परमात्म्यावरील प्रेमाचा दीप त्या ‘सुन्न महाला’त उजळायचा आहे. भगवंताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, भगवंताच्या मार्गावर ज्याला चालायचं आहे त्याच्या अंतरंगात जोवर त्या भगवंताचं प्रेम उत्पन्न होत नाही तोवर त्या वाटचालीला काय अर्थ आहे? एका दोह्य़ात कबीरजी सांगतात, ‘प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग।’ जोवर अंतरंगात प्रेम नाही तोवर या मार्गावरची संकटं झेलण्याचं धैर्य उत्पन्न होऊ शकत नाही आणि त्या प्रेमातून विरहाची आग उत्पन्न झाल्याशिवाय वैराग्य उत्पन्न होऊ शकत नाही. आता ती आपली पातळी नाही, हे खरं. पण विचार करा, शबरीमाई प्रभूची वर्षांनुर्वष जी वाट पाहात होती त्यातून वैराग्याचं किती उत्तुंग शिल्प साकारलं! मथुरेला प्रभू गेल्यानंतर गोकुळातल्या गोपींचं अंतरंग केवळ कान्हाच्या वाटेकडे डोळे लावून तग धरून होतं, त्या अंतरंगात वैराग्याशिवाय दुसरं काय होतं? उद्धव त्या गोपींना ‘ज्ञान’ देण्यासाठी म्हणून गोकुळात आले आणि भगवंतावरील प्रेमाच्या विराट दर्शनानं दिपून गेले. गोपी म्हणाल्या, उद्धवा, तू मनाला समजवा म्हणून सांगतोस पण आमचं मन आता आमच्याकडे आहेच कुठे? ते एका कान्हाकडे गेलं आहे.. त्या अहोरात्र प्रेममग्न गोपगोपींना कुठलं ज्ञान, कुठला जप, कुठलं तप, कुठली व्रतवैकल्यं, कुठले नेम? कबीरांचाच एक दोहा आहे, ‘‘जहाँ प्रेम तहँ नेम नहिं, तहाँ न बुधि ब्यौहार। प्रेम मगन जब मन भया, तब कौन गिने तिथि बार।।’’ जिथे प्रेम आहे तिथे नेम नाही. बुद्धी आणि व्यवहाराचा जणू संबंधच उरत नाही. जो या प्रेमात अहोरात्र निमग्न आहे त्याला तिथीवार कुठले? दिवस काय अन् रात्र काय? जो सदोदित एकाच दशेत निमग्न आहे त्याला वेगळी एकादशी कुठली? जो रोजच त्याच एकाच्या चिंतनात निमग्न आहे त्याला वेगळा रोजा कुठला? एक लोककथा आहे. पण आहे फार मार्मीक. एक अल्लाचा बंदा नमाज अदा करीत होता. तोच आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन एक तरुणी तिथून धावत जात होती. तिच्या पायांचा धक्का या भाविकाला लागला. तिला त्याची जाणीवही नव्हती. ती तशीच धावत गेली. तो मनातून संतापला. नमाज उरकून तिच्या परतीची वाट पाहू लागला. एखाद तास उलटला. ती त्याच वाटेनं परत येत होती. त्यानं पुढं जाऊन तिला खडसावलं. ती हसली आणि म्हणाली, काय करू? मी त्याच्या विचारात इतकी गुंग होते की मला भानच नव्हतं. बहुदा तुम्ही त्याच्या (अल्लाच्या) विचारात इतके निमग्न नव्हता म्हणून तुम्हाला जाणीव झाली! प्रेम मगन जब मन भया! मन प्रेमानं इतकं भरून गेलं की आजूबाजूची जाणीवही उरली नाही. ज्याचं भगवंतावर असं प्रेम आहे त्याला वेगळं ज्ञान ते काय सांगणार, त्याला वेगळ्या योगसाधनेची काय गरज, त्याला कसला कर्मयोग सांगणार, त्याला कोणतं तप सांगणार? आपल्या अंतरंगात ते प्रेम उत्पन्न व्हावं यासाठी साधनांचा आटापिटा आहे. बऱ्याचदा आपण खरं साध्य विसरून साधनांनाच साध्य मानण्याची गफलत करतो.