अमेरिकेतल्या ‘पॉप आर्ट’च्या प्रवाहानं जगण्याच्या वस्तूकरणाबद्दल खेद व्यक्त केला की आनंद, याबद्दल वाद असोत, पण त्यांच्या चित्रांमधला वस्तूंचा वापर हा जाहिरातबाजी, पॅकेजिंग यांना पुढे जाऊ देणारा होता. याउलट भारतात, वस्तूकरणाचं सुखदु:ख का बाळगू नये, याची वाट प्रभाकर बरवे यांनी १९७० पासून पुढल्या काळात शोधली होती, ती १९८५-८६ नंतर पुढे सशक्त झाली, त्यातून वास्तवाकडे पाहण्याची एक परंपरा तयार झाली..
प्रभाकर बरवे यांचं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक मराठीतल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत अनेकदा आलं आहे. बरवे यांच्या हयातीतच ते प्रकाशित झालं आणि बरवे यांच्या ज्या डायऱ्यांवर ते आधारलेलं होतं, त्याच्या ‘मौज प्रकाशनगृह’कृत संपादित रूपाला बरवे यांनीही आक्षेप घेतलेला नव्हता.. त्या अर्थानं, हे पुस्तक बरवे यांना आपलंच वाटत होतं. मात्र, बरवे यांच्या चित्रांचा अर्थ लावण्यासाठी हे एवढं पुस्तक पुरेसं आहे का? बरवे यांची चित्रं बघण्याआधी कोरा कॅनव्हास वाचणं आवश्यक असेल, पण पुरेसं नाही. बरवे यांचे ६ डिसेंबर १९९५ रोजी निधन झाले. स्मृतिदिन वगैरे नसतानाही अनेकांना त्यांची आठवण अनेकदा येतेच, पण मुख्य म्हणजे बरवे यांनी निर्माण केलेली ‘परंपरा’ कशी (कोणत्या वळणांनी) पुढे जाते आहे, याचा मागोवा घेणारी किमान दोन लक्षणीय प्रदर्शनं मुंबई व दिल्लीत भरली आहेत. त्या प्रदर्शनांमध्ये केवळ बरवे यांचे सहकारी वा अप्रत्यक्षरीत्या वारसदार असलेल्यांचाच नव्हे, तर अगदी बरवेंना पाहिलंच नसूनही बरवे-विचार पुढे नेणाऱ्यांचा समावेश होता. अन्य कोणत्याही महाराष्ट्रीय चित्रकाराला असा मान मिळालेला नाही.
आज बरवे यांची आठवण आपण काढतो आहोत, त्यामागे एकच कारण आहे. बरवे यांचं जीवनकार्य किंवा त्यांची विचारपरंपरा यांचा विस्तृत आढावा एका लेखात घेता येणार नाही; परंतु एका अगदीच वेगळ्या (म्हटलं तर भलत्याच) दृष्टिकोनातून बरवे यांच्याकडे पुन्हा पाहण्याची संधी घेण्याचा प्रयत्न, म्हणून हा लेख. याआधीचे लेख पॉप आर्टबद्दल होते. ‘जगण्याचंच वस्तूकरण झालंय’ हे वास्तव पॉप आर्ट या कलाप्रवाहानं स्वीकारलंच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हे वस्तूकरणाचं वास्तव जाणून दृश्यकलेतल्या वस्तूकरणाकडे नव्यानं पाहण्याची हिंमत पॉप आर्टनं केली. पॅकेजिंग, जाहिराती, नव्या जगातली ‘निवडीचं स्वातंत्र्य’ असलेली माणसंसुद्धा एका साच्यातनं काढल्यासारखी दिसू लागणं आणि विशेषत: अमेरिकी माणसाचे तर साचेच तयार होणं, ही सारी या ‘जगण्याच्या वस्तूकरणा’ची बाह्य़ लक्षणं म्हणायची.. पण पॉप आर्टचा प्रवाह पुढे नेणाऱ्यांनी या लक्षणांचाच आधार घेऊन चित्रं वा शिल्पं केली, हे आपण गेल्या तीन आठवडय़ांत पाहिलं. हा विषय महिन्याअखेरीस थांबविण्याची वेळ आल्यावर आता ‘हे पॉप आर्ट वगैरे ठीकाय, पण वस्तूकरण भारतीय संदर्भात, भारतीय चित्रकारांना कसं दिसलं? त्यांनी ते कसं मांडलं?’ हा प्रश्न पडला, तर त्याचं उत्तर देता येणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे.
