बॉलीवूडचे चित्रपट ग्लोबल जाणिवांच्या मांडवाखालून जाऊ लागले, तेव्हा त्याच्या धोपट पटकथी आराखडय़ात लक्षणीय बदल झाले. सर्वगुणसंपृक्त हिरो आणि ‘जॉनी लिव्हरी’छाप विनोदाची बाळबोध परंपरा खंडित झाली. भाजीतल्या ‘मिठा’इतकेच महत्त्वपूर्ण असलेल्या तरी दुय्यम वा तिय्यम स्थानी वावरणाऱ्या कलाकारांच्या व्यक्तिरेखांची छबी ठसविण्याची कारागिरी लेखकांमध्ये वाढू लागली. या नव्या परंपरेतूनच अल्पकालीन तरी दीर्घ परिणामकारी भूमिका वठविणाऱ्या मोजक्या कलाकारांच्या पंक्तीत अशरफ-उल-हक यांचे स्थान मोलाचे बनले होते.  
‘ब्लॅक फ्रायडे’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘कंपनी’, ‘जंगल’, ‘रावण’, ‘दीवार’ (आताचा) आणि ‘फुकरे’ या चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखा तपासल्या, तर वाटेला आलेल्या दृश्यांचे सोने करण्याची ताकद लक्षात येईल. अशरफ यांनी १९९४ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालय (एनएसडी) या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळवला. त्याआधी  त्यांनी स्थानिक रंगभूमीवर कामे केली होतीच, पण नाटय़शिक्षण पदवी घेतल्यानंतरही त्यांनी ३० नाटकांत काम केले. ‘एनएसडी’तील शिक्षण झाल्यावर कलाकारी शिरस्त्याप्रमाणे अशरफ यांनी बॉलीवूडची वाट धरली.  विशिष्ट हावभावातून, संवादफेकीतून आणि वाटेला आलेल्या क्षणांमध्ये जीव फुंकण्याचे कसब त्यांनी विकसित केले होते. त्यामुळेच ‘ट्राफिक सिग्नल’मधील दुय्यम व्यक्तिरेखांच्या गर्दीतील एक असो किंवा ‘फुकरे’सारख्या तद्दन विनोदी व्यक्तिरेखांमधील तत्त्वज्ञानी मद्यपी असो, प्रेक्षकाच्या मनात त्या भूमिकेची प्रतिमा पक्की करण्यात हा कलाकार नेहमीच यशस्वी झालेला आढळतो.  बॉलीवूडमधील वलयांकित ताऱ्यांचे सुमार किस्से आणि त्यांच्या सर्दी-पडशाच्या ‘टिटबिट्स’ हौसे-मौजेने वाचल्या-पाहिल्या जाण्याच्या काळात अल्प भूमिका वठविणाऱ्या या कलाकाराला रक्तासंबंधी झालेल्या कर्करोगाची माहिती अनुराग कश्यप आणि काही निवडक मंडळींनाच होती. ‘द लॉस्ट बहुरूपिया’ या दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या लघुपटात प्रमुख भूमिका वठविणाऱ्या कलाकाराच्या अकाली मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये दु:खाचा सूर उमटतो आहे आणि त्याच वेळी त्याच्या कुटुंबाच्या- विशेषत: लहान मुलाच्या आर्थिक आधारासाठी पुढे येणारे हातही दिसत आहेत, हे चित्र बॉलिवूडच्या चकचकीत, वलयपिपासू, अप्पलपोटी परंपरेत बदल घडवून आणणारे आहे. म्हणूनच भूमिकांसोबतच या बदलासाठी अशरफ-उल-हक हे नाव विसरले जाणे आता शक्य नाही.