21 January 2018

News Flash

सूर्याची पिल्ले..?

निसर्गनियम कोणास चुकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा याच निसर्गनियमाप्रमाणे देहान्त झाला. गेले काही दिवस ज्या गतीने त्यांची व्याधी वाढत होती, ती पाहता हे अटळ

मुंबई | Updated: November 19, 2012 12:23 PM

निसर्गनियम कोणास चुकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा याच निसर्गनियमाप्रमाणे देहान्त झाला. गेले काही दिवस ज्या गतीने त्यांची व्याधी वाढत होती, ती पाहता हे अटळ होते असे म्हणावयास हवे. त्यामुळे जे अटळ आहे त्यास धीरोदात्तपणे सामोरे जाणे हे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी उत्तमपणे पार पाडले असे म्हणता येणार नाही. एक नेता म्हणून बाळासाहेब हे अद्वितीय होते यात शंका नाही. तेव्हा त्यांच्या अद्वितीय तेजाच्या परावर्तित झोतात जमेल तितके आपणही प्रकाशून घ्यावे असे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना वाटत असल्यास ते साहजिक म्हणावयास हवे. परंतु या इच्छेचा अतिरेक स्वत:च्या क्षमतेविषयी शंका निर्माण करणारा ठरेल याची जाणीव बाळासाहेबांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ठेवली असे खचितच म्हणता येणार नाही. बाळासाहेबांची प्रकृती किती नाजूक आहे, ते सेनेच्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणातच जाणवले. तेव्हाच खरेतर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बाळासाहेबांचे हे भाषण हे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रकृतिधर्मास जराही शोभणार नाही, इतके भावनिक होते. आयुष्यभर त्यांनी कधी मला सांभाळून घ्या, अशी याचना केली नाही. ते आपल्याच मस्तीत असायचे आणि ही मस्ती हीच बाळासाहेबांची शान होती. तेव्हा तेच बाळासाहेब माझ्या मुलानातवांना सांभाळून घ्या असे हृदयाला हात वगैरे घालणारे विधान करतील, हेच मुळात अनेकांना कृत्रिम वाटले. सर्वसाधारण परिस्थितीत बाळासाहेबांनी असे विधान कधीच केले नसते. तो त्यांचा स्वभाव नव्हता आणि पिंडही नव्हता. तेव्हा त्यांना असे विधान का करावेसे वाटले वा लागले हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर त्यांच्या गादीवर बसू पाहणाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
 विजयादशमीनंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. दीपावलीच्या मंगलमयी सणाचे आगमन दर्शवणारे आकाशकंदील उजळू लागलेले असताना महाराष्ट्राच्या या स्वयंप्रकाशी नेत्याचे तेज विझू लागले होते. उपलब्ध माहितीवरून असे दिसते की बाळासाहेबांना बलिप्रतिपदेच्या दिवशीच रात्री हृदयविकाराचा झटका आला आणि तो जीवघेणाच ठरतो की काय,
अशी परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या दिव्याचे विझणे लांबवले खरे, परंतु तरीही ते पूर्ण बरे होतील याची शाश्वती आधुनिक वैद्यकशास्त्रही देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती होती. अशा वेळी सेना नेत्यांनी अधिक जबाबदारीने वागत जनतेस खरी माहिती देत राहणे आवश्यक होते. अफाट लोकप्रियतेमुळे बाळासाहेबांच्या विषयी काळजी वाटणारा प्रचंड जनसमुदाय ठिकठिकाणी जमलेला, परिस्थितीची दखल घेत पोलिसांनी अनवस्था प्रसंग उद्भवू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बल तैनात केलेले, सर्व पोलिसांच्या रजा रद्द झाल्याची घोषणा झालेली आणि तरीही याचे कसलेही भान नसलेले सेना नेतृत्व बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती देण्यास तयार नाही, असे निर्नायकी चित्र महाराष्ट्रात जवळपास दोन दिवसांहून अधिक काळ राहिले. हे दुर्दैवी होते. बाळासाहेबांचे जाणे जितके दुर्दैवी आहे त्यापेक्षाही अधिक दुर्दैवी म्हणावे लागेल ते सेना नेत्यांचे या काळातील वागणे. या काळात जो कोणी सेना नेता त्यांच्या निवासस्थानी ख्यालीखुशाली विचारायला जायचा तो बाहेर आल्यावर त्याला हवे तसे बोलताना दिसत होता. हपापलेल्या माध्यमांना ते हवेच होते. सगळेच बोलू लागल्यावर अनागोंदी निर्माण होते. तशीच ती झाली. वास्तविक अशा वेळी कोणी, कधी आणि किती माहिती द्यायची याचे ठाम नियोजन करणे आवश्यक होते. परंतु या काळात सेनेत पक्षीय पातळीवर