मात्र, याच प्रश्नाचं एक ‘अशक्य उत्तर’ म्हणजे प्रभाकर बरवे यांच्या चित्रांमधून दिसणारा विचार.
‘जगण्याचं वस्तूकरण झालंय’ अशा प्रकारची जाणीव झालीय, त्याबद्दल खंत किंवा आनंद वाटलाय, असा अनुभव अमेरिकी चित्रकारांना आला होता. हा असा अनुभव बरवे यांना आलेला नाही, याची साक्ष बरवे यांची चित्रं देतील.  ‘चराचर’ वस्तुमात्र त्यांच्या चित्रांमधून प्रकटलं. वस्तूंबद्दल ते सतत विचार करत होते (हे तर त्यांच्या डायऱ्याही सांगतात, ‘कोरा कॅनव्हास’देखील), आणि वस्तू दिसतेय अशी आणि स्वत:च्या चित्रात होणार आहे ती अशी, याचाही विचार बरवे करत. हा विचार दृश्यातून होता, पण दृश्यापुरता नव्हता. ढग आणि मेंढय़ा यांचं साधम्र्य ‘कोरा कॅनव्हास’मध्ये बरवे सांगतात. बरवेंवर नीलेश किंकळे आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या फिल्ममध्ये हा भाग दृश्यरूप होऊन आला आहे, पण मेंढय़ांच्या गतानुगतिक कळपांप्रमाणेच ढगांचं समूहप्रेमी असणं, एखादाच ढग ‘वाट चुकणं’ ही बरवे यांची निरीक्षणं आणि लोकलची किंवा कसलीही गर्दी बरवे यांनी शक्य तितकी टाळली, ही बरवे यांच्या अनेक निकटवर्तीयांकडून मिळालेली माहिती यांची सांगड आपण इथं घातली तर? तर जे सापडू शकेल ते दृश्याच्या पुढलं असेल. भोवतालातलं काय पाहायचं आणि कोणत्या पद्धतीनं पाहायचं, याची बरवे यांची रीत ही कलावंत म्हणून त्यांच्या ठेवणीचा (आर्मेचरचा) महत्त्वाचा भाग आहे. सर्वाचाच असतो. असायला हवा.
बरवे यांनी वस्तू पाहिल्या. वस्तूंबद्दल विचार केले : कधी मुक्तचिंतनवजा, कधी चित्रकाराच्या शिस्तीनं आकारांच्या भाषेत, कधी वस्तूचं सांस्कृतिक चिन्हीकरण जे काही आहे त्यात स्वत:ची भर घालण्याचा प्रयत्न करत, असे हे विचार झालेले होते. यावर आणखी एक आरोप काही समीक्षक करू शकतील : बरवे यांनी वस्तूंचं ‘भावनिकीकरण’ केलं, हा.
होय, केलं असेल भावनिकीकरण- पण त्या भावनांमध्ये बरवे (रंगांनी/ रेषांनी- रेंडरिंगच्या पद्धतींनी) रमले नाहीत. त्यांनी आकारधारी वस्तू/ इमारती/ पानं/ फळं/ माणसं यांमधून फक्त मुद्दे सांगितले! या दोन मुद्दय़ांच्या मधली जागा थेट मोकळी सोडली. याला ते ‘अचित्र’ म्हणत, हे बऱ्याच जणांना आठवेलच.
