अशा लेखानोंदीमुळे कंपनीच्या भांडवली खर्चात फुगवटा दिसतो. तो व्यवसायातल्या अन्य परिस्थितीशी विसंगत असतो. बाजारातीला वास्तवाशी त्याचा ताळमेळ बसत नाही. पण सोंग मग उघडकीस येतेच..

नव्या तंत्रज्ञानाची चाहूल लागली की त्यावर आधारलेल्या व्यवसायाबद्दलच्या नवनव्या वावडय़ा येऊ लागतात. अशा वावडय़ांची झुळूक शेअरबाजारात अल्पकालीन का होईना, पण वादळात बदलू शकते. नव्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या उद्योगांचे अग्रदूत, पण काहीसे निराळे, नवीन असतात. त्यांच्या कंपन्यांबद्दल आगळेपणाचे कुतूहल आणि वलय असते. अलीकडे अशीच एक लाट उंचावर गेली आणि एकदम खालीपण आली. त्याला शेअर बाजारात ‘डॉटकॉम फुगा’ म्हणतात. इंटरनेटच्या प्रसाराबरोबर त्यावर बेतलेल्या अनेक सेवासुविधांच्या शक्यता बळावल्या. तशा शक्यतांवर आखलेले नवनवे व्यवसायाचे धुमारे बाळगणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले. या कंपन्यांचे इंटरनेटवरचे नामाभिधान ‘डॉटकॉम’ या बिरुदाने मिरवले जायचे. इंटरनेटने उघडलेली गुहा अजून खुलतेच आहे. पण त्याच्या पहिल्या नवलनयनोत्सवात हे अवाजवी फुगे उधळले त्यात एका मोठय़ा होऊ शकणाऱ्या कंपनीलाही भुरळ पडली आणि उत्सवी जोश ओसरता ओसरता त्या कंपनीची लबाडी उघडकीस आली. ‘कॉम्प्युटर असोसिएट्स एन्रॉन’ यांच्याच आसपासच्या काळातील ही आणखी एक लेखा-कारकुनांची हातसफाई. या कंपनीचे नाव ‘वर्ल्डकॉम’.

अगदी सुरुवातीला मिसिसिपी प्रांतामध्ये लांब अंतरावरचे दूरध्वनी जोडून देणारी ही छोटी कंपनी होती. एन्रॉन जसे वायुपुरवठय़ाचे नळी-जाळे वाढवीत गेली तशाच धर्तीने १९९० च्या दशकात वर्ल्डकॉमने अनेक कंपन्या खरेदी करीत आपले जाळे आणि व्याप विस्तारला. ही वाढ झपाटय़ाची होती.  १९९० साली त्यांचे विक्रीउत्पन्न होते १५.४ कोटी डॉलर्स. २००१ साली ते ३९.२ अब्ज डॉलर्स इतके झाले होते. पण हे वाढीमागचे वित्त कुठून येणार? एकीकडे शेअर बाजारात या व्यवसायाची उगवतीची आरती घुमत होती. वर्ल्डकॉमच्या शेअर्सचे मूल्य उन्मादक होते. कंपन्या खरेदी करण्यासाठी लागणारे वित्त कर्जाऊ होते. ज्या भावी मागणीच्या भरवशावर पुरवठय़ासाठीची गुंतवणूक चौखूरपणे चालली होती, ती मागणीच खुंटल्यागत अडखळू लागली. या रखडत्या मागणीची चाहूल लागताच अवघ्या विश्व आंतरजाळाभोवतीचे मोहक वलय आणि त्यातल्या कंपन्यांच्या शेअरमूल्याची घोडदौड ठप्प झाली.

