kathaबासमतीच्या एका जातीवर अमेरिकेने डोळे मिटून राइसटेक कंपनीला पेटंट दिले. वास्तविक भारताच्या बासमतीवर अशा प्रकारे पेटंट दाखल करणे हे जैविकचौर्य होते.  या घटनेमुळे भारतीय  निर्यातीला चांगलाच फटका बसणार होता आणि म्हणून  आपल्या देशाने अमेरिकेतील या पेटंटला आव्हान देण्याचे ठरविले..
भारतातल्या घराघरांत सणासुदीच्या दिवसांचे एक खास चित्र असते.. आणि त्या चित्राला एक सुवासही असतो.. मिष्टान्न भोजनाचा.. खास खपून केलेल्या चारी ठाव स्वयंपाकाचा वास.. या स्वयंपाकातले पदार्थ सणांच्या परंपरेनुसार आणि ऋतूनुसार बदलत राहतात.. आणि अर्थातच म्हणून स्वयंपाकघरातून येणारे त्यांचे गंधही बदलतात.. पण त्यातला एक गंध मात्र सामायिक असतो.. घमघमणाऱ्या बासमती तांदळाच्या भाताचा गंध.. आज काही तरी ‘खास’ आहे किंवा कुणी तरी ‘खास’ येणार आहे याची वर्दी स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात पोहोचवणारा हा सुपरिचित दरवळ..
‘बासमती’ तांदूळ ही भारताने जगाला दिलेली एक खास देणगी आहे. भारत आणि पाकिस्तानमधल्या पंजाबमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी एका विशिष्ट भागात बासमती पारंपरिक पद्धतीने पिकवला जातो. या भागातले हवामान, पर्जन्यमान, पीक घेण्याची परंपरागत पद्धत, साठविण्याची पद्धत या खास गोष्टींमुळे बासमती हा एक ‘खास’ तांदूळ बनतो. सडपातळ आणि लांब दाणा, ज्याची लांबी शिजविल्यावर दुप्पट होते आणि भात शिजून अतिशय मोकळा पण तरी मऊ बनतो, अप्रतिम चव, अतिशय वैशिष्टय़पूर्ण गंध आणि स्वाद यामुळे बासमती आज जगप्रसिद्ध आहे. शिवाय फार मर्यादित क्षेत्रात या बासमतीचे पीक येत असल्यामुळे एके काळी बासमतीचे उत्पन्न मोजकेच होत असे. आणि यामुळेच इतर तांदळाच्या मानाने तो चांगलाच महागही होता आणि अजून आहेही. भारतातून फार मोठय़ा प्रमाणात या तांदळाची निर्यात होते. विशेषत: मध्य-पूर्वेतील देशांमध्ये.
भौगोलिक निर्देशकांवर लिहिलेल्या मागच्या लेखात आपण पाहिले की, जेव्हा : १. एखादे उत्पादन एका विशिष्ट भौगोलिक भागात बनते आणि २. केवळ त्या भागात बनल्यामुळे त्याला त्याचे खास गुण प्राप्त होतात तेव्हा त्याला भौगोलिक निर्देशकाचा ( geographical indicator किंवा जीआय) दर्जा प्राप्त होतो (पण अर्थात जीआय टॅग मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो). जीआय मिळण्यासाठी असलेल्या या दोन्ही निकषांत बासमती बसतो. पण ट्रीप्स करारात भौगोलिक निर्देशकांचा समावेश झाला तो १९९४ मध्ये.  भारताचा बौद्धिक संपदा कायदा ट्रीप्स करारानुसार बनविण्यासाठी भौगोलिक निर्देशकांवरचा कायदा भारतात बनवला गेला १९९९ मध्ये आणि अमलात आला सप्टेंबर २००२ पासून. त्याआधी जीआय ही संकल्पना भारतात मुळी अस्तित्वातच नव्हती.  ट्रीप्स करारानुसार जर एखाद्या उत्पादनाला ते जिथे बनते त्या देशाने जीआयचा दर्जा दिलेला नसेल तर इतर कुठलाही देश त्याचे जीआय म्हणून संरक्षण करण्यासाठी बांधील नसतो. म्हणजे भारतात बनलेल्या बासमतीवर भारतात जीआय नसेल तर अर्थातच इतर कुठलाही देश त्याचे संरक्षण करण्यास बांधील नव्हता.
