पर्यावरण, यंत्रयुग, चंगळवाद यांच्याबाबत असेच मार्गदर्शन करीत स्वामी विवेकानंद उभे आहेत. पर्यावरणाचा आदर करा. मात्र, मानवी प्रगतीला खीळ घालणारा त्याचा अतिरेक टाळा हे त्यांनी सांगितलंय. यंत्रे हवीत पण यंत्रांनी मानवी सर्जनशीलतेला हद्दपार करता कामा नये. विज्ञान तंत्रज्ञान यामुळे वस्तूंची विपुलता येईल. त्यामुळे चंगळवाद येईल व माणसे आत्मकेंद्री बनतील, असेही त्यांनी म्हटले होते. १२ जानेवारी रोजी त्यांची १५० जयंती आहे. त्यानिमित्त..

विवेकानंद काळाच्या खूप पुढे आहेत. आपल्यासमोरच्या आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करीत, त्यांची उत्तरे शोधत त्यांनी ती आपणाला सांगितली. विवेकानंदांचा जन्म १८६३ मधील. म्हणजे ते लोकमान्य टिळकांच्याहून सात वर्षांनी लहान आणि महात्मा गांधींच्याहून सहा वर्षांनी मोठे आहेत. १३ वर्षांच्या कालखंडात हे तीन महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवलेत. आणखी एक आहे, या तिघांचाही जन्म १८५७च्या ‘देदीप्यमान अपयशाच्या’ पाश्र्वभूमीवर झालाय. १८५७ हे अपयश तर खरेच, पण ते देदीप्यमान आहे. हा देश सहजपणे काही विलक्षण कसे करू शकतो आणि सहजपणे अपयश कसे मिळवू शकतो हे १८५७ सांगते. या तिघांच्याही बालपणात त्यांच्या ज्ञात, अज्ञात मनावर १८५७ ची स्पंदने उमटली असणार. एक तर नक्की, जुने सर्व मार्ग संपलेत. नवी परिस्थिती समजावून घेत, नवे मार्ग शोधत, नव्या रचना मांडत, अंधारात चाचपडत पुढे जायला हवे, हे या तीनही महामानवांना जाणवले असणार.
या देशातील जाती व्यवस्था, हिंदू-मुसलमान प्रश्न, रूढी, अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्रय़ या सर्वातून मार्ग काढत या देशाला स्वातंत्र्य मिळवायला आणि मिळवलेले स्वातंत्र्य टिकवायला त्यांना सक्षम बनवायचं. तिघांचेही मार्ग वेगळे आहेत आणि लोकमान्य आणि महात्मा यांच्यामधील गुरुत्वमध्य शोधीत विवेकानंद उभे आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण आजही गोते खातोय. त्याची विलक्षण वेगळी मांडणी करीत विवेकानंद उभे आहेत. विवेकानंद १०० टक्के आरक्षण मागतात. सर्वधर्म परिषदेतील भाषण संपवून परत आल्यावर विवेकानंदांची ‘कोलंबो ते अलमोरा’ अशी विजयरथ यात्रा सुरू आहे. विवेकानंद तामिळनाडूमधील कुंभकोणमला आलेत. कुंभकोणम हा सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला. त्यांच्यासमोर भाषण देताना ते सांगतात, ‘ब्रह्मवृंदहो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्युघंटा वाजवायला मी येथे उभा आहे. आपल्या जाती जर लवकर संपल्या तर त्या सुखाने मरतील. नाहीतर त्या कुजतील. आपल्याला व समाजाला फार त्रास होईल. आपण ही जात संपवण्यासाठी फक्त एक गोष्ट करू या. आम्ही उच्चवर्णीय आहोत. अर्थार्जनासाठी एकही नोकरी करणार नाही, असे सांगून अर्थार्जनाच्या सर्व नोकऱ्या दलितांसाठी मोकळ्या करू या. आता दलित आमच्याएवढे हुशार नाहीत, हा विचार तुमच्या मनात असणार. तो खरा आहे. दलित आज तुमच्याएवढे हुशार नाहीत, कारण आपण त्यांना कायम ज्ञानापासून वंचित ठेवले. त्यांना घृणास्पद वागणूक दिली. त्यामुळे तुम्हाला आज एक शिक्षक लागत असेल, तर दलितांना सात शिक्षक लागतील आणि ती सोय आपण केली पाहिजे.’ त्याचवर्षी आपला मित्र राखाल (ब्रह्मानंद) याला पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘निसर्गात समता नाही, असे कोणी म्हणत असेल, तर ती आणण्यासाठी आपला जन्म आहे. म्हणजे ब्राह्मण मुलाला एक शिक्षक लागत असेल, तर दलित मुलाला दहा शिक्षकांची गरज आहे, हे आपण ओळखले पाहिजे व तशी सोय केली पाहिजे.’
