‘हा फक्त शेलक्या विश्वासू श्रीमंतांना आर्थिक सल्ला देणारा माणूस, तो आपल्याला सल्ला देतो आहे’ अशा भावनेतून लोक बर्नार्ड ऊर्फ बर्नी मॅडॉफचे सल्ले ऐकत. सत्तरच्या दशकापासून या ना त्या प्रकारे आर्थिक लटपटी करणाऱ्या मॅडॉफने, पुढे आपले जाळे काही श्रीमंत हस्तकांमार्फत इतके पसरविले की, ऑस्ट्रियासारख्या देशातील बँकिंगची नियतही त्यामुळे बदलली.. हे सारे उपद्व्याप  पुढे बाहेर आले खरे, पण त्याआधी सर्वचजण मॅडॉफला ‘मानत’ होते!
बर्नी मॅडॉफने चालविलेले पॉन्झी जाळे खास प्रकारचे होते. मॅडॉफचा मूळ सुप्रतिष्ठित व्यवसाय समभाग दलालीचा होता. त्याचा दबदबा आणि ख्याती होती. त्यामुळे त्याच्या सगळय़ा ‘करणी’बद्दल कुणी सहजी शंका घेत नव्हते. शंका आली तरी दाबून टाकली जात असे. त्याने ज्यांना हातोहात वर्षांनुवर्षे फसविले तेदेखील निराळय़ा प्रतिष्ठित अतिश्रीमंत उच्चभ्रू थरातले होते. एक सुप्रतिष्ठित, ख्यातकीर्त ‘ज्यू’ दलाल म्हणून मॅडॉफचा या उच्चवर्गीयामध्ये सर्रास वावर होता. कुणाला सांगू नका, वाच्यता करू नका या अटीवरच तो धनाढय़ लोकांकडून गुंतवणुकीसाठी भांडवल गोळा करत असे. पण फक्त कुटुंब कबिला आणि मित्र व त्यांची बिरादरी यावर सतत चढत्या क्रमाने पैशाचा ओघ कसा चालू राहणार? सतत वाढती देणेकरी रक्कम भागवायची तर नवे देणेकरी शोधले पाहिजेत, त्यंना भुरळ घातलीच पाहिजे. त्यासाठी मॅडॉफने सतत नवनवे मार्ग पैदासले. फ्रँक अव्हेलिनो आणि मिशेल बिएन्स या दोन कीर्दखतावणीकारांना त्याने हाताशी धरले. ही कीर्दखतावणी करणारी कंपनी कायद्याने हिशोब ठेवणे, तपासणे एवढय़ापुरती होती. त्यांनी इतर काही व्यवसाय करणे अवैध होते. पण त्यांनी आपल्या हिशेबनीस धंद्यापलीकडे जाऊन आपल्या गिऱ्हाइकांना गुंतवणुकीची भुरळ घालण्याचा खटाटोप आरंभला. गुंतवणुकीचा हा झरा मॅडॉफकडे वळवला जायचा. त्याबद्दल त्यांना मॅडॉफकडून हिस्सा व बक्षिसी मिळत राहायची. झरा दिवसेंदिवस फुगत तर राहिलाच पाहिजे. त्यासाठी आणखी हस्तक पाहिजेत. मॅडॉफचा एक मॉरिस सोनी कोहन नावाचा दोस्त होता. त्याने कीहमद ऊर्फ ‘कोहमॅड’ सिक्युरिटीज नावाची कंपनी काढली. या कंपनीचे बस्तान मॅडॉफच्या कचेरीमध्येच होते. गलेलठ्ठ गुंतवणूक करू इच्छिणारे सावज मॅडॉफच्या गोटय़ात आणून सोडणे व त्याबद्दल टक्केवारीने पैसे मिळविणे हाच कोहनचा व्यवसाय. कार्ल शापिरो नावाचा एक बलदंड कापडचोपड कारखानदार होता. एलेन शापिरो ही त्याची मुलगी. तिच्याकडे वारसाहक्काने कार्ल शापिरोची जायदाद आली. तिचा नवरा रॉबर्ट याफ्फे उर्फ जाफे. हा आधी बॉस्टनमध्ये समभाग दलाल होता. त्याने मॅडॉफचा लौकिक आपल्या लक्ष्मी वल्लभ गोल्फ सवंगडय़ामध्ये फैलावला. त्यांची गुंतवणूक रक्कम कोहमॅडतर्फे मॅडॉफकडे वाहू लागली. फेअरफिल्ड ग्रीनिच ग्रुपचे वॉल्टर नोएल आणि मोनिका नोएल यांनी तर मॅडॉफचे हे ‘श्री’सूक्त देशोदेशी पसरविले.
सत्तरच्या दशकापासून अमेरिकेमध्ये तटबंदी निधीची लोकप्रियता बळावू लागली होती. बँका, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड याच्या जोडीने नव्या प्रकारच्या गुंतवणुकीचा पायंडा रुंदावू लागला होता. कालांतराने असा तटबंदी निधी (ऊर्फ हेज फंड) चालविण्यावर नोंदणी करणे, व्यवसाय म्हणून रीतसर जाहीर विधिवत हिशोब देणे टप्प्याटप्प्याने बंधनकारक होत गेले. बर्नी मॅडॉफ असा ‘हेज फंड’ चालवीत होता का? तर नाही! फार काय आपण गुंतवणूक सल्लागार आहोत एवढेदेखील मॅडॉफ चारचौघांत कबूल करत नसे. असे करण्यामागेदेखील सबळ कारण होते. त्यामुळे मॅडॉफबद्दल गुंतवणूकदारांमध्ये एकप्रकारचे आकर्षण निर्माण होत असे. ‘हा फक्त शेलक्या विश्वासू श्रीमंतांना लाखमोलाचा सल्ला देतो. त्याच्याकडे बाजारावर सातत्याने मात करण्याचे आगळे कसब आहे!’ ते फक्त मोजक्यांनाच मिळते आणि आपण त्यातले एक दैवदुर्लभ भाग्यवान आहोत असा एक अनाठायी ग्रह तयार होत असे. दुसरे मोठे कारण फक्त मॅडॉफलाच पक्के ठाऊक होते. असे तटबंदी निधी चालविणाऱ्यांना या ना त्या प्रकारे आपले व्यवहार उघड ठेवावे लागतात. त्याचा माग घेता येतो. मॅडॉफला तेच तर नको होते.
परिणामी, मॅडॉफभोवती अशा लोभग्रस्त श्रीमंताच्या हस्तकांचे वर्तुळ सतत फैलावतच राहिले. सॅण्ड्रा मान्झ्क नामक एका धडाडीच्या बाईने तर मॅडॉफकरिता ट्रेमॉन्ट, किंगेट, मॅक्सॅम अशा तीन कंपन्यांचे प्रवाह पैदा केले. फेअरफिल्ड ग्रीनिचच्या नोएलचा जावईदेखील पुढे अधिक धडाडीने सामील झाला. त्याने एकटय़ाने मॅडॉफकडे गुंतवणुकीदाखल वळविलेली रक्कम होती जवळपास सात अब्ज डॉलर!
आणखी काही नमुने. सोनया कोहन ही एक मोठी चलाख उलाढाली बाई मॅडॉफची भलतीच चाहती होती. तिच्या ‘युरो व्हॅल्युअर’ आणि ‘मेडिकी फिनान्स’ अशा दोन कंपन्या होत्या. त्या उलाढालीमार्फत तिने ‘बँक मेडिकी’ या ऑस्ट्रियन बँकेवर आणि बँक ऑफ ऑस्ट्रिया क्रेडिट आनष्टाल्ट या दोन्ही संस्थांवर पकड मिळविली. ‘क्रेडिट आनष्टाल्ट’वरील प्रभावामुळे तर तिला ऑस्ट्रियात जणू सार्वभौम प्रतिष्ठाच लाभली. याच कालावधीत ऑस्ट्रिया प्रति-स्विर्झलड बनू लागला होता. स्विस बँकांप्रमाणेच चोरखण खाती पत्करायचे लोण ऑस्ट्रियात उधाणले. असे चोरखण ठेवू इच्छिणाऱ्या जगभरच्या लक्ष्मीधरांना ‘अनुरूप’ सल्ला देणारी आणि त्यांच्या गुंतवणुकीची विल्हेवारी लावून देणारी संस्था असा ‘बँक मेडिकी’चा लौकिक बनला. परिणामी मॅडॉफकडे मध्यपूर्व, ब्राझील, चीन, आर्यलड, रशिया इथले निधीप्रवाह येऊ लागले. अशा अनेक वानगी देता येतील. असे हातपाय पसरल्याखेरीज मॅडॉफचे सोंग कसे चालणार होते? बँक मेडिकीने तर ‘बीएनपी’ या फ्रेंच बँकेबरोबर मेडिकीच्या गुंतवणुकीची सर्टिफिकेट्स काढली होती.
वित्तबाजारात चोराच्या वाटा चोरांना व सावांनाही माहीत होतात. अशक्य दर्जाचा परतावा देणाऱ्या मॅडॉफबद्दल कुणाला कधीच कुशंका येऊ नये हेदेखील अशक्यच होते. हॅरी मार्कोपोलोस या वित्त-विश्लेषकाने १९९९ मध्ये पहिल्यांदा फडकावलेली धोक्याची पताका ही एक बाजू आहे. तसेच जळका वास येऊन दूर राहिल्याची किंवा कशाला झंझट म्हणून दुर्लक्ष केल्याची उदाहरणेदेखील बरीच होती.
* लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Satara, Prithviraj Chavan
शरद पवार यांनी आदेश दिल्यास साताऱ्यातून लढायला तयार – पृथ्वीराज चव्हाण