मंत्रिपदाची झूल अंगावर घेताच शरीर कसे रोमांचित होते आणि त्यामुळे मेंदूही कसा काम करेनासा होतो, याची अगदी मासलेवाईक उदाहरणे गेल्याच काही दिवसांत समोर येऊ लागली आहेत. अशोक गजपती राजू हे केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेले मंत्री काय किंवा व्ही. के. सिंग आणि गिरिराज सिंह काय, सगळेच जण काय मन मानेल तसे बोलू लागले आहेत. आपल्या अशा बोलण्याने सरकार अडचणीत येऊ शकते, याचेही भान या सगळ्यांना असल्याचे दिसत नाही. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू हे धूम्रपान करणारे आहेत आणि इतकी वर्षे त्यांना जेव्हा जेव्हा विमानातून प्रवास करावा लागला, तेव्हा खिशातली काडेपेटी किंवा लायटर विमानतळावर सोडून द्यावा लागला होता. हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी जगभर पाळल्या जाणाऱ्या नियमानुसारच ही कारवाई होते आणि मंत्री होईपर्यंत हे महाशय त्याचा आदरही करत होते, पण आता त्याच खात्याचे मंत्री झाल्यामुळे इतकी वर्षे झालेल्या गळचेपीचा वचपा काढण्याची हुक्की त्यांना न येती तरच नवल. मंत्री झाल्यामुळे ते आता बिनदिक्कतपणे विमानात काडेपेटी घेऊन जातात. विमानतळावर होणाऱ्या सुरक्षा तपासणीतून त्यांना वगळण्यात आल्याने ते खिशातून काय नेतात, हे कळणे शक्य नाही. हे राजू एवढे उत्साही की, त्यांनी स्वत:च आपण आंतरराष्ट्रीय नियम मोडत असल्याचे सांगून टाकले. असे करण्याने आपण काही गुन्हा करीत आहोत, याची जराशीही चाड त्यांना असल्याचे दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी गिरिराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल वक्तव्य करताना वर्णद्वेषही आपल्या अंगात किती खोलवर मुरलेला आहे, हे दाखवून दिले. लष्कराचे प्रमुख असल्यापासूनच टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्ही. के. सिंग यांनीही आधी पाकिस्तान दिनाच्या समारंभासाठी पाकिस्तानी वकिलातीत औपचारिक उपस्थिती दाखवावी लागल्याबद्दल आणि आता माध्यमांबद्दल आगपाखड करून आपली पातळी सिद्ध केली आहे. मंत्री होण्याने माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेत घट होत असेल, तर तो मोठाच धोका म्हटला पाहिजे. मंत्री होण्याने चार शिंगे येत असतील, तर ते धोकादायकच म्हटले पाहिजे. आजवर विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानणाऱ्या या अशा नेत्यांना आपलीही प्रत्येक कृती टीकेस पात्र ठरू शकते, याचे भान कसे येत नाही, याचे आश्चर्य वाटते. यावर आताचे विरोधकही सत्तेत असताना काही मस्तवाल विधाने करीत होते असे दाखले शोधून काढले जातील; परंतु दुसऱ्याच्या बेअक्कलपणाची साक्ष आपण स्वत:ला का लागू करीत आहोत, याचा विचार कधी होणार की नाही हा प्रश्न आहे. हवाई वाहतूकमंत्रीच जर सुरक्षा नियम पाळत नसतील, तर विमान प्रवासी त्यांचेच अनुकरण करतील आणि रेल्वे प्रवासीही ज्वालाग्राही पदार्थाची ने-आण करतील. आपण एका जबाबदारीच्या पदावर आहोत आणि आपले बोलणे अधिकृत मानले जाते, याचा विसर राजू यांना पडला असावा. बालिशपणातून त्यांनी आजवर आपल्यावर कसा अन्याय झाला, हे सांगताना आता आपण विमानातून ज्वालाग्राही पदार्थ नेऊ शकतो, असे कॉलर ताठ करून सांगणाऱ्या या मंत्र्यांच्या बौद्धिक क्षमतेची कीव तर करायलाच हवी, पण अशा कृत्याबद्दल शिक्षाही द्यायला हवी.