05 August 2020

News Flash

कसेल त्याची जमीन

यादव वा भूषण यांच्यासमवेत दिल्लीतील एकही आमदार नाही. यादव हे राजकीय विश्लेषक, अभ्यासक वा मुत्सद्दी म्हणून अधिक सक्षम आहेत यात शंका नाही.

| March 31, 2015 01:01 am

यादव वा भूषण यांच्यासमवेत दिल्लीतील एकही आमदार नाही. यादव हे राजकीय विश्लेषक, अभ्यासक वा मुत्सद्दी म्हणून अधिक सक्षम आहेत यात शंका नाही. परंतु निवडणुकीय राजकारणात ते अद्याप यशस्वी ठरलेले नाहीत. तेव्हा केजरीवाल यांनी या द्वयीस जी काही वागणूक दिली ती प्रचलित राजकीय संस्कृतीस साजेशीच म्हणावी लागेल..

मतदारांना राजकीय पक्षात काय चालू आहे, पक्षांतर्गत लोकशाही आहे किंवा काय, त्या पक्षाच्या राजकारणास वैचारिक अधिष्ठान किती आहे या आणि अशा प्रश्नांशी काहीही घेणे-देणे नसते हे जाणणारी दोन व्यक्तिमत्त्वे सध्या देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. एक अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल. वरवर पाहू जाता या दोघांना एकाच पंगतीत बसवलेले अनेकांना आवडणार नाही. परंतु या दोन्ही व्यक्तींनी जे काही राजकारण केले ते नक्कीच समांतर आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या दोहोंत फरक असलाच तर तो त्यांच्या पक्षांचा इतिहास आणि प्रतिमा यापुरताच मर्यादित आहे. एरवी दोघांचेही राजकारण एकाच केंद्राभोवती फिरले. ते केंद्र म्हणजे ‘मी’. केजरीवाल आणि कंपनीच्या आम आदमी पक्षात गेले काही दिवस जो काही धुमाकूळ चालू आहे त्या पाश्र्वभूमीवर या राजकारणाचे विश्लेषण करणे क्रमप्राप्त ठरते.
या संदर्भात लक्षात घ्यावयाची बाब ही की आपमध्ये जे काही सुरू आहे त्याचा त्या पक्षाच्या दिल्लीतील सरकारच्या स्थर्याशी काहीही संबंध नाही. दिल्ली विधानसभेच्या ७० पकी ६७ जागा जिंकणाऱ्या आपकडे राक्षसी बहुमत आहे आणि योगेंद्र यादव वा प्रशांत भूषण हे दिल्ली विधानसभेचे सदस्यदेखील नाहीत. तेव्हा या दोघांची वा त्यांच्या काही समर्थकांची अगदी पक्षातून हकालपट्टी झाली तरी अरिवद केजरीवाल सरकारचे स्थर्य अबाधित राहणार आहे. जनतेच्या मनात या कल्लोळामुळे आपविषयी संभ्रमाचे वातावरण झाले असले तरी केजरीवाल यांच्या धूर्त मनात असा कोणताही गोंधळ नसणार हे उघड आहे. हे दोघे नेते पक्षापासून दूर गेले तरी आपल्या सरकारच्या भवितव्यावर काहीही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाही, हे ते जाणतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी केजरीवाल आणि यादव, भूषण यांच्यातील संघर्ष ही तत्त्वाची लढाई असल्याचे कितीही छातीठोकपणे सांगितले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. याचे साधे कारण असे की सरकार आणि पक्ष यांच्यातील संघर्षांत इतिहासात नेहमीच सरकारचा विजय होत आला आहे. या क्षणी दिल्लीतील सरकार हे केजरीवाल यांच्या हाती आहे आणि त्याचमुळे यादव, भूषण यांच्या विरोधात तेच यशस्वी होण्याची शक्यता अधिक. या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रसारमाध्यमांकडून ‘आप’संदर्भात आकाशपाताळ एक केले जात असून ते वास्तवाचे आकलन नसल्याचे लक्षण आहे. वास्तविक केजरीवाल हे अत्यंत भंपक आणि आततायी गृहस्थ आहेत हे आमचे मत ते अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाले तेव्हापासून होते आणि ते वेळावेळी व्यक्तही केले गेले. किंबहुना अण्णा हजारे आणि त्यांच्या समस्त स्वच्छ म्हणवून घेणाऱ्या किरण बेदी आदी सहकाऱ्यांनी दिल्लीत केलेले आंदोलनच मुळात पोकळ आहे आणि त्यातून काहीही साध्य होणार नाही, असेच आमचे भाकीत होते. व्यापक समाजहित लक्षात घेता ते दुर्दैवाने खरे ठरले. परंतु या आंदोलनाचा फायदा करून घेण्याचे चातुर्य दाखवले ते एकाच व्यक्तीने. ते म्हणजे अरिवद केजरीवाल. दिल्ली विधानसभा, त्यानंतर पाठोपाठच्या लोकसभा निवडणुका यांत मार खाऊनही केजरीवाल यांनी चिकाटी सोडली नाही. अखेर त्यांनी एकहाती सत्ता मिळवून दाखवलीच. हा मिळालेला विजय पूर्णपणे आपला आहे हे ते जाणतात. त्याचमुळे योगेंद्र यादव वा प्रशांत भूषण हे