मात्र, हे सांगणारे विवेकानंद, ‘ब्राह्मण ब्राह्मणेतर’ वाद खेळत नाहीत, ते ‘शिवधर्मा’च्याही जवळ जात नाहीत. ते सांगतात, ‘आज दक्षिणेत ब्राह्मणद्वेषाची जी लाट आली आहे, ती थांबली पाहिजे. ब्राह्मणांना शिक्षण मिळाले, त्याचा फायदा समाजाला झाला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाला पुढे आणण्यासाठी काही ब्राह्मण तरुण आज उभे आहेत. आपल्याला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवायचे नाही. आपण जातीअंताची लढाई लढणार आहोत.’
पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना समान हक्क मिळणार नाहीत, तो समाज उभा राहूच शकणार नाही, असे सांगणाऱ्या विवेकानंदांनी अमेरिकेत पोचल्यावर आपल्या शिष्यांना पत्र पाठवून कळवले, ‘अमेरिका समृद्ध आणि प्रगत आहे. कारण येथील स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निर्भयपणे उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मी जर मृत्यूपूर्वी अशा १०० स्त्रिया भारतात निर्माण करू शकलो, तर मी सुखाने मरेन.’ आणि हे जमणार नाही, हे लक्षात आल्यावर मार्गारेट नोबेलला म्हणजे भगिनी निवेदितांना पत्र पाठवून त्यांनी लिहिले, ‘स्त्रियांच्यामध्ये जाऊन, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन, त्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचे काम फक्त स्त्रियाच करू शकतील. आज हे काम करू शकणाऱ्या स्त्रिया मला भारतात दिसत नाहीत. त्यामुळे असे काम करण्यासाठी आज मी अमेरिकेकडून असे काम करण्यासाठी स्त्रिया उसन्या घेत आहे. तू व ख्रिस्तीन यांनी येथे येऊन हे काम सुरू करा.’
स्त्री समानता म्हणजे काय हे विवेकानंद अनेकदा रेखांकित करतात. रजस्वलेने मंदिरात जाऊ नये, म्हणून सांगत आजही धर्ममरतड उभे आहेत. विवेकानंद खूप पुढे गेलेत. ते पत्रातून आपल्या शिष्यांना विचारतात, ‘दक्षिणेश्वरच्या मंदिरात तुम्ही वेश्यांना प्रवेश देत नाही, हा भयावह प्रकार आहे. मग वेश्येकडे जाणाऱ्या पुरुषांचे काय करणार? देवी, आई, बहीण, गृहलक्ष्मी आणि मुलगी या रूपांत असलेली स्त्री कधीच अपवित्र नसते. काही अपवित्र पुरुष तिला अपवित्र बनविण्याचा प्रयत्न करून बघतात एवढेच काय ते! मंदिर सर्वासाठी आहे. थकलेल्या, भागलेल्या, पीडित बनलेल्या या आपल्या अभागी बहिणींना तर देवाच्या आधाराची अधिक गरज आहे. त्यांच्यासाठी मंदिरे मोकळी करा आणि ते जमत नसेल तर मंदिराला कुलूप लावून मोकळे व्हा!’
