हास्यचित्रे किंवा व्यंगचित्रे जे भाष्य एका चित्रातून करतात ते एका अग्रलेखाइतके टोकदार असते असे म्हणतात. हास्यचित्रांची परंपरा फार जुनी आहे. त्यात हास्यचित्र मालिका हा प्रकार रूढ असून ‘आर्ची’ या मालिकेतून अमेरिकेत जिवंतपणीच दंतकथा बनलेले हास्यचित्रकार टॉम मूर यांच्या जाण्याने आर्ची अँड्रय़ूज व त्यांची सवंगडी मंडळी त्याचबरोबर या मालिकेचे चाहते दु:खी झाले असतील तर त्यात नवल नाही.
१९५३ ते १९८० असा बराच मोठा काळ त्यांच्या या चित्रमालिकेने लोकांवर गारुड केले होते. मूर यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्या पात्रासारखेच गमतीदार होते. ऑल स्टार कॉमिक्स अँड गेम्सचे मालक ब्रॅड विल्सन यांच्या मते मूर यांनी हास्यचित्र मालिकांच्या पुस्तकांचे जग प्रभावित केले आहे. मूर हे मूळ टेक्सासमधील एल पासो येथील होते. ते ऑस्टिन हायस्कूलमधून पदवीधर झाले. नंतर कोरियन युद्धाच्या वेळी ते नौदलात काम करीत असताना जहाजाच्या कप्तानाची करमणूक करण्यासाठी ते हास्यचित्रे काढीत असत. त्यातून त्यांच्यातील हास्यचित्रकार आकार घेत गेला. नंतर कप्तानाने त्यांना कार्यालयात बोलावले तेव्हा ते घाबरले होते, पण त्यांनी मूर यांना हास्यचित्रकाराची नोकरी दिली. लष्कराच्या प्रकाशनांमध्ये त्यांनी ‘चिक कॉल’ ही हास्यचित्र मालिका काढली होती. नौदलाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क येथे कार्टुनिस्ट अँड इलस्ट्रेटर स्कूल येथे हास्यचित्रांचे रीतसर प्रशिक्षण घेतले.
त्यावेळी ‘टारझन’ या मालिकेचे बर्न होगार्थ हे त्यांचे गुरू होते. बॉब मोंटाना यांनी १९४१ मध्ये ‘आर्ची’ सुरू केले व नंतर मूर यांनी अमेरिकेतील किशोरवयीन मुलाचे पात्र त्यात रंगवले व १९५३ पासून त्यात वेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या. त्यात १९३० मधील अँडी हार्डी चित्रपटांचा प्रभाव होता. त्यांच्या आर्ची हास्यचित्रांची मालिका एल पासो कलासंग्रहालयात १९९६ मध्ये मांडण्यात आली होती. अंडर डॉग व मायटी माऊससाठीही त्यांनी काम केले. १९६०च्या सुमारास त्यांनी केलेल्या हास्यचित्रांच्या पुस्तकांचा खप ५० हजारांवर होता.
१९८० मध्ये त्यांनी ‘जगहेड’ ही मालिका केली. निवृत्तीनंतर त्यांचे आर्ची हे पात्र संपले. त्याचे त्यांना फार शल्य होते. त्याचबरोबर आर्ची या पात्राला वैश्विक मान्यता होती याचा अभिमानही होता. कुठल्याही कथेला चपखल बसतील अशी व्यंगपात्रे असावीत, पण त्यांचा स्वभाव सातत्यपूर्ण असावा. ‘बेट्टी हे पात्र व्हेरोनिका होऊ शकत नाही, तर चार्ली ब्राऊन ल्यूसीसारखे असू शकत नाही’ असा कानमंत्र त्यांनी देऊन ठेवला आहे.