बरवे यांची चित्रं स्मरणरंजनवादी नाहीत. त्यांनी फक्त स्वत:च्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितलेल्या नाही. उलट, त्यांनी सरळपणे ‘गोष्ट सांगणं’ हेच नाकारलं आहे. चित्रातल्या प्रतिमांच्या साहचर्यातून, कॅनव्हासवरल्या ‘अचित्रा’तून अर्थाच्या शक्यता त्यांनी खुलवल्या.
सरळ अर्थ नसतोच चित्राला. अर्थाच्या शक्यताच असतात. हे बरवे यांना कळलं असल्याचं एकदा मान्य करून त्यांची चित्रं पाहिली की मग ती फक्त मानवी आयुष्याबद्दल नाहीत, ती फक्त सामाजिक-आर्थिक स्थितीतून आलेली नाहीत, ती वस्तूंवर ‘चेतनागुणोक्ती’ करणारी नाहीत, हे अगदी सहज पटतं. वर्णनात्मक (नॅरेटिव्ह) चित्रांचं ‘बडोदा स्कूल’ जेव्हा बहरत होतं, तेव्हा बरवे यांची ही एकांडी शिलेदारी आकार घेत होती. प्रतिमांच्या साहचर्यातून एकापेक्षा जास्त प्रसंगमालिका सूचित करणं महत्त्वाचं आहे, हा ‘बडोदा स्कूल’चा प्रतिवादच (बहुधा अभावितपणे) बरवे यांच्या चित्रांनी केला. खंदेपणानं तो झाला. म्हणून बरवे यांची प्रभावळ आजही आहे.
राहिला आपला मुद्दा-  जगण्याच्या वस्तूकरणाचा. वस्तूकरण समजा अटळ आहे, पण त्याहीपलीकडे जगणं आहेच. ते जगणं शोधण्याची सुरुवात अर्थात स्वत:पासूनच करायची आणि शेवटी अख्ख्या जगाच्या, काळाच्या, निसर्गाच्या जगण्याकडे आपली भाषा- आपली जागा न सोडता पाहायचं, हा धडा बरवे यांनी घालून दिला. बरवे यांच्या रीतीचा आणि त्यांच्या धडय़ांचा अर्थ पुन्हा आपापल्या परीनं कळलेले, पण ‘एकंदर वास्तवा’कडे पाहण्याची इच्छा बाळगणारे चित्रकार हे बरवे यांचे वारसदार ठरले. वस्तूंकडे पाहणं आणि वस्तूमधून ‘आपली’ प्रतिमा शोधणं, हे बरवे यांच्या परंपरेचं व्यवच्छेदक वैशिष्टय़ मानलं जातं, पण ती सुरुवात असते. पुढे या परंपरेतले चित्रकार आपापल्याच मार्गानं जाणार असतात.
जरा आणखी अलंकारितेचा दोष पत्करून बोलायचं झालं तर बरवे यांनी एक आत्मविश्वास दोन-तीन पिढय़ांना तर नक्कीच दिला : वस्तू, जगणं, वस्तूकरण होणं किंवा मानवी जीवनानुभवाचंच वस्तूकरण झालेलं असणं.. हे सारं तुमच्यासमोर असेल, पण तुमचा प्रदेश हा नव्हे. तुम्ही चित्राच्या आणि अचित्राच्या प्रदेशातले दर्यावर्दी आहात. अचित्राचा समुद्र तुमचा, चित्राची बेटंही तुमची. या प्रदेशात आधी फिरा, चित्रांची बेटं पादाक्रांत करा.. मग तुम्हाला नकाशा काढायचाय-  त्या नकाशाला लोक म्हणणारेत तुम्ही शोधलेल्या वास्तवाचा आणि काळाचा पट!
.. हा पट, हा नकाशा हे चित्रकारानं शोधलेलं सत्य असतं. बरवे यांची भूमिका वरवर पाहता तद्दन कलावादी वाटेल, पण ती सत्यान्वेषी आहे ती अशी. ‘ते हे वास्तव’ असा साक्षात्कार बरवे यांच्या चित्रांच्या रूपदर्शनातून तुम्हाआम्हाला होवो, कलाभान वाढत राहो!