मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने आयपीएलमधील सट्टेबाजीबाबत ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय दिला. पण खरेच याने आयपीएलवर किंवा तिच्या विश्वासार्हतेवर किंवा तिच्या अमाप चाहत्यांवर काही फरक पडणार आहे का, तर याचे उत्तर नाही असेच आहे. या निर्णयाने आयपीएल बंद पडणार या वावडय़ा वांझोटय़ाच आहेत. कारण बीसीसीआयला क्रिकेट जास्त कळत नसले तरी धंदा नक्कीच चांगला कळतो. त्यामुळेच त्यांनी चॅम्पियन्स लीगसारखा पांढरा हत्ती पोसणे बंद केले. बीसीसीआयमधून सोन्याचा धूर निघतो आणि आयपीएल ही सोन्याची खाण, त्यामुळे ते ही खाण कधीच बंद पाडणार नाहीत. क्रिकेट या खेळावर अमानुषपणे अत्याचार करीत त्यांनी आयपीएल नावाचे गोंडस बाळ जन्माला घातले. संघटनेचे माय-बाप बदलतील, पण या बाळाला कोणतीही इजा ते पोहोचवणार नाहीत. अशा प्रकरणांनंतर आम्ही क्रिकेट स्वच्छ करू, असे म्हणत प्रशासक नेहमीच आशादायी गोडवे गात चाहत्यांना गंडा घालत राहतात आणि चाहतेही त्याला भुलतात. बीसीसीआयचा ट्वेन्टी-२० क्रिकेटला सुरुवातीला विरोध होता, भारताने पहिला विश्वचषक जिंकला आणि ललित मोदी या पक्क्या व्यावसायिकाने कोटय़वधी रुपये मिळवून देणारा बिनपैशांचा तमाशा सुरू केला. बीसीसीआयला त्यामध्ये धंदा दिसला, त्यासाठी खेळाडूंना विकले गेले आणि तिथेच खेळ धनाढय़ांच्या पायाशी लोळण घालायला लागला. सट्टेबाजी आणि सामनानिश्चितीसाठी तर हे कुरणच. पकडले गेले ते मयप्पन-कुंद्रा, बाकीच्या शिरजोरांचे काय? सट्टेबाजीमध्ये खेळाडूंचा हातभार नसेल? मग त्यांची नावे पुढे येणार की नाहीत? सारेच अनुत्तरित राहणारे प्रश्न. आयपीएलमध्ये ‘स्ट्रॅटेजिक टाइम आऊट’ ही भानगड कशासाठी आहे, याचे चोख उत्तर बीसीसीआयकडे नाही, पण या ‘स्ट्रॅटेजिक टाइम आऊट’नंतर बरेच संघ जिंकता जिंकता हरतात आणि काही हरता हरता जिंकतात, याचे उत्तर कुणाकडेही नसेल. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा प्रकार नाही, पण आयपीएलचा तो एक अविभाज्य भाग आहे. मालकाने सांगितल्यावर खेळाडूंची त्यांना नाही म्हणायची बिशाद ती काय, ते विकले गेलेलेच. त्यांना या चंगळवादी युगात पैसा हवाच. आता पूर्वीसारखे खेळाला देव मानणारे खेळाडू कमीच, त्यांच्यासाठी पैसा हाच देव. आयपीएलने क्रिकेटला काय दिले? एक तर खेळ नासवला. वाकडेतिकडे फटके आले. खेळाडूंची स्वप्ने बदलली. देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळणे त्यांना गौरवशाली वाटू लागले. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुखापतीमुळे न खेळणारे खेळाडू आयपीएलसाठी दंड थोपटून उभे राहिले. खेळाचा आत्मा हरवला तो यामुळेच. लोकांचीही अभिरुची बदलली. त्यांना शास्त्रीय संगीतापेक्षा रिमिक्स आवडायला लागले, तसेच क्रिकेटचेही. त्यांना आयपीएल आवडत, पण रणजी स्पर्धेकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आयपीएलवर कितीही आरोप झाले, काळिमा फासला गेला तरी ही स्पर्धा अ‍ॅनेस्थेशियासारखी लोकांच्या नसांमध्ये भिनली आहे. त्यांना रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा हवाच, तेच काम आयपीएल करते. पैसा फेक आणि तमाशा देख. त्यामुळे आयपीएल चाहते बंद पाडणार नाहीच. प्रश्न हा आहे की, या निर्णयामुळे काय फरक पडणार? तर काहीच नाही. बीसीसीआय दोन नवीन फँ्रचाइजी निवडणार, ते खेळाडूंना लिलावात विकत घेणार, आयपीएल ‘नॉट आऊट’च राहणार, पण खेळाचे काय, हे मात्र न विचारलेलेच बरे!