अगदी उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारूनही अंतिम फेरीतून भारताचा क्रिकेट संघ बाद होतो, याची कारणे आपल्या तयारीमध्ये शोधावी लागतीलच. पण विश्वचषकाआधी चार महिने ऑस्ट्रेलियात असलेला, प्रत्येक सामन्यात सपाटून मार खाणारा भारतीय संघ विश्वचषकाचे सामने सुरू झाल्याबरोबर अचानक सुधारतो, किंवा अंतिम लढत दोन यजमान देशांतच होणार हेही स्पष्ट होते.. याची कारणे शोधताना क्रिकेटच्या नियामक-नियोजकांकडेही पाहावे लागेल..
केवळ दहा मीटर अंतरावरून भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक विराट कोहली यास ऑस्ट्रेलियन फलंदाजास धावचीत करण्यासाठी थेट यष्टीचा वेध घेता न येणे आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम सोडा पण साध्या क्षेत्ररक्षकांनीदेखील तब्बल २० ते २५ मीटर अंतरावरून सरळ फेकीत यष्टी उडवून दोन भारतीय फलंदाजांना तंबूत धाडणे हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांतील फरक होता. तेव्हा या फरकास साजेसाच उपांत्य फेरीचा निकाल लागला आणि आपण विश्वचषकाच्या स्पर्धेबाहेर फेकले गेलो. तसे ते जाणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. हे वाक्य अर्थातच क्रिकेट या खेळाकडे भावनिक अंगाने पाहणाऱ्यांना मान्य होणार नाही. परंतु त्यास इलाज नाही. आपल्याकडे सर्वच क्षेत्रांचे नुकसान या भावनेने विचार करणाऱ्या मंडळींनी केलेले आहे. क्रिकेट खेळ त्यास अपवाद नाही. भावनेच्या आधारे प्रगती साध्य करू पाहणारे अंगभूत गुणवत्तेस डोक्यावर घेतात. त्या त्या क्षेत्रातील कोणा एकास देवदेवत्व बहाल करतात आणि आता हा आपला नायक आपला उद्धार करणार या भ्रमात हातावर हात ठेवून मजेत जगतात आणि अंतिमत: पराभूत ठरतात. याउलट अंगभूत गुणवत्ता, प्रतिभा आदी भोंगळ गुणांपेक्षा उत्तम, कठोर प्रशिक्षण, त्यातील सातत्य आणि केवळ आणि केवळ कामगिरीलाच महत्त्व देणारी व्यवस्था हे अंतिमत: विजयी ठरतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा फरक आहे. अलीकडे खेळांचे काही सल समीक्षक भारत कसा ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आहे, अरेला कारे कसा म्हणू लागला आहे त्याच्या दंतकथा पसरवण्यात मश्गूल होते. सिडनीत गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्याच्या निकालाने त्या साऱ्या दंतकथाच निघाल्या. त्या तशाच निघणार होत्या. याचे कारण आक्रमकता ही नुसती देहबोलीतून दिसून चालत नाही. त्या आक्रमकतेस साजेशी कामगिरीदेखील असावी लागते. तशी ती नसेल आणि नुसतीच आक्रमकता असेल तर काय होते हे श्रीशांत या सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या गोलंदाजाकडून शिकता येईल. तेव्हा उपांत्य सामन्यात भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी आहे हे जेव्हा नक्की झाले त्याच वेळी आपल्या पराभवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याचे कारण हे की आतापर्यंत या स्पर्धेत भारताने सलग आठ सामने जिंकले असले तरी त्यातील दक्षिण अफ्रिकेचा एकमेव अपवाद वगळता एकही सामना भारताचा कस पाहणारा नव्हता. भारताच्या पाकिस्तानवरच्या विजयाबाबत बरेच कौतुक केले जाते. ते फसवे आहे. कारण भारताचे जे सामाजिक दुर्गुण आहेत ते पाकिस्तानात, आणि म्हणून पाकिस्तानी क्रिकेट संघात, किती तरी अधिक पटीने भरलेले आहेत. तेव्हा पाकिस्तानला हरवणे हे तुलनेने अधिक सोपे होते. भारताशी सामना असेल तेव्हा तेही बुद्धीपेक्षा भावनेचाच आधार घेतात. या भावनिक पातळीवर आपण त्यांच्यापेक्षा तुलनेने अधिक स्थिर असल्यामुळे अलीकडच्या काळात पाकिस्तानला हरवणे आपल्यासाठी तितके काही आव्हानात्मक नाही. खरे आव्हान होते ते थंड डोक्याने, दोनपाच बळी गेले तरी अविचल बुद्धीने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे. ते आपल्याला पेलले नाही. तसे न पेलण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. त्यांचाही विचार शांतबुद्धीने करणे गरजेचे आहे. तसा तो केल्यास विश्वचषकाचा अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांतच होणे ‘सर्व’ विचार करता गरजेचे होते याची जाणीव होईल.
या गरजांतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचे यजमानपद. या दोन्हीही देशांत क्रिकेट हा काही फार लोकप्रिय खेळ आहे, असे निश्चितच नाही. किंबहुना त्याची लोकप्रियता या दोन्ही देशांत घसरणीलाच लागलेली आहे. त्यात या देशांची संकटात आलेली अर्थव्यवस्था. त्यातही संकटाचे गांभीर्य अधिक आहे ते ऑस्ट्रेलियात. गत साली अवघ्या दोन ते अडीच टक्क्यांनी वाढलेली ही अर्थव्यवस्था यंदाच्या पहिल्या तिमाहीत जेमतेम ०.५ टक्क्यांचा वाढीचा वेग राखेल. तरीही या देशाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजनाचा घाट घातला. अशा वेळी तार्किक पातळीवर विचार केल्यास साधा प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे यजमान संघ अंतिम फेरीत नसेल तर त्या देशांतील गुंतवणूकदारांना त्याचा फायदा काय? त्याच वेळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपांत्य फेरीपर्यंत जर सामन्यांत चुरसच राहिली नाही तर दूरचित्रवाणीवरून हे सामने पाहणार तरी कोण? या टप्प्यावर ध्यानात घ्यावयाची बाब ही की क्रिकेटचे सर्वाधिक प्रेक्षक भारतीयच.. भारतातील वा अन्य देशांतील. तेव्हा भारताचा संघ अगदी प्राथमिक पातळीवरच या स्पर्धेबाहेर गेला तर दूरचित्रवाणी प्रेक्षकांचा सर्वात मोठा समूह या स्पर्धेपासून दूर जाणार हे उघड होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क याने सामन्यापूर्वी केलेले निवेदन ही बाबच अधोरेखित करते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या सामन्यात लक्षणीय आव्हान आहे ते भारतीय प्रेक्षकांचे अशी कबुली ऑस्ट्रेलियाच्या संघनायकाने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिली होती. याचा अर्थच असा की या सामन्यासाठी मोठय़ा संख्येने भारतीय हे ऑस्ट्रेलियात दाखल झाले होते आणि त्यांच्या संख्येची प्रचीती सामना पाहतानाही येत होती. साधारण पंचवीसएक भारतीयांमागे एक ऑस्ट्रेलियी समर्थक मैदानाभोवती दिसत होता. ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेसाठी या इतक्या पर्यटकांचे आगमन हे दिलासा देणारेच असेल. क्रिकेट सामना वगळता अन्य कोणतेही कारण इतक्या मोठय़ा संख्येने पर्यटकांना या दोन देशांत नेण्याइतके सबळ नाही. या सामन्यांच्या काळात ऑस्ट्रेलियाकडे जाणाऱ्या विमान तिकिटांच्या दरांतही घसघशीत वाढ झाली, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचप्रमाणे, सुरुवातीला या सामन्यांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांना मिळणारा जाहिरातींचा प्रतिसाद हा यथातथाच होता. शेवटच्या दोन सामन्यांत तो वाढला आणि त्या प्रमाणात जाहिरातींचे दरदेखील अवाच्या सव्वा वाढले. अशा तऱ्हेने क्रिकेट विश्वचषकामुळे सगळ्यांचेच भले झाले. आता हा युक्तिवाद अमान्य असणाऱ्यांचे म्हणणे असेही असू शकते की भारत जर अंतिम फेरीत गेला असता तर हा फायदा अधिक प्रमाणावर झाला असता. ते झाले नाही. भारत वा ऑस्ट्रेलिया किंवा भारत वा न्यूझीलंड अशी अंतिम फेरी झाली असती तर यजमानांपकी एकाला त्याचा काहीही उपयोग झाला नसता. याचा अर्थ हे सर्व सामने संशयाच्याच भिंगातून पाहावेत काय? याचे उत्तर या क्षणी सरळपणे देता येणार नाही. परंतु विश्वचषकाआधी चार महिने ऑस्ट्रेलियात असलेला, प्रत्येक सामन्यात सपाटून मार खाणारा भारतीय संघ विश्वचषकाचे सामने सुरू झाल्याबरोबर अचानक सुधारतो, हे कसे या प्रश्नाचे उत्तर तरी सरळपणे कसे देता येईल?
क्रिकेट हा विश्वासार्हतेच्या पायरीवर तळाशी आहे तो या आणि अशा प्रश्नांमुळे. ते निर्माण करण्यात खेळाडूंपेक्षाही अधिक वाटा खेळ नियामकांचा आहे. क्रिकेटची सूत्रे हाती असलेले हे सर्व वृत्तीने बाजारू असून त्यांचा जीव खेळापेक्षाही त्यातून येणाऱ्या पैशांत अडकलेला आहे. त्यांच्या या अशा संशयास्पद वर्तणुकीमुळे क्रिकेटमधील सर्वच घटकांबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे. यात सामनेही आले. याचे भान क्रिकेटवर आंधळे प्रेम करणाऱ्यांना नाही. त्यामुळे भारताने अंतिम फेरीत जावे, चषक जिंकावा ही त्यांची अपेक्षा फोल आणि पोकळ ठरली. कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या यजमानांतच अंतिम फेरी व्हावी ही बाजारपेठेची इच्छा होती. अलीकडे सर्व काही ठरते ते बाजारपेठांच्या इच्छेवर. तेव्हा ही बाजारपेठेची इच्छा क्रिकेटचे सामने तरी कशी अव्हेरणार?