अठराव्या शतकाच्या मध्यावर  लावणी हा वाङ्मय प्रकार बहरला. बहुतेक लावणीकरांनी भेदिकांच्या नावाखाली आध्यात्मिक व पारमार्थिक गूढ प्रमेये उकलणारी कविताही लिहिली आहे. याला तथाकथित खालच्या जातीतून आलेले कवीही अपवाद नाहीत. संतांच्याच शिकवणुकीमुळे असे गूढ ज्ञान हे मराठी माणसाच्या सामान्य ज्ञानाचा हिस्सा झाले होते.
मराठी समाजाच्या स्थितिगतीचा विचार इतिहासाच्या संदर्भात करायचा झाल्यास अठरावे शतक हे नि:संशयपणे मराठय़ांचे शतक म्हणावे लागते. हे ऐतिहासिक वास्तव एका वेगळ्या प्रकारे स्पष्ट करता येईल.
पूर्वीचे हिंदी चित्रपट आणि आताच्या हिंदी वाहिन्यांवरील विविध मालिका आपल्यापैकी बरेच जण पाहत असतात. त्याच्यातील पात्रांची नावे पाहिली तर मल्होत्रा, चोप्रा, कपूर, शर्मा, सिंग, सिन्हा, खन्ना, गुप्ता अशीच दिसून येतात. असे का होते, असा प्रश्नही आपल्याला पडत नाही, कारण ही नावे व्यापार-उद्योगादी विविध कारणांनी संपूर्ण भारतभर पसरलेल्या लोकांची आहेत आणि त्यामुळे ती भारतातील सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना परिचित असतात, त्यांच्या ती अंगवळणी पडलेली असतात.
समजा, अशा प्रकारचे चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्या अठराव्या शतकात अस्तित्वात असत्या आणि त्यांना मनोरंजनाचा असाच रतीब घालायचा असता, तर त्यांनी कोणत्या नावांचा उपयोग केला असता किंवा त्यांना तो करावा लागला असता?
त्यातील साठ-सत्तर टक्के नावे तरी मराठी माणसांची असती, असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. कारण तेव्हा हीच माणसे संपूर्ण भारतभर पसरलेली होती व त्यामुळे परिचित होती. व्यापार-उद्योगाच्या निमित्ताने नव्हे, तर राज्य जिंकण्यासाठी आणि चालवण्यासाठी. याला भारताची कोणतीच दिशा अपवाद नव्हती. दक्षिणेतील तंजावरच्या भोसले घराण्याच्या राज्याचा जीव किती लहान किंवा मोठा होता, हा प्रश्न नाही. हे राज्य दक्षिणेतील अनेक भाषांमधील साहित्यनिर्मितीचे आणि कलेच्या आविष्काराचे केंद्र बनले होते. पूर्वेकडील संपूर्ण ओरिसा प्रांत नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात होता व ते बंगालच्याच सीमांना धडक मारीत होते. मालवा मध्य प्रांतात शिंदे, होळकर, पवार सत्ता गाजवीत होते. त्यात सागरच्या परिसरात क ऱ्हाडी ब्राह्मणाची घराणी नावारूपाला आली होती.
उत्तर हिंदुस्थानातील विविध सत्ताधीशांच्या दरबारात मराठय़ांचे वकील आणि प्रतिनिधी यांचा नियमित राबता असे. पश्चिमेतील गुजरातचा कारभार गायकवाडांच्या हातात एकवटला होता, तर राजस्थानमधील विविध राज्यांशी मराठय़ांचा संघर्ष चालत असला, तरी त्याला मराठय़ांची खुमखुमी किंवा हव्यास हे कारण नसून मुळात स्वेच्छेने मोगलांचे मांडलिकत्व पत्करून व त्यांना नियमित वसूल देण्याचे कबूल केलेल्या राजपुतांनी बाकी थकवणे आणि देण्यास टाळाटाळ करणे हे होते. यात मराठय़ांची भूमिका ही बँकेच्या वसुली अधिकाऱ्यासारखी होती, कारण दिल्लीच्या बादशाहशी झालेल्या करारानुसार ही रक्कम त्यांनी वसूल केली तरच त्यांना त्यातील चौथाई अथवा चवथा भाग आपल्याकडे ठेवायचा अधिकार प्राप्त झाला. यात लांडीलबाडी, जुलूम, जबरदस्ती किंवा दडपशाही असे काही नव्हते. या सर्व प्रदेशातील प्रशासन व्यवस्थेला अंतिमत: मराठेच जबाबदार होते, हे विसरता कामा नये.
