परमात्मरसात जो निमग्न आहे तो मला सांगतो की संकुचित ‘मी’ ला त्या व्यापक परमात्म्याचं दर्शन होणार नाही. त्यासाठी तुला व्यापकच व्हावं लागेल. स्वतत उतरणं म्हणजे स्वतचं खरं स्वरूप जाणणं. स्वतचं स्वरूप जाणणं म्हणजे ज्या भ्रामक ‘मी’ला मी माझं स्वरूप मानत आहे, तो भ्रमाचा लेप खरवडून सुटणं. जोवर हा भ्राक ‘मी’पणाचा पडदा आहे तोवर अनंताला जाणणं शक्य नाही. जो बंधनरहित आहे तो मला बंधनातून क्षणार्धात सोडवू शकतो हे खरं पण जर पुन्हा मीच मला वारंवार बांधून घेऊ लागलो आणि बंधनात अडकल्याचं दुखंही कुरवाळत बसू लागलो तर मला सोडवणं कुणालाच शक्य नाही. तेव्हा आधी सुटकेची माझी इच्छाही प्रामाणिक हवी. माझ्या जगण्यातला भ्रामक ‘मी’चा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नांचा अभ्यास मलाही करावा लागेल. हा अभ्यास काय आहे? कबीरांचं एक अत्यंत ख्यातनाम भजन आहे-
घूँघट का पट खोल रे, तो को पीव मिलैंगे।
घट घट में वहि साईं रमता, कटुक बचन मत बोल रे।
धन जोबन का गरब न कीजै, झूठा पँचरंग चोल रे।
सुन्न महल में दियना बारि ले, आसा से मत डोल रे।
जोग जुगत से रंग महल में, पिय पाये अनमोल रे।
कहै कबीर अनंद भयो है, बाजत अनहद ढोल रे।
कबीरदास सांगतात, घुंगटाचं आवरण दूर केलंस तर प्रियकराला पाहू शकशील. हे घूँघट म्हणजे ‘मी’पणाचं आवरण. ते आवरण आहे तोवर परमात्म्याला कसं पाहाता येणार? आता हे ‘मी’पणाचं आवरण दूर करण्याचे उपाय कबीरजी सांगतात त्यातला पहिला उपाय म्हणजे प्रत्येक घटाघटात, अर्थात प्रत्येक जीवमात्रात तोच साई (साक्षात ईश्वर) विद्यमान आहे त्यामुळे कुणालाच कटु वचन बोलू नकोस. भगवंतानंही गीतेत आपल्या विभूतींचं वर्णन करताना ‘मन मीच आहे,’ असं सांगितलं आहे. याचा अर्थ कुणाचं मन दुखावणं म्हणजे भगवंतालाच दुखावणं. आता हा उपाय पचनी पडणं कठीणच आहे. आपण अगदी सहजपणे दुसऱ्याचं मन दुखावणारं बोलण्यात तरबेज असतो. मग दुसऱ्याचं मन दुखावणारं कटु वचन बोलू नका, हा अभ्यास सांगण्यामागचा हेतू काय? तर हा अभ्यास मनापासून केला तर राग, लोभ, स्वार्थ, क्रोध यांच्या ऊर्मी रोखण्याचाच अभ्यास होऊ लागतो. आपण दुसऱ्याला कटु बोलतो त्यामागे आपला स्वार्थ जपण्याचाच हेतू असतो, ‘मी’पणाचाच जोर असतो. शब्दाचा बाण एकदा निसटला की निसटला. एकवेळ शारीरिक जखम भरून येते पण मनाला कठोर शब्दांनी होणारी जखम भरून येत नाही. पण बरेचदा आपण नको ते बोलून बसतो आणि मग खंतावत राहातो. त्यापेक्षा बोलण्यावर नियंत्रण, म्हणजेच जिभेवर नियंत्रण येणे. ज्याचे जिभेवर नियंत्रण साधले त्याला अर्धा परमार्थ साधला. तेव्हा पहिलाच उपाय असा अर्धा परमार्थ साधून देणारा आहे!