बहुकुटुंबी रामन यांचे जर ऐकले असते, तर देशात आज थैमान घालत असलेल्या नक्षलवादाला काही प्रमाणात तरी आटोक्यात आणता आले असते आणि पाकिस्तानातून अतिरेक्यांना मिळणाऱ्या मदतीवर र्निबध आले असते. देशांतर्गत आणि शेजारी देशांमधील हालचालींवर नजर ठेवून धोरणे आखण्यास मदत करणाऱ्या ‘रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ या यंत्रणेचे एक संस्थापक आणि देशातील एक मान्यवर सुरक्षातज्ज्ञ बी. रामन यांच्या निधनामुळे गेल्या पाच दशकांतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा महत्त्वाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. पंजाबातील सुवर्ण मंदिरातील कारवाईपूर्वी ‘रॉ’ने पाकिस्तानातून शीख अतिरेक्यांना कोणत्या प्रकारची मदत मिळते आहे, याची बित्तंबातमी मिळवली होती. त्यापूर्वी बांगलादेशाच्या निर्मिती काळात या संघटनेने मिळवलेली माहिती भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी अतिशय उपयुक्त ठरली होती. भारत-पाकिस्तान युद्धानंतर लगेच म्हणजे १९६८ मध्ये ‘रॉ’ची स्थापना करण्यात आली. पंतप्रधानांच्या आधिपत्याखाली आणि संसदेच्या कक्षेबाहेर असे या संघटनेचे स्वरूप आहे. देशांतर्गत विविध पातळ्यांवर चालू असलेल्या घडामोडींचा अन्वयार्थ लावून त्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती गोळा करणाऱ्या या संघटनेत रामन यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. सुरुवातीच्या काळात ब्रह्मदेशावर (आताचा म्यानमार) लक्ष ठेवण्याची जबाबदारी रामन यांच्यावर होती. पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि चीन या देशांवर लक्ष ठेवून मिळवण्यात आलेली माहिती त्या काळात कितीतरी उपयोगाची ठरली. ‘रॉ’मध्ये हिंसाचारविरोधी पथकाचे प्रमुख राहिलेले रामन, केंद्रीय सचिवालयात अतिरिक्तसचिव या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर महत्त्वाच्या पदांसाठी विचारणा होऊनही रामन यांनी चेन्नईत राहून आपले उर्वरित आयुष्य लेखनात घालविले. सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कडक टीका करणारे लेख असत. इंदिरा गांधी यांच्या वतीने शीख नेत्यांशी राजीव गांधी यांनी केलेल्या चर्चेचे ध्वनिमुद्रण रामन यांनी गुप्तपणे केले होते. या ध्वनिमुद्रणाची लिखित प्रत अथक प्रयत्नांनंतर त्यांनी तयार केली, जी आता सरकारी निष्काळजीपणामुळे काळाच्या उदरात गडप झाली आहे. तो काळ प्रगत तंत्रज्ञानाचा नव्हता. उपग्रहांद्वारे कोणत्याही भूभागावर नजर ठेवणे तेव्हा शक्य नसे. परदेशात प्रत्यक्ष घुसून, लोकांशी बोलून माहिती मिळवणे आणि तिची सत्यता पडताळणे हे फार जबाबदारीचे काम असे. संगणकाची क्रांती झालेली नसल्याने माहिती पाठवणेही तेवढे सोपे नव्हते. अशा कठीण काळात ‘रॉ’ या संघटनेने केलेली कामगिरी प्रशंसनीय ठरली, याचे कारण बी. रामन यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी तेथे पदावर कार्यरत होते. त्यांच्या आत्मचरित्रात ‘रॉ’बद्दल अतिशय महत्त्वाची आणि रंजक माहिती वाचायला मिळते. आता गुप्तचर यंत्रणा आहेत, तरीही त्यांनी दिलेल्या माहितीवर कृती होणे दुरापास्त. अशा वेळी रामन यांच्या ‘रॉ’ दिवसांचे महत्त्व अधिकच खुलते.