बीसीसीआयमधील धुरीणांना कुणाचा काटा कसा काढायचा हे सांगायला नको. सध्याच्या घडीला सापही मारायचा आणि काठीही तुटली नाही पाहिजे, असा प्रयोग ते प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याबाबतीत करताना दिसत आहेत. यंदाच्या दौऱ्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण हा भारताचा काही पहिला लाजिरवाणा पराभव नव्हता. गेल्या वेळी इंग्लंड आणि त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. मग या वेळीच फ्लेचर यांची हकालपट्टी बीसीसीआयला का करावीशी वाटत असावी, यामागे काही कारणे नक्कीच असावीत. फ्लेचर हे काही प्रथितयश प्रशिक्षक वगैरे नव्हते. इंग्लंडचे प्रशिक्षक असताना त्यांना जास्त विजय मिळाले नव्हते. पण तरीदेखील बीसीसीआयने त्यांची नियुक्ती केली. कारण भारतीय खेळाडूंना आपले ऐकणारा प्रशिक्षक हवा असतो, याला आतापर्यंतचा इतिहास आहे. कारण खेळाडूंना त्यांची मनमानी करायची असते आणि ते बीसीसीआयलाही चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी मितभाषी फ्लेचर यांना प्रशिक्षकपदावर आणले आणि त्यानंतर त्यांना मुदतवाढही दिली. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या आणि संघाच्या कामगिरीचा आलेख जास्त काही उंचावला नाही. आता विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना, संघात नक्कीच बदल करायला हवेत, असे बीसीसीआयला वाटले आणि त्यामुळेच त्यांनी या पराभवानंतर रवी शास्त्रीला भारतीय संघाचे सूत्रधार बनवले, तर संजय बांगरसह एकूण तीन साहाय्यक प्रशिक्षकही नेमले. त्याच वेळी बीसीसीआयने फ्लेचर यांच्या साहाय्यकांना काही काळ यांना विश्रांती देऊन अधांतरी करून सोडले. त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा बीसीसीआयने वाजवली असली तरी फ्लेचर शांतच. त्यातच कर्णधार धोनीने फ्लेचरच विश्वचषकापर्यंत आमचे प्रशिक्षक असतील, असे म्हटल्यावर त्यांनाही थोडेसे हायसे वाटले असणार. पण समोरच्याला बेसाधव करून त्याच्यावर निशाणा साधायची बीसीसीआयची खेळी कदाचित फ्लेचर यांच्या लक्षात आली नसावी.  बीसीसीआय थेट फ्लेचर यांची गच्छंती करू शकली असती, पण त्यामुळे विदेशी प्रशिक्षकांपर्यंत वाईट संदेश गेला असता आणि हेच त्यांना नको होते. आता या दौऱ्यानंतर बीसीसीआय फ्लेचर यांच्यासहित शास्त्री आणि बांगर यांच्याकडून अहवाल मागवून घेईल आणि फ्लेचर यांच्या हकालपट्टी प्रक्रियेच्या तयारीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. प्रशिक्षक आणि संघातील खेळाडूंमध्ये सुसंवादाचा अभाव असल्यामुळे कामगिरीवर परिणाम होत असल्याचे मत काही टीकाकारांनी व्यक्त केले होते. त्यामुळे सध्या बीसीसीआय देशी प्रशिक्षक नेमण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी राहुल द्रविडला संघाच्या फलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यावेळी त्याचा प्रशिक्षकपदासाठीचा पर्याय बीसीसीआयने चाचपडून पाहिला असावा. व्यस्त कार्यक्रमांमुळे त्याने संघाची सूत्रे हाती घेण्यास नकार दिला आणि शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी नेमण्यात आले. कदाचित द्रविडचा स्वतंत्र काम करण्याचा मानस असू शकतो. त्यामुळे फ्लेचर यांची हकालपट्टी झाल्याशिवाय तो संघाचा प्रशिक्षक होण्यास तयारही नसावा. यंदाच्या आयपीएलच्या मोसमात किंग्ज इलेव्हनने अंतिम फेरी गाठली आणि संजय बांगर प्रकाशझोतात आला. त्यामुळे त्याचा पर्यायही बीसीसीआयकडे असेल. फ्लेचर यांच्यानंतर प्रशिक्षक कोण, हा प्रश्न सर्वाना पडला असेल, पण बीसीसीआयने त्याची तरतूद नक्कीच केलेली असणार. त्याशिवाय ते फ्लेचर यांच्यासाठी सापळा रचणार नाहीत.