हृदयेंद्रच्या बोलण्यातून तिघांनाही गोंदवल्यात समाधी मंदिरातच उभं असल्यासारखं वाटून गेलं. ‘पुन्हा गोंदवल्याला जायला पाहिजे,’ असा विचारही उमटला.
ज्ञानेंद्र – वा! अर्भकरूपी साधक आणि सद्गुरूमाय हे रूपक डोळ्यासमोर उभं राहिलं खरं.. लहान मूल आईला बिलगून तिचं दूध पितं ते किती एकाग्रतेनं.. त्याचे डोळे मिटले असतात.. तसं जगाकडचे डोळे मिटून गुरुमाउलींच्या बोधामृताचं पान करायला माउली सांगत आहेत असा अर्थ ‘दुधे भरूनी वाटी लावीन तुझे वोठीं’तून कधी जाणवलाच नाही..
डॉ. नरेंद्र – तुमच्या भावप्रवाही बोलण्यात माझं बोलणं थोडं रूक्षच आहे, पण खरंच हृदयेंद्रची उपमा अगदी अचूक आहे.. मूल जन्मलं ना की पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय त्याच्यासाठी पूर्णान्न दुसरं नाहीच.. काबरेहायड्रेटस, प्रोटिन्स म्हणजे प्रथिनं, व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्त्वं आणि कॅल्शियम हे सारं काही त्याला त्या दूधातूनच मिळतं. कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे अर्भकाच्या पेशींची वाढ होते, हाडं बळकट होतात, काबरेहायड्रेट्समुळे रोजच्या चलनवलनासाठी जी ऊर्जा लागते ती मिळते.. ते दूध जंतूसंसर्गही रोखतं आणि बाळाची रोगप्रतिकारशक्तीही वाढवतं..
योगेंद्र – आणि सद्गुरूबोधाचंच सेवन केलं आणि तो बोध आचरणात आणू लागलो तर साधकाच्या पेशी-पेशींतली शक्ती जागी होते, भौतिकाच्या चलनवलनासाठीची ऊर्जाही मिळते, भौतिकात राहूनही भवरोगाचा जंतूसंसर्ग रोखला जातो, विकाररूपी रोगांशी लढण्याची शक्ती वाढते! फार छान!!
ज्ञानेंद्र – हृदू, तू पूर्वी गायचास ना, तो नामदेवांचा अभंग आठवला.. या माउलीच्या रूपकाला अगदी साजेसा..
हृदयेंद्र – कोणता रे?
ज्ञानेंद्र – अरे तो नाही का? तू माझी माउली.. म्हण ना..
हृदयेंद्रचा चेहरा उजळला. तो गाऊ लागला.. तू माझी माउली मी वो तुझा तान्हा। पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे।। तू माझी माउली मी तुझे वासरूं। नको पान्हा चोरू पांडुरंगे।। हृदयेंद्रच्या स्वरांत एक आत्मीय माधूर्य होतं. रात्रीच्या त्या नीरव वातावरणात त्या हृदयार्त स्वरांनी साऱ्यांचीच मनं भारून गेली. पण आता ‘प्रसादम्’मधून निघायलाच हवं होतं.. सकाळी दर्शनासाठी जायचं होतं.. ज्याच्या त्याच्या मनात कृष्णदर्शनाची आस जागी झाली.. ‘मी-माझे’ची अहंने माखलेली लुगडी पळवणारा आणि परमरसाच्या रासलीलेत देहभान विसरायला लावणारा परमसखा कृष्ण हृदयेंद्रच्या डोळ्यासमोर उभा राहिला.. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।’ आणि ‘ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम..’ असं सांगणारा ज्ञानयोगी कृष्ण ज्ञानेंद्रच्या चक्षूंसमोर होता.. तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मयोग्यापेक्षाही योगीच श्रेष्ठ आहे म्हणून ‘तस्मात् योगी भव अर्जुन..’ असं सांगणाऱ्या योगेश्वर श्रीकृष्णाच्या दर्शनाच्या योगासाठी योगेंद्र आतुर झाला होता.. तर सर्व काही करून नामानिराळ्या राहणाऱ्या कृष्णाला कर्मेद्र ‘हॅलो’ करणार होता.. डॉक्टरसाहेबांसह चौघे हॉटेलवर परतले.. आपापल्या खोल्यांत गेले आणि निद्रेच्या आधीन झाले.. ध्यानस्थ योग्याप्रमाणे, विरक्त ज्ञान्याप्रमाणे, परमरसात डुंबणाऱ्या भक्ताच्या सदातृप्त अंत:करणाप्रमाणे मथुरेचा आसमंत आत्मतृप्तीत विसावला होता.. बासरीची मधुर धून उमटून आकाशात विरून जात होती.. तन्मय भक्तानं दोन्ही हात जोडून डोईवर घेत भक्तीप्रेमानं डुलत रहावं त्याप्रमाणे मथुरेच्या विशाल मंदिरातील दीपकळ्या वाऱ्याच्या लयीसह भक्तीप्रेमानं जणू डुलत होत्या.. चौथऱ्यावरील लावण्यखाणी मुग्धमधुर प्रेमरसभावप्रेरक मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीला जणू त्या दीपकळ्यांची प्रभा तेजाचा अभिषेक करीत होती.. त्या तेजारतीने त्या भक्तीवल्लभाचं मुखमंडल अधिकच उजळलं होतं..  जणू अनंत युगांपासून तो इथे उभाच आहे.. बोधाची मुरली वाजवत भक्ताचं अज्ञान दूर करण्यासाठी, प्रारब्धाचा गोवर्धन करंगळीवर तोलून भक्ताला काळजीच्या झंझावातात सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याच्या जीवनरथाचं सारथ्य करून रणांगणावर त्याला विजयी बनवण्यासाठी, तो सदातत्पर आहे.. ती बासरीची धून ऐकू तर यायला हवी.. रथाचे लगाम त्याला द्यावेसे तर वाटायला हवेत.. गोवर्धन पेलत त्याखाली दबून जाणं नकोसं तर वाटायला हवं.. तो वाट पाहातोच आहे.. लाखो आजवर आले आणि रिकाम्या हातानंच परतले. लाखो यापुढेही येतील.. त्यातलेच हे चौघे!
चैतन्य प्रेम