झाले असे की, राइसटेक नावाच्या एका अमेरिकन कंपनीने इंग्लंडमध्ये ‘टेकस्मती’ या नावाने तांदूळ विकण्यासाठी ट्रेडमार्क मिळवा म्हणून अर्ज केला. या तांदळाच्या वेष्टनावर टेकस्मती या नावाखाली ‘बासमतीसारखा तांदूळ’ ( basmati like rice ) असे लिहिलेले होते. या ट्रेडमार्कच्या नोंदणीसाठी आधारभूत पुरावा म्हणून राइसटेकने अमेरिकेत मिळवलेल्या एका पेटंटचा दाखला दिला. इंग्लंडमध्ये फाइल करण्यात आलेले हे ट्रेडमार्क अ‍ॅप्लिकेशन ‘बासमती’ या नावाशी साधम्र्य असल्याने ग्राहकांची दिशाभूल करणारे होते आणि म्हणून भारताच्या अ‍ॅग्रीकल्चरल अ‍ॅण्ड प्रोसेस्ड फूड एक्स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटीने (अपेडा) या ट्रेडमार्कचा कडाडून विरोध केला आणि हा ट्रेडमार्क इंग्लंडमध्ये नोंदणीकृत होण्यापासून थांबविले. आणि हे करीत असताना राइसटेकला बासमतीसारख्या तांदळावर अमेरिकेत पेटंट देण्यात आले आहे याचा शोध भारताला लागला आणि मग इथली यंत्रणा खडबडून जागी झाली.
१९९७ मध्ये राइसटेक कंपनीने बासमती तांदळाच्या काही जातींवर अमेरिकेत पेटंट ऑफिसकडून पेटंट मिळवले. या कंपनीचे म्हणणे असे की, त्यांनी भाताच्या सर्वसाधारण जातींवर अनेक प्रयोग केले आणि साधारण १० वर्षांनंतर त्यात बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध आणण्यात त्यांना यश मिळाले. आणि अशा या बासमतीच्या संकरित जातींवर त्यांनी अमेरिकेत पेटंट मिळविले. राइसटेक कंपनी ‘कासमती’ आणि ‘टेकस्मती’ अशा नावाचे तांदूळ अमेरिकेत बनवून विकत असे आणि हे पेटंट मिळाल्यामुळे आता राइसटेक संपूर्ण जगात या तांदळाची ‘बासमतीसारखा तांदूळ’ (asmati like rice) असे उघडपणे वेष्टनावर लिहून निर्यात करण्यास मोकळी होती. खरे तर बासमती हा भारताचा जीआय होता. पण १९९७ मध्ये भारतात हा कायदा अस्तित्वात नसल्याने अमेरिका हा जीआय संरक्षित करण्यास बांधील नव्हती.
राइसटेकच्या तांदळावरील पेटंटमध्ये २० क्लेम्स होते.. म्हणजे थोडक्यात त्यात या तांदळासंबंधित २० वेगवेगळ्या गोष्टींवर अधिकार सांगून मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. १. भारतातील बासमती तांदळासारखा सुवास असलेला तांदूळ देणारी एक भाताची जात. २. तांदळाच्या दाण्याची लांबी ३. त्याचे बियाणे ४. त्यापासून बनणारी रोपे आणि पीक ५. त्याचे पीक घेण्याची पद्धत. ६. लागवडीसाठी रोपे निवडण्याची पद्धत, इत्यादीवर हे क्लेम्स बेतलेले होते. या पेटंटमधले १५ ते १७ क्रमांकाचे क्लेम्स होते भारतीय बासमतीसारख्या असणाऱ्या या जातीच्या भाताच्या गुणधर्मावर.. आणि हे नक्कीच भारतातून अमेरिकेत होणाऱ्या बासमतीच्या निर्यातीला नडणार होते.
