News Flash

अराजकातील राजकारण

बांगलादेशातील गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल अजूनही तेथील एकाही पक्षाच्या पचनी पडला नसल्याचे दिसते.

| January 8, 2015 12:57 pm

बांगलादेशातील गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल अजूनही तेथील एकाही पक्षाच्या पचनी पडला नसल्याचे दिसते. त्यात जसा बेगम खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीचा समावेश आहे, तसाच शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगचाही समावेश आहे. सध्याचा तेथील राजकीय गोंधळ हा त्या निवडणूक निकालाचा परिणाम आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तेथे निवडणुका झाल्या. त्यांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यातून शेख हसीना यांच्या पक्षाचा विजय झाला. ज्या निवडणुकीवर विरोधी पक्ष बहिष्कार टाकतात, त्यात मिळालेला विजय हा आपल्या बाजूचा जनादेश आहे हे कोणत्याही पक्षाला मानता येणार नाही. शेख हसीना यांच्या राज्यकारभारात त्याचे भान होते असे वाटावे अशी परिस्थिती नाही. दुसरीकडे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या (बीएनपी) नेत्या बेगम खलिदा झिया यांनीही शेख हसीना यांना सत्तेवरून खेचण्याचा चंगच बांधला आहे. ५ जानेवारी हा निवडणूक बहिष्काराचा स्मृतिदिन म्हणून साजरा करण्याचा प्रकार हा त्याचाच भाग होता. त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हरताळ करून देशात हिंसाचार घडवून सरकारला धक्का देण्याचा विरोधी पक्षांचा बेत असल्याचा अवामी लीगचा आरोप आहे. त्यामुळे आधीच विरोधकांची धरपकड करण्यात आली असून, तेथील प्रसारमाध्यमांवरही र्निबध घातल्याच्याही बातम्या आहेत. बेगम झिया यांना शनिवारपासून पक्षकचेरीतच अडकवून ठेवण्यात आले आहे. पण त्याने उलट ढाक्यातील वातावरण पेटले असून, बीएनपी आणि अवामी लीग यांच्या कार्यकर्त्यांत ठिकठिकाणी हाणामाऱ्या होत आहेत.  हा गोंधळ सुरू असतानाच बीएनपीने एक वेगळाच राजकीय गुगली टाकला आहे. अवामी लीगप्रणीत हिंसाचारामुळे बांगलादेशातील लोकशाही धोक्यात आली असून, तिच्या पुनस्र्थापनेसाठी भारताने हस्तक्षेप करावा अशी मागणी बीएनपीच्या नेत्यांनी केली आहे. शेख हसीनांना भारताच्या एजंट म्हणणाऱ्या बीएनपीने ही मागणी करावी हे विशेष. भारताची सहानुभूती सहसा अवामी लीगच्या बाजूने असते हे उघड गुपित असले तरी उघडपणे तसे दिसू नये एवढी मुत्सद्देगिरी दोन्ही बाजूंकडून दाखविण्यात येते. तरीही अवामी लीगला आवरा अशी मागणी भारताकडे करून बीएनपीने विचित्र डाव टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे यावर काय भूमिका घेतात हे आता महत्त्वाचे ठरेल. शेजारी देशातील अशी अराजकी स्थिती भारतासाठी नेहमीच त्रासदायक असते. त्याने तेथील धर्मवादी शक्तींनाच बळ मिळते असे नव्हे, तर त्याचा द्विपक्षीय व्यापारावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याने भारताला तेथे राजकीय स्वरूपात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यात समस्या एकच आहे की भारताचा हस्तक्षेप तेथील धर्मवादी शक्तींना पुन्हा भारतविरोधी गरळ ओकण्यास निमित्त ठरू शकतो. जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशसारख्या संघटना तर अशाच परिस्थितीची वाट पाहत आहेत. अवामी लीग आणि बीएनपीच्या नेत्यांचे खून पाडून अराजक माजविण्याचा त्यांचा कट नुकताच ‘रॉ’ने उघडकीस आणला होता. हे सर्व पाहता बांगलादेश हे भारतासाठी मोठेच त्रांगडे बनले असून, धरले तर चावते व सोडले तर पळते अशी त्याची अवस्था झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2015 12:57 pm

Web Title: bangladesh politics in chaos
टॅग : Sheikh Hasina
Next Stories
1 विज्ञान परिषदेत मंत्री!
2 पाकबंधू केरी
3 तपासणीचा फार्स
Just Now!
X