यंदा ऑस्कर विजेताही ठरलेला ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह हा चित्रपट, त्यामुळे सुरू झालेली छळ/मुक्तीच्या चित्रपटीय निवेदनांची चर्चा आणि त्याही आधीच्या वर्षांत राजकीय विषयांवरील चित्रपटांनी लक्ष वेधून घेणे, हे सारे लक्षणीय आहे.. या पाश्र्वभूमीवर कुणालाही ‘देशभक्त’ ठरवायला तयार असलेल्या आपल्या कलाकारांचे राजकीय भान चिंताजनक म्हणायला हवे..
कलाकृती म्हणून श्रेष्ठ ठरणारा चित्रपट राजकीय वा सामाजिक पोकळीत जन्मू शकत नाही. आसपासच्या वर्तमानाचे भान चित्रपट कलाकृतीत नसेल तर अशी कलाकृती कितीही लोकप्रिय झाली तरी तिच्यात जीवनरस नसतो आणि त्यामुळे अशा कलाकृतीच्या पाऊलखुणा विशाल कालपटावर उमटतदेखील नाहीत. तेव्हा त्या अर्थाने कलाकारास वर्तमानाचे भान असणे गरजेचे असते. तसे ते नसलेले कलाकार दोन घटका करमणूक करीत नाहीत असे नाही. आपल्याला अशाच करमणुकीची सवय. कारण आपला आसमंत हा चित्रपटाच्या दुनियेतील अशा दीडदमडीच्या कलावंतांनी भरभरून वाहताना दिसतो. दोनपाच पैसे फेकल्यावर हव्या त्या माकड/माकडीणचेष्टा करावयास तयार असणाऱ्यांकडून आपण काही गांभीर्याची अपेक्षाही ठेवू शकत नाही इतके या मंडळींचे समाजापासूनचे तुटणे मजबूत असते. देशाला आणि कोटय़वधी गुंतवणूकदारांना तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप असलेले सहाराश्री सुब्रतो राय हे त्याचमुळे यापैकी काही कलावंतांना देशभक्त वाटतात. या सहाराश्री यांनी ज्यांना फसवल्याचा आरोप आहे, त्यांची कणव या कलावंत म्हणवून घेणाऱ्या बाजारबुणग्यांना येत नाही. उलट सहाराश्री हेच कसे देशभक्त आहेत, हे सांगण्याचा निर्लज्जपणा ते करतात. सहाराश्रींना चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात या कलावंत म्हणवून घेणाऱ्यांची काही धारणा असेल तरीही ते ठीक मानावयास हरकत नाही. तर तसेही नाही. सहाराश्रींच्या खाल्ल्या मिठाला जागणे हाच काय तो यामागचा विचार. एका बाजूला वास्तवापासून इतकी फारकत घेतलेले कलाविश्व आपण अनुभवत असताना दुसरीकडे त्याच वेळी व्यवस्थेचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या कलाकृतीला ऑस्कर मिळावे हे आपण कोठे आहोत, हे दाखवून देणारे आहे. रविवारी रात्री पार पडलेल्या झळाळत्या ऑस्कर सोहळय़ात सर्वाच्या अपेक्षांना धक्का देत ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह या चित्रपटास सवरेत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार मिळाला आणि पुन्हा एकदा कला, समाज आणि राजकारण हा तिकोनी प्रांत समोर आला.    
वांशिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव या विषयाने चित्रपटसृष्टीला कायमच भुरळ घातलेली आहे. त्याचमुळे यहुदींवरील अत्याचार आणि अमेरिकेतील गुलामी यांनी चित्रपटसृष्टीला पुरवलेल्या विषयांची संख्या सर्वाधिक भरेल. यंदाचा उत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर बहुमान मिळवणारा ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह हा सिनेमा याच मालिकेतील आहे. सॉलोमन नॉर्थप हा, ज्याला आफ्रिकी अमेरिकी म्हटले जाते असा, शेतमजूर. मूळचा न्यूयॉर्कचा. व्हायोलिन उत्तम वाजवणारा. त्या वेळी निग्रो या हीन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आफ्रिकी अमेरिकींना स्वातंत्र्याचा हक्क नव्हता. परिणामी गुलामी हेच त्यांचे प्राक्तन. हा काळ अर्थातच अमेरिकेतील यादवीच्या आणि अब्राहम लिंकन यांच्या उदयाच्या आधीचा. तर अशा या काळात १८४१ साली सॉलोमन यांस व्हायोलिन शिकवण्याच्या नोकरीचे आमिष दाखवून गुलामांचे व्यापारी पळवून नेतात आणि न्यूऑर्लिन्स येथे नेऊन विकतात. पुढची १२ वर्षे वेगवेगळय़ा मालकांकडे त्याला काम करावे लागते. या काळात आपल्या कुटुंबासाठी तो गायब झालेला असतो आणि त्याचे अस्त्वित्व जणू पुसलेच गेले की काय, अशी परिस्थिती असते. या काळात सॉलोमन गुलामीच्या जोखडातून स्वत:ची सुटका करून घेण्याचे अनेक प्रयत्न करतो. पण अपयशी. अखेर जवळपास १२ वर्षांच्या संघर्षांनंतर, गुलामांबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या एकाच्या साह्य़ाने त्याची सुटका होते आणि सॉलोमन पुन्हा मोकळय़ा जगात येतो. त्या संघर्षांची यशस्वी कहाणी म्हणजे ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह हा चित्रपट. तो अलीकडेच गोल्डन ग्लोब