वेगवेगळ्या दिशांमधील स्थानिक प्रदेशाचे सत्ताधीश एवढय़ावर मराठय़ांचे समाधान होणार नव्हते. त्यांची दृष्टी दिल्लीच्या तख्तावर होती; पण हे तख्त थेट बळकावण्याचा गैरमुत्सद्दीपणाही ते करणार नव्हते. दिल्लीच्या बादशाहला आपल्याच हातात ठेवून त्या माध्यमातून हिंदुस्थानची सत्ता गाजवणे हे त्यांनी धोरण शाहू महाराजांपासून अंगीकारले होते. त्याची सांगता महादजी शिंदे यांच्या हातून झाली. मोगलांच्या ज्या दरबारात इतर सर्वसामान्य मानकऱ्यांप्रमाणे साक्षात शिवाजी महाराजांनासुद्धा उभे राहावे लागले, त्या दरबारात बादशाहने एकटय़ा महादजींना बसण्याचा मान दिला. इतकेच नव्हे, तर बादशाहची राजधानी दिल्ली किंवा आग्रा येथे असण्याऐवजी मथुरेला महादजींच्या छावणीत भरू लागली. यात सर्व काही आले.
मराठय़ांच्या इतिहासातील तिसऱ्या म्हणजे साम्राज्यपर्वात त्यांचा आत्मविश्वास किती वाढला होता याची काही प्रमाणे उपलब्ध होतात. थोरल्या बाजीरावांनी दिल्लीसह उत्तर काबीज करण्याचा इरादा व्यक्त केला, तेव्हा शाहू महाराजांनी तुमच्यासारखे लोक असतील, तर हिमालयापलीकडील किन्नरखिंडीचे राज्यही जिंकता येईल, या अर्थाचे उत्साहवर्धक उद्गार काढले होते. राघोबाने नानासाहेब पेशव्यास लिहिलेल्या पत्रात समशाम म्हणजे इस्तंबूल तथा कॉन्स्टॅन्टिनोपलपर्यंतच्या राजकारण करण्याच्या गोष्टी केल्या आहेत.  मराठी राज्याच्या या तिसऱ्या पर्वात मराठय़ांच्या हालचालींची व्याप्ती वाढली. ती भारतव्यापी झाली म्हणून तर अठराव्या शतकातील भारताचा इतिहास हा मोठय़ा प्रमाणात मराठय़ांचा इतिहास आहे म्हणून तर १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इतिहास संशोधकांच्या संस्थेचे नाव महाराष्ट्रेतिहास मंडळ असे न ठेवता ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ ठेवण्यात आले. अठराव्या शतकातील मराठे राष्ट्रीय राजकारण करून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने झेपावत होते, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.
या सर्व गोष्टींचा मराठी साहित्याशी संबंध काय, या प्रश्नाकडे वळायला हरकत नाही. विस्तारलेल्या हालचालींमुळे व नानाविध लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तसेच सत्तेतून संपत्तीची व समृद्धीची प्राप्ती झाल्यामुळे मराठय़ांच्या जीवनशैलीतही बदल झाला. विशेषत: मोगल दरबारातील ऐश्वर्याची व भोगविलासाची लागण मराठी साहित्याला झाल्याशिवाय राहिली नाही. अठराव्या शतकाच्या मध्यावर बहरलेला लावणी हा वाङ्मय प्रकार दुसरे काय सूचित करतो.
१७५० च्या सुमारास पिंपळनेरच्या संत निळेबारायांच्या निर्वाणाच्या वेळी इकडे पुण्यात पेशव्यांच्या दरबारात सातप्पा गवळी हा लावणी रचणारा कवी उदयाला आला. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांचा काळ हा लावणीचा काळ म्हणायला हवा. (मोरोपंत हा मोठा अपवाद) १८४८ दरम्यान शाहीर परशुरामाचा मृत्यू ओढवला आणि याच काळात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख ‘प्रभाकर’ पत्रातून ‘शतपत्रे’ लिहू लागले.
तत्त्वत: लावणीला विषयाचे वावडे नसले, तरी तिच्यात शृंगाररसाला प्राधान्य असते. पारंपरिक साहित्यशास्त्राप्रमाणे शृंगाराचे ‘संभोग शृंगार आणि विप्रसंभ शृंगार’ असे दोन प्रकार होतात. मराठी कवींनी या दोन्ही प्रकारांत प्रावीण्य संपादन केले. त्यांच्या संभोग शृंगारप्रसंगी औचित्याच्या सीमा ओलांडून अश्लीलतेकडे झुकतो. त्याचे स्पष्टीकरण स्वत: कवीच्या वृत्तीत शोधता येते तसेच ‘मागणी तसा पुरवठा’ या सूत्राची आठवण ठेवून उत्तर पेशवाईत झालेल्या सार्वत्रिक मूल्यऱ्हासाकडेही निर्देश करावा लागतो.
