सामान्य साधकापासून तपस्व्यापर्यंत ;  प्रत्येकाच्याच वाटय़ाला भगवंताला दूर ठेवणारा ‘घूँघट’ येतोच योतो. तो ‘घूँघट’ ओळखता येणं आणि तो दूर करता येणं सोपं नाही. त्यासाठीचा उपाय आणि परमार्थाचा खराखुरा शुद्ध मार्ग श्रीसद्गुरूच दाखवतात आणि त्या वाटेवरून चालूनही घेतात. कबीरजी म्हणूनच म्हणतात.. गुरुबीन कौन बतावै बाट! अत्यंत प्रसिद्ध असं हे भजन आहे. जीवन कसं आहे? या भजनात ते सांगतात-
भ्रांति पहाडम्ी नदिया बिच में, अहंकार की लाट।। १।।
काम क्रोध दो पर्वत ठाढम्े, लोभ चोर संघात।। २।।
जीवनात ‘काम’ आणि ‘क्रोध’ हे दोन उत्तुंग पर्वत उभे आहेत. या दोन पर्वतांमधून भ्रांति नावाची नदी वाहात आहे आणि आहंकाराचे बांध त्या नदीला आहेत. त्यातच लोभरूपी चोराचाही संग आहे.
मद मत्सर का मेघा बरसत, माया पवन बडम् ठाट।। ३।।
कहत कबीर सुनो भाई साधो, क्यों तरना यह घाट।। ४।।
गुरुबिन कौन बतावै बाट।।
त्यात भर म्हणून या भ्रांतिरूपी नदीवर मद आणि मत्सराचे ढग जोरदार वृष्टी करीत आहेत आणि माया-मोहाचं वारं जोरात सुटलं आहे. सद्गुरूहीन जीवन असं आहे! त्या वाटेनं स्वतच्या ताकदीवर कोणीच कधी तरुन गेलेला नाही. स्वतच्या संकुचित मन, बुद्धी, चित्ताच्या जोरावर जो जो प्रयत्न करावा तो भटकंती वाढवणाराच ठरतो (बिन सतगुरु नर फिरत भुलाना!) पण हे जे खरा मार्ग दाखवणारे सद्गुरु आहेत ते लोकेषणेत गुंतलेले, भौतिकात जखडलेले नाहीत. ते कसे आहेत? कबीरजी सांगतात-
                                                 साधो सो सतगुरु मोहिं भावै।
सत नाम का भरि भरि प्याला, आप पिलै मोहिं प्यावै।
तेच सद्गुरु खरे आहेत ज्यांनी सच्च्या नामाचा प्याला स्वतही भरभरून प्यायला आहे आणि मला तो पाजत आहेत. किती सांगावं? आपल्या या सदराचे जेमतेम वीसेक भाग उरले आहेत. म्हणून विस्ताराचा मोह आवरावा लागत आहे. श्रीमहाराजांचे अंतरंग शिष्य होते ब्रह्मानंदबुवा. गोंदवल्यात एकदा पेढे वळण्याचं काम सुरू होतं. पेढा वळून बुवा तो अंगठय़ानं चपटा करून ताटात टाकत होते. त्या प्रत्येक पेढय़ावर त्यांनी अंगठा दाबताच श्रीराम असं नाम उमटत होतं. त्यांचे पुतणे भीमराव गाडगुळी हा प्रकार पाहू लागताच बुवांनी या प्रकाराची वाच्यता  होऊ नये म्हणून त्यांना फटकारलं आणि एवढंच म्हणाले, ‘‘काय सांगू? महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलं आहे.’’ सत नाम का भरि भरि प्याला, आप पिवै मोहिं प्यावै! जो दिवसरात्र दारुसारख्या साध्या व्यसनाच्या नशेत धुत्त आहे त्याच्याही शरीराला दारुचा दर्प येतो मग जो पवित्र नामात अहोरात्र रममाण आहे त्याच्या रोमारोमांतून त्याचाच का प्रत्यय येणार नाही?