चेन्नईचा ‘लिट फॉर लाइफ’ आणि जयपूरचा ‘लिटफेस्ट’ या दोन्ही मोठय़ा साहित्योत्सवांनी मोठय़ा रकमांचे ग्रंथपुरस्कार सुरू केले, त्यापैकी यंदाचा ‘लिट फॉर लाइफ’ पुरस्कार सोमवारी अशोक श्रीनिवासन यांना देण्यात आला, तर ‘लिटफेस्ट’मधील पुरस्कार अमेरिकी-भारतीय लेखिका झुम्पा लाहिरी यांना शुक्रवारी जाहीर झाला. दोन्ही पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. लाहिरी आणि श्रीनिवासन यांचे लिखाण वाचकाला भिडण्यामागे ‘कुटुंबकथा’ हा समान धागा आहे, हा मात्र निव्वळ योगायोग!
अशोक श्रीनिवासन वयाच्या १४ व्या वर्षांपासून लिहू लागले, विशी ओलांडल्यावर विविध मासिकांत कथा प्रकाशितही होऊ लागल्या आणि भारताखेरीज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील साहित्य-कालिकांतही कथा प्रकाशित झाल्यानंतर का होईना, दिल्लीच्या साहित्य अकादमीचे त्यांच्याकडे लक्ष गेले. समकालीन भारतीय इंग्रजी कथा-ग्रंथात अकादमीने त्यांच्या ‘नॉट टु बी लूज शंटेड’ या कथेचा समावेश २०१० मध्ये केला. ‘बुक ऑफ कॉमन साइन्स’ हे त्यांच्या १३ कथांचे पुस्तक गेल्याच वर्षीचे.. सत्तरीत निघालेले पहिलेवहिले पुस्तक! इतक्या अल्पप्रसवा लेखकाच्या कथांतील साहित्यमूल्यांचे कौतुक मात्र अनेक समीक्षकांनी केलेले आहे. श्रीनिवासन यांच्या कथा कुटुंबातून सुरू होतात, व्यक्तीचे एकटेपण दाखवितात आणि समाजाच्या अवस्थेवर टिप्पणी करतात.  
कुटुंब आणि व्यक्ती यांचा झगडा झुम्पा लाहिरी यांच्या ‘नेमसेक’ आणि ‘लोलँड’ या कादंबऱ्यांतूनही दिसलेला आहेच, परंतु या कादंबऱ्या एका काळाचे आणि भारतीय समूहाचे कथ्य (नॅरेटिव्ह) व्यापक पटावर मांडतात. दोन-तीन पिढय़ांची कहाणी सांगणाऱ्या या लेखिकेचे वय इतके कमी कसे, याचे अप्रूप अनेकांना वाटते. लघुकथांचे ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’ आणि ‘अनअ‍ॅकस्टम्ड अर्थ’ हे दोन संग्रह त्यांच्या नावावर आहेत, पैकी ‘इंटरप्रिटर’ला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. ‘नेमसेक’वर आधारित चित्रपट मीरा नायर यांनी दिग्दर्शित केला, त्याचीही वाहवा झाली. ‘लोलँड’ या कादंबरीला ब्रिटनमधील ‘मॅन बुकर’ आणि अमेरिकेचा ‘नॅशनल बुक अवॉर्ड’ असे दोन पुरस्कार मिळाले. याच पुस्तकाला, ते भारतात २०१४ मध्ये प्रकाशित झाल्यामुळे- २०१५ चा ‘लिटफेस्ट’ पुरस्कार मिळाला आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कला व साहित्यविषयक अध्यक्षीय समितीवर नेमले, हाही एक बहुमानच होता. अमेरिकेतच शिक्षण झालेल्या लाहिरी भारतीय मनाचे दर्शन जगाला घडवितात, याचे कौतुक त्यांच्या अमेरिकी देशबांधवांना आहे.