या देशाचा अभ्युदय करावयाचा असेल, तर केवळ हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे, तर त्यांचा समन्वय हवा, हे त्यांनी आग्रहाने सांगितले. तसा तो करावयाचा असेल, तर या दोन गोष्टी समजावून घ्या म्हणून सांगितले, पहिली गोष्ट ही की, ‘या देशातील धर्मातरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. धर्मातरित मुसलमान हे आपण ज्यांच्यावर अनेक शतके पाशवी अत्याचार केलेत, असे आपले अभागी भाऊ आहेत आणि दुसरी गोष्ट पण समजावून घ्या. इस्लाम हा एक श्रेष्ठ धर्म आहे. व्यवहारात समता फक्त इस्लामने आणली. हे त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतील चर्चमध्ये दिलेल्या भाषणातही सांगितले. ते म्हणाले, ‘तुम्ही ख्रिश्चन लोक इस्लामचा सर्वाधिक द्वेष करता. उद्याचे दोन संस्कृतींमधील सर्वसंहारक युद्ध मला त्यात दिसते आहे. इस्लाम समता प्रत्यक्षात आणतो. एखादा निग्रो गुलाम मुसलमान झाला आणि तो कर्तृत्ववान असेल, तर बादशहाचा जावई होऊ शकतो. मात्र या तुमच्या अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये एकाही चर्चमध्ये अजून निग्रो ख्रिश्चन प्रवेश करू शकत नाही.’
रूढी, अंधश्रद्धा, धर्मातील अनाचार याविरुद्धची लढाई विवेकानंद अपरिहार्य मानतात, पण त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या शिष्यांना ते लिहितात, ‘समाजसुधारणा आणि धर्मसुधारणा करण्याचे बुद्धदेवांपासून राजा राममोहन रॉय यांच्यापर्यंतच्या सर्व परिवर्तनवादी मंडळींचे प्रयत्न फसले. कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपणाला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल. कारण विज्ञान माणसाचे शाश्वत अस्तित्व नाकारते. विज्ञान कितीही खरे किंवा श्रेष्ठ असले तरी विज्ञान माणसाला तू जन्मण्यापूर्वी माती किंवा मातीतून बनलेले एक रसायन होतास आणि मृत्यूनंतर तू माती बनून कायमचा नाहीसा होणार आहेस म्हणून सांगते. याउलट सारे धर्म माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून उभे असतात. माणसांना म्हणून ते हवे असतात. धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तींवर आघात करण्याचे काम विवेकानंद विलक्षण ताकदीने करतात. राजर्षी शाहू महाराजांचे ‘वेदोक्त प्रकरण’ झाले १८९९च्या चातुर्मासात. त्याच्या दहा वर्षे आधी या येणाऱ्या वादळाचा अंदाज घेत त्याची स्पंदने झेलत विवेकानंद उभे आहेत. १८९९ मध्ये पूज्यपादांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आमच्या वेदांनी शुद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही, असे कुठेच म्हटलेले नाही. ती नंतर व्यासांनी आणि शंकराने (म्हणजे शंकराचार्यानी) खेळलेली खेळी आहे.’ १९८४ मध्ये मुदलियार यांना पत्र पाठवून त्यांनी पुन्हा हेच सांगतले.
धर्माचा आधार घेऊन त्यांनी भविष्यावर घणाघाती प्रहार केले. त्यांनी सांगितले, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, असे मानणे हा भंपकपणा आहे. मानवी समाजाचे अपरंपार नुकसान करणारा, मानवी मनाला होणारा तो एक रोग आहे.’ विवेकानंद याच्याही पुढे गेलेत. त्यांनी सांगितले, ‘विज्ञान कार्यकारणभाव मानते म्हणून विज्ञानात चमत्काराला स्थान नाही. धर्मपण कार्यकारणभाव मानतो, त्यामुळे कोणत्याही धर्मात चमत्काराला स्थान नाही. धर्मातील रूपककथांना आणि मिथककथांना माणसांनी चमत्काराचे रूप दिलेय.’
