23 February 2019

News Flash

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५३. अनन्तीकरण

मोक्ष किंवा मुक्ती या शब्दांचा मागोवा प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहास’ या ग्रंथाच्या प्रथम खंडात घेतला आहे. त्यात मोक्ष म्हणजे

| November 16, 2012 10:49 am

मोक्ष किंवा मुक्ती या शब्दांचा मागोवा प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहास’ या ग्रंथाच्या प्रथम खंडात घेतला आहे. त्यात मोक्ष म्हणजे अनन्तीकरण, अशी व्याख्या केली आहे. प्रा. जोशी लिहितात, ‘‘मानवाला त्याचा अहंभाव संकुचित व व्यक्तिकेंद्री बनवितो व शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा अनेक बंधनांनी जखडून टाकून स्वार्थी बनवितो. त्यामुळे त्याला अनेक दुखे भोगावी लागतातच पण त्याची सुखे व आनंद परिसीमित, उथळ व तात्पुरते ठरतात. या उलट मोक्ष किंवा मुक्ती त्याला या सर्वातून सोडवून अनंतत्वाचा अनुभव, सुख व आनंद देते. खरी मुक्ती ही मानवाचा लोप, नाश, अस्त नसून त्याचे अनन्तीकरण (infinitisation) असते.’’ आज आपण जीवभावाने जगतो ते जगणं संकुचित, अहंकेंद्रितच असतं. अनेक मर्यादा आणि बंधनांनी आपण जखडलो असतो. जो काही ‘आनंद’ आपल्याला गवसतो तो तात्पुरताच असतो. संताचं जगणं हे या मर्यादा आणि  बंधनांनी जखडलेलं नसतं. भौतिक संपदा त्याच्याकडे नसेलही किंवा नसतेही पण त्याच्या वागण्यात एक प्रसन्नता, एक तृप्ती असते. त्याच्या वावरातील प्रसन्नतेचं, तृप्तीचं, निर्भयतेचं आपल्यालाही आश्चर्य वाटतं. त्यावर तो म्हणतो की तुम्हालाही जगताना अशी प्रसन्नता, अशी तृप्ती, अशी निर्भयता गवसू शकते. त्यासाठी तुमच्या आताच्या ‘मी’पणाच्या भ्रामक बंधनातून तुम्ही मुक्त व्हायला हवं. व्यापक व्हायला हवं. प्रत्येक संताची शिकवण ही व्यापकताच सांगणारी असते. श्रीगोंदवलेकर महाराज जेव्हा म्हणतात की, प्रपंच स्वतचा न मानता रामाचा समजून करा, तेव्हा ही व्यापकताच त्यांना अभिप्रेत असते. प्रपंचातला संकुचित ‘मी’पणा ओसरून तेथे भगवत्कल्पना जसजशी वाढत जाईल तसतसं प्रपंचाचं बंधनही कमी होत जाईल. परमात्म्याचं सिंहासन चित्तात आहे, भावहृदयात आहे. पण तेथे विकारवासनांचा कचरा साठला आहे. तो दूर करा म्हणजे परमात्म्याला तेथे निवास करता येईल, असं सांगितलं जातं, त्यामागेही व्यापकपणाचीच शिकवण आहे. मला माझ्या संपत्तीचा, माझ्या देहगत क्षमतांचा, माझ्या जगण्यातील कथित संपन्नतेचा गर्व वाटत असतो. त्यावर टीका करण्यामागे कबीरांचीही एकमेव इच्छा असते ती ही की या क्षणभंगूर गोष्टीत मर्यादेपलीकडे अडकण्याऐवजी मी त्यांना शाश्वताच्या प्राप्तीकडे वळवावं. कबीर म्हणतात, ‘‘कबीर गर्ब न कीजिये, चाम लपेटे हाडम्। हय बर ऊपर छत्र तर, तौ भी देवैं गाडम्।।’’ बाबारे, तू या देहाचा गर्व करू नकोस. शरीर म्हणजे निव्वळ हाडाला लपेटलेली चामडीच तर आहे! आज तू राजा असशील, भले तुझ्या डोक्यावर छत्रचामरं धरली जात असतील पण जेव्हा तू मृत्यू पावशील तेव्हा तुझा हाच देह याच जमिनीत दफन होणार आहे! थोडक्यात माझ्या सामाजिक स्थितीनुसार माझ्या देहाला कितीही सुखसोयी मिळत असल्या तरी मृत्यूनंतर तो मातीतच मिसळणार आहे.
 

First Published on November 16, 2012 10:49 am

Web Title: aroopache roop satyamargadarshak