरी ते पूर्णत: खरे आहे. अरेबियातील वाङ्मयीन प्रगती काव्य आणि इतर साहित्य प्रकारांचा उदय कुराणाबरोबर किंवा त्यानंतर मागोमाग झालेला असून, या चळवळींतून अनेक उत्कृष्ट ग्रंथांची उत्पत्ती झाली हे मत आता विद्वतमान्य आहे. अरबी भाषा ही ग्रीक, हिब्रू किंवा संस्कृत भाषांसारखी प्राचीन भाषा नसून, तीत कुराणपूर्व काळात धड व्याकरणही नव्हते व काही ग्रंथही नव्हते. महंमदानंतर त्या भाषेची सर्वागाने वाढ झाली. इ.स.च्या आठव्या शतकात हारून-अल्-रशीद व इतरांनी परदेशातून विद्वान लोक आणून त्यांच्याकडून ग्रीक, संस्कृत इत्यादी भाषांतील ग्रंथांची अरबी भाषांतरे करवून घेतली. अंकगणित, खगोलशास्त्र, संगीत, रसायन, वैद्यक, तर्कशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादी विषयांचे ज्ञान अरबांनी भारतीय पंडितांकडून मिळविले व ते युरोपियन लोकांना दिले. ख्रिस्तपूर्व ग्रीक संस्कृतीतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल यांच्याही ग्रंथांची त्यांनी भाषांतरे करून घेतली. अरबांनी करून घेतलेल्या ग्रीकादी विद्वानांच्या ग्रंथांमुळे व अरबांशी आलेल्या संबंधांमुळेच, पुढील काही शतकांनंतर युरोपात झालेले विद्येचे पुनरुज्जीवन (रिनेसन्स) घडू शकले, ही गोष्ट आता सर्वमान्य झालेली आहे. अशा प्रकारे पश्चिम आशिया व दक्षिण युरोप या खंडप्राय भूभागाला एक नवी दृष्टी देण्यास महंमद हा अशिक्षित, पण सदाचरणी माणूस मूळ कारण ठरला हे आज सर्वमान्य ऐतिहासिक सत्य आहे.
महंमद पैगंबरच्या मृत्यू (इ.स. ६३२) नंतरची दोन शतके अरबांनी पूर्व व पश्चिम अशा दोन्ही दिशांना जोरदार आक्रमणे करून दक्षिण युरोपात अगदी स्पेनपर्यंत आणि मध्य आशियातील बहुतेक देशांवर जुलमाने धर्मप्रसार करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर इ.स. १२२९ पर्यंत चाललेल्या ख्रिश्चनांच्या धर्मयुद्धांनी (क्रुसेड्सनी) इस्लामला तुर्कस्तानपर्यंत रेटत आणले. त्यापूर्वी इ.स. ७०८ मध्ये महंमद कासीम या अरबी सेनापतीने भारतातील सिंध प्रांत जिंकला. त्याच्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी गझनीच्या महंमदाने लूटमार, मूर्तिभंजन व अत्याचार करण्यासाठी भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. आणखी पुढे दोनशे वर्षांनी इ.स. ११९२ मध्ये महंमद घोरीने पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करून, दिल्लीचे तख्त काबीज करून तिथे स्वत:चे राज्य स्थापन केले. त्याच्यानंतरची ५०० वर्षे वेगवेगळ्या मुसलमान सुलतानांनी भारतात राज्ये केली. गझनीचा महंमद, नंतर आलेले घोरी व पुढचे मोगल हे सर्व तुर्क होते, अरब नव्हे. अनेक मुसलमान सुलतानांनी व त्यांच्या सैन्यांनी भारतात केलेल्या जुलूम-जबरदस्तीमुळे येथील हिंदू लोकांत इस्लामबद्दल तिटकारा निर्माण झाला. ते राहो.
आधुनिक काळात जगातील अनेक देश ही ‘इस्लामधर्मीय राष्ट्रे’ आहेत. त्यातील अनेक देशांमध्ये लोकशाही असलीच तर ती केवळ देखाव्यापुरती असून, ‘नागरी समाज’ (सिव्हिल सोसायटी) ही संकल्पना ते देश मानीत नाहीत व ते मानवी हक्कांचा मानही राखीत नाहीत. कुराणातल्या ‘बहुविधता’ या तत्त्वाला नाकारून ते धर्मनिरपेक्षतेला हराम म्हणजे पाप मानतात, म्हणजे आधुनिक मानवतावादी विचार ते मानीत नाहीत. अनेक इस्लामिक देशांमध्ये भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य वगैरे स्वातंत्र्ये अस्तित्वात नाहीत, तसेच या बहुतेक देशांमध्ये स्त्री जीवन अन्यायग्रस्त असून तेथील स्त्रिया असाहाय्य आहेत, तसेच लहानसहान गुन्ह्य़ांना क्रूर शिक्षा देणे आणि ‘ऑनर किलिंग’सारख्या दुष्ट प्रथांना इस्लामची अनुमती नसूनही अनेक देशांत या प्रथा अस्तित्वात आहेत व त्यांचे मुल्ला-मौलवी त्यांना उघड किंवा छुपा पाठिंबा देत आहेत. शिवाय ‘सुन्नीविरुद्ध शिया’ असे एक-दुसऱ्यांवर भयंकर अत्याचारही आधुनिक काळात अनेक इस्लामिक देशांत (पण भारतात नव्हे) सातत्याने होत आहेत. काळाशी सुसंगत असे नवविचार स्वीकारायला इस्लामचे मुल्लामौलवी तयार नाहीत, असे आज जगभर दिसून येते.
एवढेच नव्हे तर काही इस्लामिक देशांमध्ये तालिबान, अल कायदा, इसिस, बोकोहराम वगैरेंसारख्या कट्टर दहशतवादी संघटना तयार होऊन त्या जगभर दहशत पसरवून निष्पाप लोकांना, बालकांना, स्त्रियांना छळ करून ठार मारीत आहेत. त्यामुळे इस्लाम, क्रौर्य, युद्धखोरी व दहशतवाद ही एकच आहेत असे जगाला वाटू लागलेले आहे. खरे तर सर्वसाधारण मुसलमान स्त्री-पुरुषांना इतर धर्मीयांप्रमाणे शांततापूर्ण जीवन हवे असते; परंतु त्यांच्यातील कट्टरतावाद्यांना मात्र ‘आपण वेगळे आहोत, ईश्वराचे कार्य करीत आहोत व त्याबद्दल मृत्यूनंतर आपणाला सर्व सुखाचा स्वर्ग मिळणार आहे,’ अशी श्रद्धा त्यांच्यात बिंबवली जात असल्यामुळे जगभर ‘इस्लामिक दहशतवाद’ पसरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:24 pm

Web Title: arabistan and islam religion
टॅग : Islam
Next Stories
1 समाजसुधारक
2 फुले, आगरकर
3 संतांना निरोप
Just Now!
X