कमालीची अनागोंदी दिसून आली. तेवढेच ज्ञानप्रकाशात यावे या जुन्या उक्तीप्रमाणे पक्षप्रमुखांच्या आजारपणातही कॅमेऱ्यासमोर जाण्याचा मोह न टाळू शकणाऱ्या वाचाळ नेत्यांना आवरण्याची व्यवस्था असायलाच हवी होती. ते झाले नाही. उद्धव ठाकरे यांना गेल्या महिन्यात हृदयाची तपासणी करण्यासाठी जेव्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते, तेव्हाही हेच झाले होते. त्या वेळी एकामागोमाग एक सेना नेता उद्धव ठाकरे यांच्यावरील अँजियोग्राफी यशस्वी झाली असे माध्यमांसमोर सांगत आपले अज्ञान पाजळून गेले. अँजियोग्राफी यशस्वी झाली म्हणजे काय? उद्या एखाद्या अवयवात काय बिघाड आहे ते पाहण्यासाठी क्ष किरण छायाचित्र काढावे लागल्यास एक्स-रे यशस्वी झाला असे कोणी सांगितल्यास ते जेवढे हास्यास्पद ठरेल तेवढेच अँजियोग्राफी यशस्वी झाली असे म्हणणे केवळ मूर्खपणाचे होते. परंतु तरीही सेना नेत्यांना आवरणारे कोणी नव्हते आणि त्या वेळच्या चुकांचा धडा सेना नेते पक्षप्रमुखांच्या आजारापर्यंत शिकू शकले नाहीत. बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे निवेदन या काळात ठराविक अंतराने प्रसृत करण्याची व्यवस्था जरी सेना नेत्यांनी केली असती तरी पुढचा गोंधळ टळला असता. ही साधी गोष्ट करणे सेना नेत्यांना सुचले नाही वा सुचूनही त्यांनी ते केले नाही. लोकसभेच्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यासदेखील याचे भान राहिले नाही, तेव्हा इतरांचे काय? सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर या काळात कहरच केला. बाळासाहेबांविषयी डॉक्टर का निवेदन करीत नाहीत असे विचारता डॉक्टरांच्या निवेदनाची गरजच काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आणि डॉक्टर आमच्यापेक्षा वेगळे काय सांगणार, असे सांगत त्यांनी ती सूचनाच धुडकावून लावली. येथपर्यंत एकवेळ ठीक म्हणता येईल. परंतु लवकरच खुद्द बाळासाहेबच तुमच्या समोर येऊन निवेदन करतील, अशी अतिरंजित आशा सेना प्रवक्त्याने दाखवली. हे धोक्याचे होते. याचे कारण असे की बाळासाहेबांवर अतोनात प्रेम करणारा प्रचंड मोठा वर्ग गर्दी करून होता आणि त्यांच्या भावभावनांचे व्यवस्थापन अधिक शहाणपणाने करणे गरजेचे होते. समुदायाच्या भावना अनावर झाल्या की काय होते याची जाणीव सेना नेत्यांना नाही असे मुळीच नाही. तरीही सेना नेते जे काही करीत होते ती आत्मवंचना होती आणि ती आवरण्याचे प्रयत्नदेखील कोणी केले नाहीत. परिणामी सेना नेत्यांतच बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी अतिरंजित विधाने करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. त्यातून बाहेर वातावरणात कमालीचा गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण होत गेली. या अस्वस्थतेस अनुचित वळण लागले नाही, हे जनतेचे सुदैव. परंतु याची कोणतीही जाणीव सेना नेत्यांना नव्हती. बाळासाहेबांची प्रकृती इतकी झपाटय़ाने सुधारत आहे तर वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मान्यवरांना, तारेतारकांना भेटून जाण्याचे निमंत्रण का दिले जात आहे हे याच वेळेस अनेकांना उमगत नव्हते. म्हणजे एका बाजूला बाळासाहेब उत्तम आहेत, चमत्कार वाटावा इतक्या झपाटय़ाने सुधारत आहेत असे सांगणारे सेनेचे सुभाष देसाई वा तत्सम कोणी नेते आणि दुसरीकडे तरीही त्यांचे क्षेमकुशल विचारणाऱ्यांची लागणारी रांग. हा विरोधाभास होता आणि आत्मवंचना करीत राहिलेल्या सेना नेत्यांस त्याची चाड नव्हती.
बाळासाहेबांसारखे नेतृत्व जेव्हा क्षितिजाआड जाते तेव्हा ते वास्तव स्वीकारणे अनेकांना.. आणि त्यातही शिवसेनेस-  जड जाणार हे ओघानेच आले. त्यांच्याइतकी नेतृत्वाची चमक कदाचित उत्तराधिकाऱ्यांना दाखवता येणार नाही, हेही समजण्यासारखे आहे. परंतु तरीही विवेकाचा इतका
अभाव असणे हे बाळासाहेबोत्तर सेनेविषयी आश्वासक वातावरण तयार करणारे नाही. तेव्हा आपण अगदीच त्या नेतृत्वसूर्याची पिल्ले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता सेनाप्रमुखांच्या उत्तराधिकाऱ्यांवर आहे.

First Published on November 19, 2012 12:23 pm

Web Title: balasaheb thackeray health and shiv sena leader
  1. No Comments.