या फसलेल्या गुंतवणुकीचा डोलारा कसा अजून भरभक्कम आहे याचे सोंग आणणे वर्ल्डकॉमला गरजेचे भासू लागले. परिणामी, त्यांच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने आपले कलमदान परजले आणि अनेक खर्च निराळ्याच धर्तीवर नोंदवायची पठडी सुरू केली. त्यासाठी लागणारा लेखातत्त्वाचा एक धागा त्यांनी पकडला आणि दोरखंड असल्यागत वापरायला सुरुवात केली. प्रमुख वित्त अधिकारी स्कॉट सुलिव्हान यांनी राईचा पर्वत करण्याची शक्यता हेरली. बहुतेक चालू खर्च हे ‘खर्च’ म्हणून महसुलातून वजा होतात. उरतो तो नफा. पण हे खर्च भांडवली खर्चासारखे समजून त्यांची मत्ता म्हणून गणना केली की झाले! खर्च कमी म्हणून नफा मोठा! हीच करामत वर्ल्डकॉमच्या ढासळत्या वित्त अवस्थेला सहजी लपवू शकत होती. कुणी काही म्हटले तर लेखातत्त्वाचा पाया आहेच की! असा बचावही त्यांनी तयार ठेवला होता.

खरा प्रश्न होता, या लेखा पद्धतीचा वापर कधी, केव्हा, किती काळ आणि कोणत्या खर्चाबद्दल करावा याचे तारतम्य बाळगण्याचा. मत्तांचे (अ‍ॅसेट्स) दोन ढोबळ वर्ग असतात. वित्तीय रोखे, समभाग, ठेवी यांसारख्या वित्तीय गुंतवणुकीदेखील कंपनीच्या मत्ता असतात. त्याचप्रमाणे तयार झालेल्या किंवा अर्ध-तयार वस्तूंचा अद्याप खप न झालेला साठाही ‘मत्ता’ असते. त्यांच्या बदल्यामध्ये कालांतराने रोख रक्कम मिळणार असते. दुसरा मोठा प्रकार म्हणजे ज्या मत्तांमधून भावी काळामध्ये अनेक सोयीसुविधा, लाभ यांचा झरा वाहत राहणार असतो; पण हा झरा काही असातसा हवेतून उपजत नाही. त्यासाठी रोख खर्च करावा लागतोच. इमारत बांधावी लागते. यंत्रे खरेदी करून त्यांची उभारणी करावी लागते. या अर्थाने या प्रकारच्या मत्ता म्हणजे अगोदर खर्च करून भावी काळामध्ये त्यातून लाभाचा झरा उपजणार या स्वरूपाच्याच असतात.

यातच तर हिशेबी गफलतींसाठी तात्त्विक फट सापडते. काही चालू खर्च मत्ताकारक असतात, पण सर्व खर्च मत्ता नसतात. पण जणू काही कोणताही खर्च एखादी मत्ता असल्याचा आव आणला की ‘लबाड गफलत’ सुरू होते. असा ‘काही’ ऐवजी ‘सर्व’ असा अपसव्य अर्थ केला की त्याची लक्षणे काय असतात? नफ्याचा आकार फुगतो आणि ‘काही’ प्रकारच्या मत्तादेखील फुगतात. नफा फुगतो, कारण जो खर्च वजा करायला पाहिजे तो वजा केलाच जात नाही. या जोडीने काही मत्ता फुगतात, कारण ज्या खर्चाची वजावट करायला पाहिजे तो खर्च जणू काही वाढीव मत्ता उभारण्यासाठी केलेल्या खर्चासारखा नोंदला जातो. समजा, शंभर संभाव्य गिऱ्हाइकांना पत्रे पाठविली. त्यासाठी लागणारा कागद, शाई, खोडरबर, छपाईची वीज, लिहिणाऱ्याचा पगार हा गिऱ्हाईक उभारणीचा भांडवलयोग्य खर्च समजा! म्हणून त्याची महसुलात वजावटच करू नका. नफा फुगेल आणि वाढवून ठेवलेल्या जाळ्याचे भावी गिऱ्हाईक सांभाळण्याचा भांडवली खर्च नोंदता येईल! अर्थातच अशा लेखानोंदीमुळे कंपनीच्या भांडवली खर्चात फुगवटा दिसतो. तो व्यवसायातल्या अन्य परिस्थितीशी विसंगत असतो. बाजारात जारी असणाऱ्या वास्तवाशी त्याचा ताळमेळ बसत नाही. पण या सोंगाची चाहूल आधी कुणाला लागू शकते? अर्थातच लेखापरीक्षकांना! कोण होते वर्ल्ड-कॉमचे लेखापरीक्षक (ऑडिटर)? तर ऑर्थर अँडरसन.

