महिला व्यंगचित्रकार तुलनेने कमी दिसतात, पण ती इराणसारख्या कर्मठ देशात संपादकीय व्यंगचित्रे काढते. तिने त्या देशात महिलांच्या अधिकारांवर आणलेल्या बंधनांवर तसेच राजकीय नेत्यांवर व्यंगचित्र काढले म्हणून तिला २०१४ मध्ये अटक झाली. न्यायालयाच्या समोर  तिला डोळ्यावर पट्टी बांधून लाथाबुक्क्यांनी मारले, ती बेशुद्ध पडली पण शरण गेली नाही, तिने ही घटना यू-टय़ुबवर मांडली त्यामुळे पुन्हा तिला अटक झाली. संसद सदस्यांचा व्यंगचित्रातून अपमान केला, त्यांना प्राण्यांच्या रूपात दाखवले असा आरोप तिच्यावर आहे. तिला बारा वर्षे नऊ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. अशा स्थितीतही स्त्रियांच्या, मानवी समुदायाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी ती लढते आहे. या धाडसी व्यंगचित्रकार महिलेचे नाव आहे अटेना फरघदानी.
तुरुंगात असतानाही तिची कलाप्रियता कमी झालेली नाही. ती केराच्या टोपलीतील कागदाचे कप घेऊन त्यावर चित्र काढते, म्हणून तेथील सुरक्षा जवानांनी तिची अंगझडती घेतली. अमेरिकेतील ‘कार्टूनिस्ट राइट्स नेटवर्क इंटरनॅशनल’ या संस्थेच्या वतीने तिला ‘करेज इन कार्टूनिंग अ‍ॅवॉर्ड’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ५ सप्टेंबरला तिच्या अनुपस्थितीत तिला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. महिलांवर अन्याय करणाऱ्या अनेक कायद्यांच्या विरोधात तिने आवाज उठवला. मूळ पर्शियन असलेल्या अटेनाचा जन्म २९ जानेवारी १९८७ रोजी तेहरान येथे झाला. नंतर तिने अल झहरा विद्यापीठातून बी. ए. पदवी घेतली. सध्या ती तेहरानच्या एव्हिन तुरुंगात आहे. विशेष म्हणजे जगातील सर्व व्यंगचित्रकार तिचे काटरून्स सोशल नेटवर्किंगवर प्रसारित करीत आहेत. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रानेही तिची व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्याचे मान्य केले आहे. तिला पाठिंबा देण्यासाठी #draw4atena  हे ट्विटर हँडलही तयार करण्यात आले आहे. इराणच्या संसदेतील सदस्यांना माकडे, गायी व इतर प्राणी यांच्या स्वरूपात दाखवण्याचा ‘प्रमाद’ तिच्या हातून घडला आहे. वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी इराणसारख्या कर्मठ देशात फरघदानी हिच्यासारख्या महिलेला  तुरुंगात टाकले जाते. ही खरेतर शोकांतिका आहे, पण विनोदबुद्धी काय, बुद्धीच नसलेल्या तेथील राजकारण्यांकडून हे टीकात्मक भाष्य समजण्याची अपेक्षा करणे सुसंस्कृत समाजाला शक्य नाही. तिने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना मोठे पत्रही लिहिले आहे पण तिची परवड थांबण्याची चिन्हे नाहीत. कुठल्याही कलासक्त मनाला, मानवी संवेदना जाग्या असलेल्या लोकांना अस्वस्थ करणारी ही कहाणी आहे.