त्यांना अडथळा वाटू लागले. यातील भूषण हे बेभरवशाचे आहेत आणि यादव हे राजकीयदृष्टय़ा केजरीवाल यांना आव्हान ठरू शकतात. त्याचमुळे केजरीवाल यांनी या दोघांच्या विरोधात पद्धतशीरपणे वातावरणनिर्मिती करून त्यांची कोंडी केली. माध्यमांच्या अतिउत्साहामुळे या घटनेचे गांभीर्य आहे त्यापेक्षा अधिक भासवले गेले. परंतु ते तसे नाही. यादव वा भूषण या दोघांच्या मागे लक्षणीय असा दिल्ली आमदारांचा जथा गेला असता तर माध्यमांनी दाखवले तसे त्यांचे गांभीर्य आहे असे म्हणता आले असते. वास्तवात यादव वा भूषण यांच्यासमवेत एकही नवनियुक्त आमदार नाही. म्हणजेच केजरीवाल जे काही वागले वा वागत आहेत ते लोकनियुक्त प्रतिनिधींना मंजूर आहे असा निष्कर्ष निघतो आणि तो योग्य आहे. यादव हे राजकीय विश्लेषक, अभ्यासक वा मुत्सद्दी म्हणून अधिक सक्षम आहेत यात शंका नाही. परंतु त्यांना स्वत:ला वा पक्षासाठी निवडणूक जिंकून वा जिंकवून देता आलेली नाही. म्हणजे निवडणुकीय राजकारणात ते अद्याप यशस्वी ठरलेले नाहीत. तेव्हा केजरीवाल यांनी या द्वयीस जी काही वागणूक दिली ती प्रचलित राजकीय संस्कृतीस साजेशीच म्हणावी लागेल. राहता राहिला मुद्दा आपच्या प्रतिमेचा. दिल्लीतील या तमाशामुळे आपने विश्वासार्हता गमावलेली आहे, त्यांना प्रसारास याचा अडथळा येईल आदी भाकिते या संदर्भात व्यक्त केली जातात. ती सर्वच अनाठायी म्हणावी लागतील. याचे साधे कारण असे की आपणास दिल्ली वगळता अन्यत्र कोणत्याही ठिकाणी पक्षविस्तार करायचाच नाही अशी स्वच्छ भूमिका केजरीवाल यांनी घेतलेली आहे. ते दिल्लीत तूर्त समाधानी आहेत. आपचा प्रसार अन्यत्र होईल किंवा काय हा मुद्दा वास्तविक आपपेक्षा अधिक प्रसारमाध्यमांच्याच चच्रेत आहे. केजरीवाल मात्र मिळालेली सत्ता पुढील पाच वष्रे किती निर्धोकपणे वापरता येईल याच प्रयत्नात आहेत. अंतिमत: महत्त्वाचा ठरणार आहे तो हाच मुद्दा. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ते काय दिवे लावतात यावरच त्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. यादव वा भूषण यांना पक्षाने काय वागणूक दिली याच्याशी जनतेस काडीचाही रस असणार नाही.
केजरीवाल आणि मोदी यांची तुलना होऊ शकते ती या मुद्दय़ावर. पक्षाचे सुकाणू पूर्णपणे हाती येईपर्यंत मोदी यांनी जे काही केले ते केजरीवाल यांच्या कृत्यापेक्षा फार काही वेगळे होते असे म्हणता येणार नाही. लालकृष्ण अडवाणी वा मुरली मनोहर जोशी आदी ज्येष्ठांना खडय़ासारखे वेचून बाजूला काढणे आणि स्मृती इराणीसारख्यांना जवळ करणे हे यादव, भूषण यांना दूर करण्यापेक्षा आणि कुमार विश्वास यांसारख्या टिनपाटास जवळ करण्यापेक्षा वेगळे कसे? यांत फरक इतकाच की यादव आणि भूषण यांच्यापेक्षा अडवाणी आणि जोशी हे राजकीयदृष्टय़ा अत्यंत समंजस असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरील अन्यायास वाचा वगरे फोडण्याचा प्रयत्न केला नाही. तसा तो केला असता तर आप पक्षात यादव आणि भूषण यांचे जे काही झाले ते आणि तसेच अडवाणी, जोशी प्रभृतींचे भाजपत झाले असते याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. मेधा पाटकर वा अन्यांनीही यादव, भूषण यांच्या कच्छपि लागून राजीनामा देऊ केला आहे. त्याची काहीही किंमत नाही. पाटकर वा तत्समांना निवडणुकीच्या राजकारणात कधीच स्थान नव्हते. त्यामुळे त्यांच्या नसण्याने आपवर काहीच परिणाम होणार नाही.
हे सगळे समजून न घेताच सध्याचा गोंधळ साजरा केला जात आहे. ते माध्यमाधारित मनोरंजनासाठी ठीक. पण या मनोरंजनातही सत्यापलाप करून चालणार नाही. सत्ताकारणातील कुळकायद्याच्या रीतीनुसार ही जमीन कसेल त्याचीच असते. ती केजरीवाल यांनी कसली याचा यादव, भूषण यांना विसर पडला. म्हणून ही वेळ आली. बाकी यात त्यांना आणि आपला गांभीर्याने घ्यावे असे काही नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2015 1:01 am

Web Title: arvind kejriwal dispute with yogendra yadav
Next Stories
1 युद्ध आवडे सर्वाना
2 वावदूकांची वायुबाधा
3 ही तो बाजारपेठेची इच्छा!
Just Now!
X