या दुसऱ्या सन्मानानेही गौरविण्यात आला होता आणि अकादमी पुरस्कारासाठीही अनेक नामांकने त्यास मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने बाजी मारली आणि तो सवरेत्कृष्ट ठरला. चित्रपटाशी संबंधित काही जाणकारांनी या संदर्भात आधीच भाकीत केले होते. तसे घडल्यामुळे या चित्रपटाच्या यशासंबंधी प्रश्न विचारण्यात येत असून त्यांची दखल घेणे आपल्यासाठीही उद्बोधक ठरावे. या संदर्भातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा चित्रपटाच्या कथानकासंदर्भात. तो ज्यांनी उपस्थित केला त्यांनी यहुदी संघर्षांवर आणि गुलामी या विषयावर निघालेल्या चित्रपटांची तुलना केली असून त्यांच्या मते गुलामीवर चित्रपट नेहमीच सुखान्त केले जातात. गुलामीविरोधात आफ्रिकी अमेरिकनांना संघर्ष करावा लागतो, त्यात त्यांची दमछाक होते आणि अखेर एखादा सहृदय गोरा येऊन या कृष्णवर्णीयांना मदत करतो, असेच का दाखवले जाते, असा या अभ्यासकांचा प्रश्न आहे. त्यांचे म्हणणे असे की इतक्या गंभीर विषयावरील चित्रपटांची अखेर.. सारे किती छान छान.. अशीच व्हावयास हवी का? या संदर्भात यहुदींवरील चित्रपटांचा दाखला दिला जात असून त्या विषयांवरील किती तरी चित्रपट शोकान्तच असल्याचे नमूद करण्यात येत आहे. अशा वेळी एखादा श्वेतवर्णीय मदतीला येतो आणि कृष्णवर्णीयांची सुटका करतो अशाच स्वरूपाची कथानके अतिरंजित तर ठरत नाहीत ना, असा या संदर्भातील टीकाकारांचा प्रश्न आहे. ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह या चित्रपटातही असेच घडते आणि अखेरीस एका सहृदय गौरवर्णीयामुळे सॉलोमन पुन्हा स्वतंत्र होतो. ब्रॅड पिट या कलाकाराने यात सहृदय गौरवर्णीयाची लहानशी पण प्रभावशाली भूमिका केली असून त्याचा चित्रपटाच्या निर्मात्यांतही समावेश आहे.
या निमित्ताने एकंदरच ऑस्कर पुरस्कार आणि त्या संदर्भातील वा मागील जागतिक राजकारणाचा ऊहापोह करणेदेखील सयुक्तिक ठरावे. २०१२ सालचे उत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले डॅनियल डे ल्युइस या कलाकारास. त्याच्या अद्वितीय अभिनय कौशल्याचे दर्शन लिंकन या चित्रपटाच्याच्या निमित्ताने झाले. कृष्ण आणि गौरवर्णीय यांच्यातील संघर्षांत यशस्वी ठरलेला नेता म्हणजे अब्राहम लिंकन. याच लिंकन यांची भूमिका ल्युइस या कलाकाराने साकार केली होती. त्या आधीच्या वर्षी अभिनेत्रीचे पारितोषिक पटकावले मेरिल स्ट्रीप यांनी. द आयर्न लेडी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या मार्गारेट थॅचर या अविस्मरणीय होत्या यात शंका नाही. त्या आधीच्या वर्षी सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावणाऱ्या कलाकृतीचे नाव द किंग्ज स्पीच. ब्रिटनचे राजे सहावे जॉर्ज यांची ही सरळ सोपी कथा. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस सत्तेवर आलेला हा राजा तोतरा असतो आणि त्या विकारावर मात करण्यासाठी त्याचा सतत संघर्ष सुरू असतो. त्यात त्याला मदत करणारा ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि राजे जॉर्ज यांची ही कहाणी उत्कृष्ट चत्रपटाचा पुरस्कार घेऊन गेली. गतवर्षी आगरे हा सवरेत्कृष्ट चित्रपट ठरला. इराकमध्ये अडकलेल्या अमेरिकी नागरिकांच्या सुटकेची चित्तथरारक कहाणी त्यात मांडण्यात आली असून त्या चित्रपटास पारितोषिक देण्यासाठी अमेरिकी अध्यक्षांच्या पत्नी मिशेल ओबामा यांची योजना करण्यात आली होती. अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसमधून आभासी पद्धतीने मिशेल यांनी आगरेचा गौरव केला. त्याही वेळी या चित्रपटाची पाश्र्वभूमी असलेले अमेरिकी राजकारण आणि पुरस्काराचा निर्णय या संदर्भात प्रश्न विचारले गेले होते.    
ही सारी उदाहरणे दर्शवतात ते हेच की राजकारण हे कलाविषयांना वज्र्य नसते. अलीकडच्या काळात अचंबित करणाऱ्या तांत्रिक करामतींचे अवास्तव स्तोम माजले होते. अर्थात अशा तांत्रिक करामतींचे स्वप्न पाहणे हेही कलात्मक असू शकते. परंतु डोळे दिपवणाऱ्या आणि मेंदू गोठवून टाकणाऱ्या तंत्राधारित कलाकृतींपासून चित्रपट सृष्टी आता पुन्हा कथाबीजाकडे वळू लागली असून त्यात राजकारणास मिळणारे स्थान लक्षात घ्यावे असे लक्षणीय आहे. त्यामुळेच ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह या चित्रपटाचा गौरव केवळ उल्लेखनीय न ठरता आपणास काही सांगणारा ठरतो.