महत्त्वाचे म्हणजे त्यांचा धाकटा भाऊ महेंद्रनाथ १८९५ मध्ये, पाच वर्षांनंतर प्रथमच त्यांना अचानक लंडनला भेटला. त्याला ते म्हणाले, ‘तू मला ओळखलंस? मी धर्माचा वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही.’  आपल्या मठातील शिष्यांना त्यांनी आठवण करून दिली, ‘आपले देव आता जुने झालेत. आपणाला नवा देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपणाला नवा भारत घडवायचा आहे.’
मी समाजवादी आहे. मी संत नाही. मी केवळ हिंदुस्थानचा नाही आणि तुम्हा काही मूर्ख हिंदूंचा तर मुळीच नाही. म्हणून आपल्या शिष्यांना सांगणाऱ्या विवेकानंदांनी पुढे सांगितलंय, ‘मी समाजवादी आहे. मात्र समाजवाद ही परिपूर्ण रचना आहे, असे मी मानत नाही. मात्र मानवजातीने आजवर ज्या रचना शोधल्या आणि वापरल्या, त्यापेक्षा ही अधिक चांगली आहे. म्हणजे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ यामुळे मी समाजवादी आहे. येणाऱ्या समाजवादाला आज कोणीच रोखू शकणार नाही. समाजवाद येईल, तेव्हा शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. दलित, कामगार यांना शिक्षण मिळेल. त्यांचे जीवनमान सुधारेल. समाजातील त्यांचा दर्जा सुधारेल. मात्र या रचनेत मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होईल. असामान्य प्रतिभावान माणसे निर्माण होणार नाहीत. त्यामुळे ही रचनापण येईल आणि कोसळेल. मात्र समाजवाद प्रत्यक्षात आल्यावर त्यातील त्रुटी शोधत आपणाला नवी रचना सापडेल.’- हे सारे विवेकानंदांनी रशियन राज्यक्रांती होण्याच्या २० वर्षे आधी आणि रशियन राजवट कोसळण्याच्या नव्वद वर्षे आधी सांगितल्या!
आपणाला आश्चर्य वाटते. धर्म आणि विज्ञान यांच्यामध्ये उद्या होणारा वेडा अटळ संघर्ष ओळखूून, त्यांच्या समन्वयाची गरज आईनस्टाईनच्या पन्नास वर्षे आधी नेमक्या त्याच शब्दात विवेकानंदांनी सांगितली आहे. विवेकानंद सांगतात, ‘विज्ञानातील नव्या नव्या सिद्धांतामुळे सर्व पुराणमतवादी, स्थीतिप्रिय धर्माचे बुरूज धडाधड कोसळून पडत आहेत. मात्र, यामुळे माणूस धर्म सोडणार नाही, तर धर्माच्या सांगाडय़ाला धर्म म्हणून कवटाळून बसेल. धर्म देवघरातून दिवाणखान्यात येईल. हे टाळले पाहिजे. धर्मानी अतिंद्रीय शक्तीच्या जोरावर सांगितलेले, धर्माचे मूलतत्त्व नसलेले सिद्धांत, पंचेंद्रीयांच्या जोरावर विज्ञानाने सांगितलेल्या सिद्धांतामुळे खोटे ठरत असतील तर धर्माने ते सोडले पाहिजेत. कारण या गोष्टी, कोणत्याही धर्माचा गाभा नाहीत. त्यातून माणसाला माणूस बनवतो तो धर्म ही सर्व धर्माची खरी ओळख आहे. त्यामुळे आज आपणाला सर्वधर्मावर आधारलेला, विज्ञान मानणारा, स्थितिशील नव्हे तर गतिशील धर्म आज हवा आहे. विज्ञान आणि धर्म यांचा समन्वय हवा कारण ‘विज्ञान फक्त का आणि कसे हे सांगते. धर्म त्याला का व कशासाठी हे शिकवेल.’ आणि हे सांगितल्यावर विवेकानंद आणि आईनस्टाईन एकच गोष्ट सांगतात- ‘धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळे आहे!’