भारतात बासमतीवर जीआय नव्हता आणि म्हणून अमेरिका त्याला जीआय म्हणून संरक्षण देण्यास बांधील नव्हती ही झाली एक गोष्ट. पण तरीही जगातील इतर सर्व देशांच्या कायद्यानुसार बासमतीवर पेटंट देणेही अयोग्यच होते. कारण खरे तर पेटंटमधील सर्व गोष्टी भारतात बासमती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना पिढय़ान्पिढय़ा माहीत असलेल्या होत्या आणि जी गोष्ट परंपरागत माहिती असते किंवा तिचे लोकांना ज्ञान असते तिच्यावर पेटंट घेता येत नाही. जे ज्ञान जगातील एखाद्या देशातील लोकांना परंपरागत ठाऊक आहे ते सामाजिक अखत्यारीत आहे, सगळ्या समाजाच्या मालकीचे आहे असे समजले जाते. त्यावर कुणाही एकाला मक्तेदारी प्रस्थापित करता येत नाही आणि ती तशी करता येऊ नये म्हणून त्याला जगातल्या कुठल्याही देशात पेटंट दिले जात नाही. पण अमेरिकन पेटंट कायदा मात्र याला अपवाद होता. एक बलाढय़ आíथक महासत्ता असल्यामुळे अमेरिका अनेक बाबतीत सगळ्या जगापेक्षा वेगळे नियम आणि कायदे आपण या सर्वमान्य गोष्टींना अपवाद आहोत, सर्वापेक्षा दशांगुळे वर आहोत असे समजून स्वत:साठी राबवीत असते. अमेरिकेचे exceptionalism  हा काहीसा हम करे सो कायदा असाच प्रकार असतो. तोच प्रकार इथेही होता आणि म्हणूनच अमेरिकेच्या पेटंट कायद्यानुसार मात्र तेव्हा असे पारंपरिक ज्ञान जर अमेरिकेतील जनतेला ठाऊक असेल तर त्यावर पेटंट दिले जाणार नाही, पण जर ते दुसऱ्या कुठल्या देशाचे पारंपरिक ज्ञान असेल तर त्याला पेटंट देता येईल असा नियम होता. मुळात अमेरिका हा वयाने अतिशय लहान देश असल्याने त्याला त्याची अशी काही संस्कृती आणि परंपरा नाही. आणि म्हणून मग दुसऱ्या कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानाची फिकीर करण्याची अमेरिकेला आवश्यकता वाटत नसे. त्या देशातील पारंपरिक ज्ञान सरळ चोरी करून अमेरिकेत व्यापारीकरणासाठी वापरता यावे हाच यामागचा उद्देश. आणि त्यामुळेच बासमतीच्या या जातीवर अमेरिकेने डोळे मिटून राइसटेक कंपनीला हे पेटंट दिले. वास्तविक भारताच्या बासमतीवर अशा प्रकारे पेटंट फाइल करणे हे जैविकचौर्य (biopiracy) होते.
या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानच्या बासमती उत्पादकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. कारण राइसटेक त्यांचा तांदूळ आता सरळ ‘बासमतीसारखा तांदूळ’ म्हणून अमेरिकेत विकणार होती. भारतातून अमेरिकेत होणारी बासमती तांदळाची निर्यात ही बासमतीच्या एकूण निर्यातीच्या १०% एवढी होती. १९९७ सालात भारताने अमेरिकेत जवळजवळ सहा लक्ष टन बासमती निर्यात केला होता आणि या घटनेमुळे या निर्यातीला चांगलाच फटका बसणार होता. या भीतीमुळेच भारतातल्या बासमती उत्पादकांनी भारत सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आणि तब्बल ३० महिन्यांनंतर २००० साली भारताने अमेरिकेतील या पेटंटला आव्हान देण्याचे ठरविले.
मृदुला बेळे
( या लेखाचा पुढील भाग पुढच्या आठवडय़ात)

Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
china vs us
अरुणाचलबाबत अमेरिका भारताच्या बाजूने, चीनचा जळफळाट; म्हणे, “अमेरिका आमच्यात भांडणं लावतेय!”
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य