News Flash

१९७. अर्थअनर्थ

शंकराचार्यानी ‘गेयं गीतानामसहस्त्रं’पासून उपासनेचा पाया कसा पक्का करावा, ते सांगितलं. सद्ग्रंथांचं वाचन-मनन (गेयं गीता), भगवंताचं नामस्मरण (नामसहस्त्रम्)

| September 11, 2012 11:14 am

चैतन्य प्रेम,
शंकराचार्यानी ‘गेयं गीतानामसहस्त्रं’पासून उपासनेचा पाया कसा पक्का करावा, ते सांगितलं. सद्ग्रंथांचं वाचन-मनन (गेयं गीता), भगवंताचं नामस्मरण (नामसहस्त्रम्), चराचरात भरलेल्या भगवंताचं स्मरण मी करीत आहे, हे जाणून त्याच्या त्या व्यापक रूपाच्या दर्शनाचं ध्येय बाळगणं (ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्), एवढं मानूनही भागणार नाही कारण चित्त दुनियेकडे कधीही भरकटेल म्हणून त्या चित्ताला, दुनियादारीपासून अस्पर्श असलेल्या सज्जनांच्या संगाकडे, सत्संगाकडे वळवणं (नेयं सज्जनसङ्गे चित्तं) आणि चित्त तिकडे वळलं पण शरीर दुनियादारीच्या सेवेतच रत असलं तरी कोणत्याही वळणावर दुनियादारीचा मोह उत्पन्न होणार आणि सर्वस्वाची हानी होणार म्हणून सद्ग्रंथांचं वाचन-मनन, नामस्मरण, भगवंताच्या दर्शनाच्या ध्येयाची जोपासना, सत्संग याचबरोबर या दुनियेतला खरा दीन असा जो सद्गुरू त्याची सेवा (देयं दीनजनाय च वित्तम्) असं मार्गदर्शन शंकराचार्य करतात.

आता सद्गुरूची सेवा म्हणजे काय? तर त्याच्या आज्ञेनुरूप आचरण. त्याची आज्ञा काय असते आणि कशासाठी असते? ती मला दुनियादारीच्या मोहातून सोडवण्यासाठीच असते. माझ्या भौतिकाला ते धक्का लावत नाहीत मात्र जगणं केवळ भौतिकासाठी नाही. कारण भौतिक चंचल आहे, आज आहे उद्या नाही. ते मिळवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न मी करावा पण त्याहून अधिक प्रयत्न अशासाठी करावा, जे एकदा प्राप्त झालं की कधीच नष्ट होत नाही. श्रीगोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे की, कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो! आज अमुक एक गोष्ट मिळाली की आनंद होईल, असं वाटून आपण त्या गोष्टीमागे लागतो. ती मिळतेही पण त्यानं झालेला आनंद अखंड टिकतो का? नाही. कधी ती वस्तू कालौघात नष्ट होते आणि आनंद संपतो कधी त्या वस्तूबद्दलचं प्रेम कालौघात नष्ट होतं आणि त्यात मग आनंद उरत नाही. तर भौतिक हे असं मला गुंतवणारं आणि गुंगवणारं आहे. त्यातून तात्पुरतं समाधान लाभेलही आणि त्याचंही मोल भौतिकातच जगणाऱ्यासाठी खूप असेलही पण भौतिकातून मला अखंड समाधान लाभू शकत नाही. त्या अखंड समाधानासाठी भौतिकाच्या आसक्तीपलीकडे गेलं पाहिजे. ते जाण्यासाठीच तर हा मार्ग आहे. तेव्हा त्या मार्गासाठी क्षमतापूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजे ‘देयं दीनजनाय च वित्तम्’चं खरं परिपूर्ण रूप आहे. आता असं असूनही दुनियेच्या ओढीचा सूक्ष्मसा तंतू मनात उरू शकतो. म्हणून पुढे ते सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम्। पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति:।।’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कारण आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता या श्लोकाचा दुसरा अर्थ काय? तो आता पाहू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2012 11:14 am

Web Title: arupa che rup satyamargadarshak meaning purport
Next Stories
1 अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९५. शब्दसंस्कार
Just Now!
X