शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळणे आणि त्याच वर्षी त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘जाणता राजा’ या भव्यदिव्य नाटकाचा प्रयोग लंडनमध्ये होत आहे ही एक अत्यंत आनंददायक योगायोगाची गोष्ट असून, ‘जाणता राजा’ या नाटकावरील सर्व भल्याबुऱ्या टीका लक्षात घेऊनही त्याचे स्वागतच करायला हवे. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार आहेत की नाहीत हा मुद्दा येथे गौण आहे. आपण इतिहासकार असल्याचा खुद्द त्यांचाही दावा नसून, ते स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणेच पसंत करतात. आता ते सांगतात ती शिवचरितगाथा योग्य की अयोग्य हा झाला वादाचा मुद्दा. तो अभ्यासकांचा प्रांत. कुस्त्या लढाव्यात त्या त्यांनी. तेथे राजकारणी आणि राजकारण यांचे काम नाही. अन्य शिवप्रेमींसाठी शिवरायांचा लोकप्रिय इतिहास पुरेसा असतो. नरहर कुरुंदकरांसारखे थोर विचारवंत जेव्हा शिवरायांच्या संपूर्ण कारकीर्दीतील ‘अफझलखानाचा वध किंवा आग्य््रााहून सुटका यांसारखे प्रसंग किरकोळ’ असे सांगतात तेव्हा त्यामागे इतिहासाच्या प्रवाहांचे एक भान असते. सर्वसामान्यांसाठी मात्र या अशाच थरारक घटनांची मालिका विभूतीपूजेसाठी पुरेशी असते. ‘जाणता राजा’च्या लोकप्रियतेतून हेच दिसून येते. तेव्हा हा असा जनरंजनी नाटय़प्रयोग लंडनच्या भूमीवर होत आहे ही बाब लक्षणीय ठरते. शिवराय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे याबाबत कोणाचेही दुमत नाही. तो संपूर्ण देशाच्याही अस्मितेचा विषय आहे याबाबतही कोणाला संदेह असता कामा नये. मात्र तरीही शिवरायांवरील ‘जाणता राजा’सारख्या एखाद्या नाटकाचा प्रयोग विदेशात व्हावा यासाठी गुजरात सरकार साहाय्य करते तेव्हा ती बाब मराठी अस्मितेला कुठे तरी बोचल्याशिवाय राहणारी नसते. गुजरात टूरिझम ही गुजरात सरकारची संस्था असून, तिच्याप्रमाणेच या नाटकाला बँक ऑफ बडोदानेही साहाय्य केले आहे. त्यामागील प्रेरणा या व्यावसायिक आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. गुजरातमध्ये महाराजांची ओळख अगदी कालपरवापर्यंत ‘सुरतेची लूट’ या घटनेशी निगडित होती. महाराजांनी सुरत लुटली ही ऐतिहासिक घटना असली तरी त्याकडे पाहण्याचे महाराष्ट्राचे आणि गुजरातचे दृष्टिकोन स्वाभाविकच वेगळे आहेत. असे असताना गुजरातमधील जनता व तेथील सरकार इतिहासाचे, दंतकथांचे ओझे दूर सारून महाराजांकडे आपला अस्मितापुरुष या नजरेने पाहात असेल तर ती स्वागतार्हच बाब आहे. गुजरातप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही जण ही शिवकथा अधिकाधिक लोकांसमोर जावी यासाठी पुढे येत असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांचे सहायक सांगतात. तेव्हा स्वाभाविकच प्रश्न येतो तो महाराष्ट्र सरकारच्या कथनी आणि करणीचा. महाराष्ट्र सरकारला शिवप्रभूंबद्दल प्रेम नाही असे कोणीही म्हणणार नाही. परंतु खेदाची बाब एवढीच की त्यांची धाव स्मारकांच्या उभारणीपलीकडे जात नाही.        जाणता राजाचा प्रयोग घेऊन गुजरात सरकार लंडनला जात असेल, या नाटकाचा फायदा आपल्या राज्यातील पर्यटनात वाढ व्हावी यासाठी करून घेत असेल, तर असे काही महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांना का सुचू नये हा खरा प्रश्न आहे. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र सरकारने बाबासाहेबांच्या ‘जाणता राजा’चे प्रयोग जगभर लावत फिरावे. याचा अर्थ एवढाच आहे की जे गुजरात, उत्तर प्रदेश वा बिहारच्या लक्षात येते ते महाराष्ट्र सरकारच्या ध्यानी यायला हवे होते.