पर्यावरण, यंत्रयुग, चंगळवाद यांच्याबाबत असेच मार्गदर्शन करीत विवेकानंद उभे आहेत. पर्यावरणाचा आदर करा. मात्र, मानवी प्रगतीला खीळ घालणारा त्याचा अतिरेक टाळा हे त्यांनी सांगितलंय. यंत्रे हवीत पण यंत्रांनी मानवी सर्जनशीलतेला हद्दपार करता कामा नये. विज्ञान तंत्रज्ञान यामुळे वस्तूंची विपुलता येईल. त्यामुळे चंगळवाद येईल. त्यामुळे माणसे आत्मकेंद्री बनतील. माणसांचे एकमेकांच्यात गुंतणे संपेल आणि त्यामुळे कदाचित मानवी समाजरचना मोडकळीत निघेल, हे ओळखा हे पण त्यांनी सांगितलंय.
विवेकानंदांची भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाबाबतची मांडणी विलक्षण आहे. राणीच्या जाहिरनाम्याप्रमाणे मायबाप सरकार धर्मात ढवळाढवळ करणार नाही. आणि विवेकानंद तर फक्त धर्म बोलताहेत! त्यांना संन्याशांची संघटना उभारायची आहे. मात्र खेडय़ात जाणारा त्यांचा प्रत्येक संन्यासी बरोबर पृथ्वीचा गोल आणि विज्ञानातील प्रयोग घेऊन जाणार आहे. संध्याकाळच्या वेळी गावातील सर्व लोकांना तो पारावर सर्व धर्मातील सूत्रे समजावून देईल. नंतर पृथ्वीचा गोल दाखवून भूगोलाच्या मदतीने त्यांना इतिहास शिकवेल. विज्ञानातील छोटे-मोठे प्रयोग शिकवेल, भोवतालचा निसर्ग वाचायला शिकवेल. प्रकाशचित्रे (मॅजिक लँटर्न) वापरून ज्ञान विज्ञान शिकवेल, ही मांडणी करणारे विवेकानंद सांगतात, ‘आपली खेडी गरीब आहेत. कारण ती अज्ञानी आहेत आणि म्हणून आळशी बनतील. आपण जर त्यांना ज्ञान दिले नाही आणि जगातील सारी संपत्ती लुटून आणून जरी एका खेडय़ात ओतली तरी ते खेडे एका वर्षांत पुन्हा दरिद्री बनेल. या खेडय़ांना ज्ञान, विज्ञान शिकवून समोरचा परिसर वाचावयास शिकवले पाहिजे. – आज काँग्रेसवाले हे द्या, ते द्या, स्वातंत्र्य द्या, असे मागताहेत. असे मागून कधी स्वराज्य मिळेल काय?’ – आणि समजा मिळाले तरी ते आपण सांभाळणार कसे काय?
मला भारतात संन्यासी म्हणून काम करणारे, दहा हजार तरुण सहज मिळतील. पण भारतातील धनिक या कामासाठी दमडी देणार नाहीत. मी अमेरिकेला जातोय. तिथे भाषणे देऊन पैसे मिळवीन आणि ही संन्याशांची संघटना उभी करेन, असे सांगून ते अमेरिकेला गेले. या एकाकी भ्रमंतीत विवेकानंद खूप थकले. त्यातून त्यांना मिळाले फक्त ३९ वर्षांचे आयुष्य. दम्यापासून अनेक जीवघेणे आजार बरोबर होते. मात्र आपणाला फार मर्यादित यश का मिळाले? याचे कारण सांगताना ते म्हणाले, ‘या आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो. एकच माणूस, एकाच आयुष्यात, दार्शनिक म्हणजे विचारवंत, संघटक, नेता, कार्यकर्ता, खजिनदार ही सर्व कामे करू शकत नाही. मी फक्त दार्शनिक आहे. हिमालयात बसून, मी फक्त ही आखीव-रेखीव मांडणी पुढे ठेवायला हवी होती.’
(लेखक हे दिल्ली येथील जागतिक कीर्तीच्या ‘श्रीराम इन्स्टिटय़ूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचे भूतपूर्व संचालक आहेत. ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे त्यांचे पुस्तक वाचकप्रिय आहे.)

lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान