सुस्थितीतल्यांनी स्वत:ला अपराधगंडात कुरतडणे आणि दु:स्थितीतल्यांनी स्वत:चा ग्रस्ततागंड कुरवाळणे, यातून विधायक असे काहीच हाती लागत नाही. भाग्य आणि न्याय या दोन भिन्न प्रांतांमध्ये गल्लत केल्याने दोन्ही आघाडय़ांवर नुकसानच होते. भाग्य स्वीकारता येण्यासाठी लागणारी प्रसन्नता आपण गमावून बसतो आणि न्यायप्रस्थापना करण्यासाठी लागणारी निर्धारशक्तीदेखील गमावून बसतो..
अमेरिकेची युद्धखोर वर्चस्ववादी प्रवृत्ती सर्वश्रुत आहे. तिने मध्यपूर्वेमध्ये केलेल्या अनेक कारवायांचा एक खुलासा ‘अरबांच्या तेलावर डोळा ठेवून’ असा केला जातो व त्यात तथ्यही दिसते. पण आत्ता अमेरिकन युद्धखोरी हा विषय नाहीये. जेव्हा आपण ‘अरबांचे तेल’ असे म्हणतो तेव्हा नैसर्गिक संपत्तीची सध्या असलेली राष्ट्रनिहाय विभागणी गृहीत धरून बोलतो. त्या पातळीवर ते ठीकही आहे. पण आपल्याला असे म्हणायचे नसते की, ते तेल ही जणू काही अरबांनी श्रमातून/उद्योजकतेतून ‘कमावलेली’ गोष्ट आहे. अरब ज्या भूमीत असत आलेले आहेत त्या भूमीत तेल असणे ही निव्वळ योगायोगाची गोष्ट आहे. या गोष्टीत अरबांचे श्रेय असे काही नाही. हे ‘अरबां’ बाबत असल्याने पटायला सोपे जात असेल, तर ध्यानात घ्या, की इथे भूमिपुत्र-अधिकार ही कल्पनाच आव्हानित होते आहे.
एक उलटे उदाहरणही घेता येईल. बांगलादेशच्या भूमीत अस्रेनिक हे विषारी द्रव्य आहे आणि अनेक बांगलादेशी नागरिकांना त्याचे कमी-अधिक त्रास होत आहेत. पण अस्रेनिक असणे हीदेखील योगायोगाचीच गोष्ट आहे. इतिहासात बाकी काहीही घडलेले असो, पण असे नक्कीच घडलेले नाही की, अरबांनी बांगलादेशींच्या भूमीतून तेल पळवले व अस्रेनिक घुसडून ठेवले! तेव्हा बांगलादेशींचे दुर्भाग्य हे अरबांच्या कृतीतून वा अरबांच्या सुभाग्यामुळे निष्पन्न झालेले नाही.
‘भाग्य’ म्हणताना आज आपण, पूर्वसंचित, प्रारब्ध, दैव, प्राक्तन असले काहीही मनात येऊ देणार नाही आहोत. भाग्य ही, वाटप करण्याजोगी एकजिनसी वस्तू (एनटीटी) नाही. त्यामुळेच, ती एकाला मिळण्यासाठी दुसऱ्याकडून काढून घेणे अटळ ठरेल, ही कल्पनाच चुकीची आहे. समजा माझ्या गावात एखादी रोगाची साथ आली. त्यात ३०० जणांना लागण झाली व त्यापकी २०० जण वाचले. समजा लागण होऊन वाचलेल्यांत मीही आहे. याचा अर्थ असा नसतो की मी कुणातरी ३०१व्या व्यक्तीला तरी लागण होण्यापासून वाचविलेले असते! मला लागण झाली नसती तर लागण झालेल्यांची संख्या २९९च भरली असती इतकेच. तसेच २०० वाचलेल्यात ‘मोडण्या’मुळे मी कोणा २०१व्याला मारलेले असते, असेही होत नाही! मीही मेलो असतो तर वाचलेल्यांची संख्या १९९च भरली असती इतकेच! म्हणजेच, सुभाग्ये/दुर्भाग्ये ही थेटपणे एकमेकांना कारणीभूत ठरत नसतात.
एखाद्याला स्टेफी ग्राफ का आवडावी व किती तीव्रतेने आवडावी हा त्याचा खासगी प्रश्न आहे. पण त्याला मोनिका सेलेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा कदापिही अधिकार नाही. अशा पिसाट प्रेमिकाच्या दृष्टीने मोनिकाचे असणे हा जणू स्टेफीवर अन्यायच असतो!
जबाबदार कोण? मी, अन्य की कोणीच नाही?
विविध प्रकारच्या सुस्थिती व दु:स्थिती, आपल्या वाटय़ाला येत असतात. या स्थितींना जबाबदार कोण? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. या प्रश्नाला एक तर आपणच किंवा इतर कोणी किंवा कोणीच नाही अशी तीन प्रकारची उत्तरे संभवतात. एका स्थितीला एकाच प्रकारचे उत्तर लागू असेलच असेही नसते. बहुतेक वेळा या तीनही प्रकारांचे मिश्रण कारणीभूत झालेले असते.
जेव्हा आपल्यातील आत्मोद्धारक सद्गुणांच्या जोरावर आपण सुस्थिती कमावलेली असते तेव्हा तिचे श्रेयही आपल्याला मिळते. याउलट आपल्यातील आत्मघातकी दुर्गुणांपायी आपण जी दु:स्थिती ओढवून घेतो तेव्हा तिचे अपश्रेयही आपल्याला पत्करावे लागते. जेव्हा आपली दु:स्थिती ही अन्य कोणी लादलेली असते तेव्हा, ‘आपल्यावर अन्याय झाला’ असा दावा करता येतो. अर्थात आपणही इतरांवर अन्याय करून काही फायदे लाटत असतो. जिच्यात कोणालाच जबाबदार धरता येणार नसते अशा गोष्टीला सुभाग्य किंवा दुर्भाग्य असेच म्हणावे लागते. इतरांचे आपल्याबाबतचे औदार्य हेही आपल्या सुस्थितीचे कारण असू शकते (व तसेच उलटपक्षी). पण इतरांचे औदार्य हा आपला हक्क असत नाही. त्यामुळे कोणा उदाराची कृपा लाभणे हे भाग्य-खात्यातच पडते. आपले औदार्य हे इतरांच्या भाग्य-खात्यात पडते. ही तीनही प्रकारची कारणे एकत्र लक्षात घेता यावीत, यासाठी पुढील समीकरणे मांडता येतील.
सुस्थितीची कारणे = आत्मोद्धारक सद्गुण + अन्यायकत्रेपणा + सुभाग्य
दु:स्थितीची कारणे = आत्मघातकी दुर्गुण + अन्यायग्रस्तता + दुर्भाग्य
यातील प्रत्येक बाब ही संख्येत व अचूकपणे मोजता येईल असे नाही. पण वाटय़ाला येणाऱ्या स्थितींबाबत तीन प्रकारचे घटक कारणीभूत ठरतात, एवढे जरी ध्यानात ठेवले तरी पुरे.
‘अन्यायकारक’ हे विशेषण, कृतीलाच लावता येते, स्थितीला नाही. मी भुकेला आहे ही (दु:)स्थिती झाली. ही का आली? समजा माझे हक्काचे अन्न कोणी हिसकावून घेतले असेल तर हिसकावणे ही कृती अन्यायकारक असेल. तसे असतानाचा भुकेलेपणा ही स्थिती अन्याय ‘जन्य’ ठरेल. असे मानू की हिसकावणाऱ्याला खाऊन तृप्ती लाभली तर त्याची ती ‘सु-अवस्था’ अन्यायकारकतेतून आलेली असेल. एखादा ट्रेकर वाट चुकला आणि अन्न संपले तर त्याचा भुकेलेपणा हा दुर्भाग्य-जन्य असेल. दोन वर्षांत दाम-तिप्पट करून देतो असे सांगणाऱ्या कंपनीत जे पसे गुंतवतील ते आत्मघातकीच ठरतील. कारण मूर्खपणा हा दुष्टपणापेक्षा सौम्य असला, तरी दुर्गुणच राहतो, सद्गुण ठरत नसतो.
एकांगीपणामुळे होणाऱ्या गफलती
आपण वर पाहिलेल्या समीकरणांमधल्या कोणत्याही एका किंवा दोन घटकांचे अस्तित्वच नाकारणे म्हणजे एकांगीपणा होय. या एकांगीपणाचे स्वाभाविकच तीन प्रकार पडतात.
पहिला एकांगीपणा म्हणजे ‘भाग्यमेव जयते’! पूर्ण नियतीवाद मानला किंवा पूर्ण अनागोंदी(केऑस) मानली तरी सगळ्याचे उत्तर फक्त आणि फक्त भाग्यच! याचाच पारलौकिक ‘न्याय’ मानणे हा एक उपप्रकार आहे. पूर्वजन्मीच्या दुष्कृत्यांचे फळ, पूर्वजन्मीच्या सत्कृत्यांचे फळ असले काही मानले, की जणू जगात नेहमी जे असते ते ‘न्याय्य’च असते, असे ठरेल. मग माणसाने न्यायी असण्याची गरजच नाही.
दुसरा एकांगीपणा म्हणजे ‘श्रेयमेव जयते’. कडवी (आर्थिक)उजवी विचारसरणी यात मोडते. या विचारसरणीनुसार उदा. गरीब हे आळशी/मूर्ख/कर्म-दरिद्री असल्यानेच गरीब राहतात! श्रीमंत हे उद्यमशील/नव्याचा शोध घेणारे/जबाबदारीने वागणारे असे सद्गुणसंपन्नच असतात! (आपल्याकडे हिंदुत्ववाद्यांना उजवे म्हणण्याची प्रथा पडली आहे. पण वरील अर्थाने उजवे असे ते नाहीत. आपल्याकडील सर्वच पक्ष हे राज्यावर नसताना डावे बनतात आणि राज्यावर असताना मध्यममार्गी बनतात. असो.)
तिसरा एकांगीपणा म्हणजे ‘अन्यायमेव जयते’ कडवी डावी विचारसरणी! या विचारसरणीनुसार जी जी म्हणून सुस्थिती येते ती इतरांना लुबाडूनच आणि जी जी म्हणून दु:स्थिती येते ती इतरांकडून लुबाडले जाण्यामुळेच! दु:स्थितीला शोषण किंवा लुबाडणूक वगळता अन्य काही कारण असू शकते(लोकसंख्या, अनुत्पादकता इ.) हे मान्य करणे म्हणजे त्यांना क्रांतीशी द्रोह वाटतो. अन्याय हे जर विश्वाचे स्वरूपच असेल तर ते क्रांतीनंतर तरी का बदलेल? पण यांच्या मते त्यांचे राज्य आले की विश्व ‘न्यायमेव जयते’ अशी पलटी मारणार असते.
आता ही तीनही म्हणणी खोटी आहेत हे उघड दिसत नाही काय? पण या एकांगी वृत्ती तशाच चालू का राहतात? कारण आपण भाग्याकडे ‘निखळ भाग्य’ असे बघू शकत नाही म्हणून. भाग्य लाभण्यासाठी काही तरी श्रेय असावे लागते असे चुकीचे गृहीत धरून आपण ‘भाग्यामागचे श्रेय’ (हा वदतोव्याघात आहे.) शोधू लागतो म्हणून.
अगदी सज्जन माणसे, त्यांच्या ठायी असणाऱ्या करुणाबुद्धीची, न्यायबुद्धीशी गल्लत करून, कोणत्याही दु:स्थितीला अन्यायग्रस्तताच मानून बसतात. ते नकळतपणे सुभाग्यवानांना अन्यायकत्रे समजू लागतात. तसेच काही अपयशी माणसे त्यांच्या मत्सरावर ‘न्याय-बुद्धी’चे आवरण चढवून पुन्हा सुभाग्यवानांना अन्यायकत्रे ठरवून मोकळी होतात. मग असे वाद व्यर्थपणे झडत राहतात, ‘‘अरे त्याला बुद्धी कमी आहे. पण हा ‘त्याचा दोष’ आहे काय?’’ , ‘‘वा! छान! म्हणजे मी बुद्धिवान आहे हा ‘माझा दोष’ आहे की काय?’’ आणि शीर्षकातला प्रश्न सुभाग्यवानांना सतावतच राहतो. ‘भाग्यवान असणे, गुन्हा आहे?’

* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com