विप्रसंभ शृंगारासारख्या अवघड आणि अनवट प्रकारात हे कवी शिरतात, तेव्हा त्यांच्या प्रतिभेला दाद द्यावीच लागते. अगोदरच स्पष्ट केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील लोक या काळात हिंदुस्थानभर फैलावले आणि त्या त्या भागातील बऱ्या-वाईट गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. त्याचे प्रतिबिंब लावणीत पडत होते. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा, की विशेषत: लष्करी पेशाचे तरुण घर सोडून परप्रांतात, खरे तर लढाया मारण्यासाठी जात, तेव्हा त्यांच्या नवपरिणीत बायकांना जो विरह सहन करावा लागे, त्याची अभिव्यक्ती विप्रसंभ शृंगाररसातून होत असे. अशा शेकडो लावण्या सापडतील. त्यात लढाईला जाऊच नका असा हट्ट करणारी, लढाईतील विजयाच्या बातमीने हर्षभरित होणारी, परमुलखातील एखादी सवत आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडते की काय, या चिंतेने ग्रस्त झालेली, प्रश्न नुसता दूर जाण्याचा नसून युद्धासारख्या बेभरवशाच्या व धोक्याच्या प्रकरणात जगून-वाचून सुखरूप परत यायचा असल्याने परमेश्वरावर हवाला ठेवून उपासतापास करणारी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नायिका उभ्या करीत या कवींनी सातवाहनकालीन प्राकृत गाथासप्तशतींशी आपली नाळ जोडली. त्यांना या प्राकृत गाथा माहीत असण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरीही मुद्दा संवेदन स्वभावाचा असतो.
हे सर्व होत असताना या कवींचे मराठी साहित्याच्या मूळ प्रवाहाशी म्हणजेच संत साहित्याशी असलेले नाते तुटले नव्हते याची नोंद घ्यायला हवी. बहुतेक लावणीकरांनी भेदिकांच्या नावाखाली आध्यात्मिक व पारमार्थिक गूढ प्रमेये उकलणारी कविताही लिहिली आहे. याला तथाकथित खालच्या जातीतून आलेले कवीही अपवाद नाहीत. संतांच्याच शिकवणुकीमुळे असे गूढ ज्ञान हे मराठी माणसाच्या सामान्य ज्ञानाचा हिस्सा झाले होते.
महाराष्ट्रातील सर्व जाती-जमातींनी मराठी भाषेला संतकवी दिले आहेत. तसाच प्रकार लावणीच्या बाबतीतही झाला. सगनभाऊ हा खरे तर धर्माने मुसलमान, जातीने शिकलगार. त्याच्या लावणीतील एक विरहिणी काय विनवणी करते ते पाहा –
‘ज्ञानेश्वराची ओवी, जनीचा अभंग कोणी तरी गा रे।
पतीच्या शोकांतरे हळहळते संत हो वारा।।’
महाराष्ट्रात रुजू पाहणाऱ्या नव्या शृंगारप्रधान दाहक जीवनशैलीला सामोरे जाऊन समर्थपणे पेलण्यासाठी या कवींना संतांचा आश्रय घ्यावासा वाटला. होनाजीचा चुलता बाळा गवळी लिहितो – बाळा बहिरूचे कवन जहर विषाचा प्याला। गाळून वचनी अग्नीतून निघाला। धोंडीराज म्हणे चातुर ऐकून रिझला। तुकाराम विश्राम जिवाचा भजला।।’’
मराठी मातीतून उगवलेल्या व तरारलेल्या या जीवनाविषयी प्रख्यात धर्मचिंतक व व्याकरणकार दादोबा पांडुरंग हे काय म्हणतात ते विचारप्रवृत्त करणारे आहे. ‘मला त्याची (होनाजीची) कोठे कोठे शब्दांची ठेवण फार सुरस वाटते व लावण्यांचे नवे नवे छंद व तऱ्हेतऱ्हेच्या धारण्या हे मराठी कवी कोठून व कसे काढीत असत याचे मला आश्चर्य वाटते. जसे इटली व जर्मनी येथे होगार्थ आदि करून अपूर्व गायनाचे कल्पक होऊन गेले, त्याच मासल्याची त्यांची स्तुत्य कल्पना होय. यात होनाजी बाळा आदि करून गरीब मराठी कवी यांजवर मी का रागवावं? असले बीभत्स कवी संस्कृत भाषेत पाहिजे तितके सापडतील.’
दादोबांच्याच या शेऱ्यावर वेगळे भाष्य करायची गरज नाही.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन ’ हे सदर

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार