युक्ती आणि साधनं हाताळण्याचं कौशल्य यांतून कलावस्तू घडत जातात. पण तिला प्लास्टिक वापरून एवढंच करायचं नव्हतं. हा प्लास्टिकभार लोकांना आवडतो आहे, हे लक्षात आल्यावर तिनं चाल बदलली..
बाहुलीसारख्या वस्तूचा एक फोटो. हिरव्या पाश्र्वभूमीवर खुलून दिसणारी चिनीमातीची पांढरी बाहुली. किंवा बाहुलीसारखी वस्तू. खरंतर, वस्तूसारखी दिसणारी मानवाकृतीच.. पण फोटोतली ‘मानवाकृती’ खऱ्या मानवाची असेल की त्याच्या प्रतिकृतीची?
एवढा शब्दच्छल का करायचा? हे बाहुली- वस्तू- चिनीमातीसदृश वस्तू- मानवाकृती- प्रतिकृती आणि वास्तवातला मानव वगैरे शब्द वापरून उगाच वापरले जाताहेत का?
एकतर, तिथे त्या फोटोच्या खाली स्वच्छ लिहिलंय की, इटलीतल्या सोळाव्या शतकातल्या पोर्सेलीनच्या कलावस्तूंचं प्रदर्शन न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन वस्तुसंग्रहालयात भरणार आहे! हा फोटो एका पोस्टरवर वापरला गेलाय आणि पोस्टरं काही वर्तमानपत्री समीक्षेसारखी नसतात.. पोस्टरं जे काय सांगायचं ते थेट सांगतात. स्पष्ट सांगतात. ती उगाच शब्दच्छल करीत नसतात.
होय. पोस्टर जे सांगेल ते असेलही थेट, पण हे पोस्टर म्हणजेच मानसी भट्टची कलाकृती आहे. तिनं त्या शब्दांसकट हे पोस्टरच्या पोस्टर अमेरिकेतल्या एका आर्ट गॅलरीत मांडलं होतं. पुढे भारतातही ते प्रदर्शित झालं होतं. मेट्रोपोलिटन म्युझियममध्ये खरोखरच इटलीतल्या पोर्सेलीन-कलावस्तूंचं प्रदर्शन भरलं असेल किंवा नसेलही. त्याच्याशी मानसीला घेणंदेणं नाही. मानसी भट्टनं स्वत:च्या देहावर पांढरं प्लास्टिक मोठय़ा खुबीनं लेवून, चेहऱ्यालाही तुकतुकीत पांढरा मेकप करून इटलीत किंवा तत्सम युरोपीय देशांत एकेकाळी फार रसिकप्रिय असलेल्या कलावस्तूंची नक्कल या फोटोंमध्ये केली होती. त्या कलावस्तू आणि आजची बदललेली तंत्रं यांतला फरक तिच्या या खटाटोपातून खरंतर आपोआपच स्पष्ट होतो. पण मानसी एवढय़ावर थांबली नाही. मेट्रोपोलिटनसारख्या नावाजलेल्या संग्रहालयात अशा गतकालीन कलावस्तू प्रदर्शनरूपानं मांडल्या जातात, अप्रूपानं- कौतुकानं पाहिल्या जातात, अशा प्रदर्शनाची जाहिरात करताना केवळ कलावस्तूचा फोटो पुरेसा असतो.. हे सगळं आणि आपलं प्लास्टिकचं, डिजिटल फोटोग्राफीचं, कुठल्याही वस्तुसंग्रहालयाच्या वा कोणत्याही संस्थेच्या लोगोसकट काहीही स्कॅन आणि कॉपी किंवा डाउनलोड करता येणारं जग.. या दोघांचा काही ताळमेळ आहे की नाही?
मानसी भट्टनं स्वत:ला रंगवून केलेल्या फोटोला पोस्टरचं रूप दिल्यानं, ते पोस्टरही अमुकच वस्तुसंग्रहालयाच्या नाव-लोगोनिशी असल्यानं हा ताळमेळाचा प्रश्न अधिकच महत्त्वाचा होतो.
तो महत्त्वाचा नाही वाटला तरी हरकत नाही. तुम्हाला जुन्या (सोळाव्या शतकातल्या) इटालियन पोर्सेलीन कलावस्तू मानसीच्या देहरंगोटी आणि आयडियाबाजीपेक्षा नक्कीच चांगल्या असं वाटत असेल तरी हरकत नाही. मानसीला अजिबात त्या कलावस्तूंशी स्पर्धाबिर्धा करायची नव्हती. उलट, मेट्रोपोलिटनसारख्या महत्त्वाच्या वस्तुसंग्रहालयात त्या कलावस्तूंचंच प्रदर्शन भरणार, हेच तर ती सांगते आहे..
फक्त ‘प्लास्टिक वापरलंय आत्ता इथं’ एवढंच तिला म्हणायचंय. ते म्हणणं तिनं एकदा नाही, दोनदा नाही, भरपूर वेळा मांडलंय.
‘मॅट्रेस फॅक्टरी’ नावाची एक बऱ्यापैकी प्रयोगशील गॅलरी अमेरिकेत आहे. तिथं या पोस्टरांनंतर मानसीला संधी मिळाली. तेव्हा तिनं प्लास्टिकचा आणखी खुबीनं वापर करून घेऊन स्वत:चे फोटो काढवून घेतले.
हे सर्व फोटो पाहिल्यावर असं लक्षात आलं होतं की, रशिया-चीन यांमधल्या करकरीत सैनिकी शिस्तीची खिल्ली उडवणं, युरोपीय देशांमधल्या पुरुष आणि स्त्री यांबद्दलच्या रूढ प्रतिमांना आव्हानं देणं.. अशा हेतूनंच हे सारं केलंय मानसीनं. पण हा हेतूबाबतचा प्रश्न विचारला तेव्हा मानसी ‘नाही’ म्हणाली होती.
पण मग आणखी एक प्रदर्शन भरलं. त्यात भारतीय होते. एखाद्या पाक्षिकाचा फोटोग्राफर एखादय़ा ग्रामीण भागात जातो नि मग त्या पाक्षिकात अगदी भरपूर पानं देऊन त्याचा ‘छायाचित्रनिबंध’ (फोटो एसे) छापला जातो, तश्शाच छापाचे हे फोटो होते. आता मानसीला भारतीय मीडिया भारताकडे कसा पाहतो याची खिल्ली उडवायची होती का?
नाही. तेही नाही. या ‘भारतीय’ प्रदर्शनासंदर्भात तिनं माहिती पुरवली : मागची शेतं किंवा कधीकधी माणसं, इमारती हे सगळं आधीच तयार असलेल्या फोटोतलं आहे. मुख्य पात्राचे कपडे प्लास्टिकचे आहेत.
मानसी भट्ट नावाची दृश्यकलावंत हे जे काही करते आहे किंवा करत होती, त्यातून ‘रूढ कल्पनांना प्लास्टिकद्वारे धक्का’ एवढं सूत्र नक्कीच काढता येतं. या ‘कल्पना’ कुठल्या? दृश्याबद्दलच्या. किंवा, आणखी स्पष्ट (पण कदाचित कंटाळवाण्या) शब्दांत सांगायचं झालं तर, अमुक दृश्याची म्हणून जी काही अंगभूत सौंदर्यवाचक -गुणसूत्रं असतील, त्यांना मानसी हादरे देत होती. हे काम तिनं कितीही नाही म्हटलं, तरी तिच्याकडून झालेलं आहे.
या हादऱ्यांतून काही पुढले प्रश्नही वेळोवेळी उभे राहिले, त्याचं उत्तर हल्ली मानसी तिच्या कामातूनच देऊ लागली आहे.
‘प्लास्टिक आर्ट्स’ असं ज्यांना म्हटलं जातं, त्या (प्रामुख्यानं शिल्प, भित्तिशिल्पं आणि सिरॅमिक वगैरे, पण एरवी सर्वच) दृश्यकलांमध्ये दृश्यलालित्य निर्माण करण्यासाठीच्या युक्त्या आणि त्या युक्त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनांवरली हुकुमत हे महत्त्वाचं असतं. आधीच्या दृश्यकलांनी (फोटोग्राफीसकट सर्व दृश्यकलांनी) जे काही करून झालंय, त्याच्याशी मानसीच्या कलाकृती फारकत घेतात. पण ही फारकत घेऊनसुद्धा परत फोटोच काढायचे, हे म्हणजे नाथाला मी तुझ्याशी बोलणार नसल्याचं सांगण्यासाठी ‘नाथा, नाही मी बोलत..’ असं पदच आळवण्यासारखं लटकं नाही का? तो लटकेपणा प्रेमात शोभेल, कलाविषयक भूमिकांमध्ये कसा तो शोभणार? मानसीला प्लास्टिक हे कलासाधन म्हणून वापरायचंय का? बाकीच्या सर्व दृश्यकलांमध्ये जे सौंदर्य गृहीत धरलं जातं त्याचा फुगा तिला प्लास्टिकच्या वापरातून फोडायचाय का? काय करायचंय तिला? नुसतं बाकीच्या दृश्यगृहीतांचे फुगे फोडून काय होणार? तिची ‘स्वत:ची’ कलाकृती कुठेय?
कृती-कला (परफॉर्मन्स आर्ट) नावाचा प्रकार मानसीला जवळचा वाटला. दिल्लीच्या एका रहिवासवृत्ती (रेसिडेन्सी) दरम्यान, भर चौकात तिनं स्वत:ला प्लास्टिकच्या पिशवीत कोंडून घेतलं नि त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला. त्या ‘परफॉर्मन्स’चे फोटो सध्या एका गॅलरीनं विकायला ठेवले आहेत. ती प्रसंग-छायाचित्रं, हीदेखील ‘मानसी भट्ट’ याच नावानं विकली जाणारेत हे आपल्याला विशेष वाटू शकतं.
प्लास्टिकच्या पिशवीत गुदरमरण्याअगोदर तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न मानसी करत होती, तेव्हा त्या चौकात जे असतील त्यांना वाटलं असेल की हे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत पथनाटय़ासारखं काहीतरी आहे. त्यांच्यावर तो संस्कारच झाला असेल तर पुसता येणार नाही. पण ज्यांनी वसंत आबाजी डहाकेंची ‘गर्भालय’ लघुकादंबरी वाचली असेल, त्यांना त्या कथेतला तो आत्मविश्वास कमी असलेला, घुम्या- घरबशा तरुण मुलगा एका डोंगराच्या विवरातून बाहेर येतो आणि त्याचा जणू पुनर्जन्म झाल्यासारखा आत्मविश्वासानं वागू लागतो, त्याची आठवण मानसीचा हा प्रयोग (किंवा त्याचे फोटो) पाहून येऊ शकेल..
या प्रयोगामुळे मानसीनं सिद्ध केलं तिनं केलेला प्लास्टिकचा वापर हा फक्त खिल्ली उडवण्याकरता नव्हता. प्लास्टिकला साधन आणि माध्यम म्हणून स्वीकारताना, त्याच्या सर्व शक्यतांचा विचार करून आता ती प्लास्टिकभार वागवते आहे.