राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत गेली साडेचार वर्षे थांबावे लागलेल्या अशोक चव्हाण यांची अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करून पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यापासून नव्या नेतृत्वाच्या शोधात दिल्लीतील पक्षाचे नेते होते. राज्यात काँग्रेसकडे नेतृत्वाची तशी वानवाच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा पक्षाला निवडणुकीत लाभ होऊ शकला नाही. अशोक चव्हाण किंवा नारायण राणे या दोन्ही माजी वादग्रस्त मुख्यमंत्र्यांचा पर्याय पक्षासमोर होता. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश  तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्ता मिळवून देणाऱ्या अशोकरावांना पक्षाने पसंती दिली आहे. राणे यांच्याबद्दल दिल्ली अजूनही अनुकूल नाही हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ‘आदर्श’ आणि ‘अशोकपर्व पेडन्यूज’ची टांगती तलवार अशोक चव्हाण यांच्या डोक्यावर असतानाही पक्षाने त्यांना संधी दिली आहे. सध्या ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, अशोकरावांना न्यायालयांमध्ये खेटे घालावे लागतात. देशात काय किंवा राज्यात सध्या काँग्रेसची अवस्था फारच गंभीर आहे. अशा वेळी सर्वाना बरोबर घेऊन जाणाऱ्या तरुण तसेच आक्रमक नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता होती. मुख्यमंत्रिपद भूषविताना अशोकरावांनी सर्वाना बरोबर घेऊन कारभार केला होता. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणारे सारे ‘तंत्र’ त्यांनी अवलंबिले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोकरावांची कसोटी लागणार आहे. कारण एकीकडे ‘आदर्श’ किंवा ‘पेडन्यूज’ ही प्रकरणे निस्तारताना दुसरीकडे राज्यात पक्ष वाढविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे. लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचा आलेख पार खाली खाली येत चालला आहे. अशा वेळी राज्यात पक्ष उभा करण्याकरिता नवसंजीवनी द्यावी लागणार आहे. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्याकडे लवकरच पक्षाची सारी सूत्रे सोपविली जाण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांच्यामुळेच मागे अशोकरावांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात असताना त्यांना साथ देतील अशा नेत्यांकडे पक्षात जबाबदारी सोपविली जात असून, त्यातूनच अशोकरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात कायम प्राबल्य असलेल्या मराठा समाजाकडे महत्त्वाची पदे राहतील यावर काँग्रेसचा कटाक्ष राहिला आहे. प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण तर विरोधी पक्षनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड करून पक्षाने ही परंपरा कायम ठेवली आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदी निवड करताना पारंपरिक जातिव्यवस्थेचे प्राबल्य मोडून काढले. अशा वेळी राज्यात ३० टक्क्यांच्या आसपास असलेल्या मराठा समाजाचे काँग्रेसकडे जास्तीत जास्त ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. १९९५ मध्ये युतीची सत्ता असताना काँग्रेसने हाच प्रयोग केला होता. राष्ट्रवादी आणि भाजपचे  सध्या गुफ्तगू सुरू आहे. राष्ट्रवादी एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवून राजकारण करीत असताना प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जागा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशोकरावांची निवड केल्याने विरोधकांना, विशेषत: भाजपला घोटाळ्यात अडकलेल्या नेत्याकडे पक्षाने सूत्रे सोपविली हा आरोप करण्याची आयती संधी चालून आली आहे. साऱ्या आरोपांचा सामना करीत अशोकरावांना पुढील खडतर वाटचाल करावी लागणार आहे.