ऑर्थर अँडरसनने आपला बचाव करताना म्हटले की, लेखानोंदीमध्ये असा तात्त्विक बदल केला आहे असे आम्हाला सांगितलेच गेले नाही. पुढे २००२ मध्ये कंपनीतील अंतर्गत परीक्षण करणाऱ्या सिंथिया कूपर यांनी हा प्रश्न विचारला आणि संचालक मंडळापर्यंत नेला. तेव्हा त्यांनी केपीएमजी या अँडरसनच्या जागी नेमल्या गेलेल्या कंपनीला सल्ला विचारला. त्या वेळी हे कुभांड उघडकीस आले आणि वित्त व्यवस्थापकांना हाकलण्यात आले. पुढे चौकशीमध्ये लक्षात आले ते वेगळेच. कंपनीअंतर्गत चाललेल्या ई-मेल पाहता या सर्व जबाबदार कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची २००० सालापासूनच पूर्वकल्पना होती.

या लेखाफेरीचा बोभाटा होऊ लागल्यावर अखेरीस २५ जून २००२ रोजी वर्ल्डकॉमने असा अफरातफरी व्यवहार होऊन सुमारे ३.८ अब्ज डॉलर इतका खर्च भांडवली मत्ता खर्च दाखविण्याचा प्रमाद घडल्याचे कबूल करून टाकले. गेल्या तीन वर्षांचा हिशेब केला तर ही रक्कम सुमारे १८ अब्ज डॉलर्स एवढी होती! चालू खर्च मत्ता खर्च दाखवायचे आणि पुढे भावी काळात मत्तांवर घसारा सांगून खर्च दाखवायचा. म्हणजे आजमितीचा खर्च पुढच्या दहा वर्षांवर पसरून टाकायचा असा हा उद्योग! तो आधी कुणालाच कळला नाही? तसेही नाही. सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनने मार्च-२००२ मध्ये निरनिराळ्या सहा खर्च आणि महसूल बाबींचे तपशील वर्ल्डकॉमकडे मागविले होते ते या आणि अशाच संशयापोटी.

हे सगळे सोंग उघडकीला आल्यानंतर वर्ल्डकॉम शेअर्सचे एकूण बाजारमूल्य १५० अब्ज डॉलर्स होते, ते एकदम कोसळून अवघ्या १५ कोटी डॉलर्सवर येऊन ठेपले. व्यवस्थापकीय व कार्यकारी अधिकाऱ्यांना खोटे हिशेब दाखवून शेअर मालकीतून मिळणारे घबाड मोल तर हरपलेच, पण अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचा मेहनताना व मोबदला या शेअर्सच्या भागीने दिला जाईल त्याचाही कापूर उडाला. कंपनीची त्यांची निवृत्तिवेतन फंडाची रक्कम खचली. कारण ती रक्कमदेखील स्वत:च्या व अन्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतविली होती. बाजार कोसळल्याने त्याचेही मोल हरपले. अखेरीस कंपनीचे दिवाळे काढावे लागले आणि ही हिशेबी चलाखी करणाऱ्या वित्त अधिकाऱ्यांवर फसवणूक, हेराफेरीचा ठपका ठेवून शिक्षा ठोठावली गेली. तीदेखील अवघ्या तीन महिन्यांत, हे विशेष!
*लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.