10 July 2020

News Flash

आओ फिरसे दिया जलाए..

अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ला झळाळी आहे, ती वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्टय़ांमुळे.

| December 25, 2014 01:36 am

अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ला झळाळी आहे, ती वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्टय़ांमुळे. शब्द, रंग, स्वर, गंध आदींमाग्रे घ्यावयाच्या जीवनानुभवांना वाजपेयी यांनी कधीही अव्हेरले नाही. यशस्वी होणे आणि जनमनात स्थान मिळवणे या भिन्न गोष्टी आहेत, याचे भान जपले. हा मुद्दा अलीकडच्या काळातील नेत्यांनीही लक्षात घ्यावा इतका महत्त्वाचा..

जम्मू-काश्मिरातील निवडणूक निकालामुळे भाजप नेतृत्वाच्या मर्यादा प्रकर्षांने उघड होणे आणि त्याच वेळी अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ जाहीर होणे यामागील योगायोग अत्यंत सूचक म्हणावा लागेल. वाजपेयी आणि पं. मदन मोहन मालवीय यांचा २५ डिसेंबर हा वाढदिवस. या दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारने त्यांना भारतरत्न जाहीर केले. याबाबत गेले काही दिवस अंदाज व्यक्त केले जात होते. त्यामुळे हा निर्णय तसा अपेक्षितच होता. या दिवसाच्या निमित्ताने सुशासन दिन पाळला जावा असाही फतवा सरकारने काढला आहे. या आदेशाबरोबरीने सुशासन दिन म्हणजे काय याचाही अर्थ सरकारने प्रसृत केला असता तर जनसामान्यांच्या गोंधळात भर पडली नसती. त्या गोंधळात आणखी वाढ केली ती मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी. देशातील शैक्षणिक संस्थांनीही हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळावा असे त्यांचे म्हणणे. म्हणजे या सुशासनाच्या अभावास जो वर्ग सर्वाधिक बळी पडतो त्या विद्यार्थ्यांनाच दिन पाळा असे म्हणणे ही खरे तर क्रूर चेष्टाच. ती अटलबिहारींच्या जन्मदिनाच्या मुहूर्तावर करण्याची दुर्बुद्धी स्मृती इराणी यांना झाली नसती तर ते अधिक बरे झाले असते. कदाचित देशात सुशासनाची किती वानवा आहे, याची आठवण जनतेस आणि त्यातही विद्यार्थीवर्गास करून देण्याच्या उदात्त हेतूनेच या महत्त्वाच्या खात्याचा कारभार श्रीमती इराणी यांच्याकडे सोपवण्याचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असावा. तसे असेल तर मोदी यांच्या धोरणीपणाचे कौतुकच करावयास हवे. अर्थात त्यामुळे वाजपेयी आणि मालवीय यांना जाहीर झालेल्या भारतरत्नची झळाळी काही झाकोळली जाणार नाही.
वैचारिक मतभेद असणे म्हणजे एकमेकांचे तोंडही न बघणे असे समजले जाण्याच्या आधीचा काळ वाजपेयींचा. त्या अर्थाने त्यांचे राजकीय नेत्यांच्या प्रभावळीतील स्थान हे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या शेजारचे असेल. राजकीय नेत्यास राजकारणापलीकडचा विचार कसा करता यायला हवा याचे हे दोन नेते उत्तम प्रतीक. जगणे व्यामिश्र असते आणि राजकारण जगण्याच्या सर्वागाला स्पर्श करणारे असते. तरी म्हणून फक्त सत्ता आणि शासन यांभोवतीचे राजकारण म्हणजे जगणे नव्हे. हे राजकारण आयुष्यापेक्षा मोठे होत नाही. त्यामुळे मानवी नातेसंबंधांचा मुद्दा आला की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवाद साधण्याची कला अंगी असणे गरजेचे असते. ते वाजपेयी यांचे वैशिष्टय़. ते अंगभूतच आणि पुरेपूर अंगी बाणलेले असल्यामुळे वाजपेयी हे अनेकांसाठी राजकीय विरोधक असले तरी त्यांची गणना शत्रू या वर्गात कोणाहीकडून झाली नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. याचे कारण राजकारण करावयाचे ते माणसासाठी, हे त्यांना ठाऊक होते. हा माणूसच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो. किंवा असावयास हवा. तेव्हा त्या माणसाशीच संवाद साधण्याची कला अंगी नसेल तर केलेले राजकारण हे फक्त सत्ताकारण बनते. वाजपेयी यांचे ते कधीही झाले नाही. जगण्याला अनेक पदर असतात आणि त्या सगळ्यांविषयी वाजपेयी सारखेच ममत्व बाळगून होते. मग काव्यशास्त्रविनोद असो की समाजकारण. वाजपेयी तितक्याच ममत्वाने या सगळ्याकडे पाहत. त्यांचे आणखी एक वैशिष्टय़ सद्य:स्थितीत दखल घ्यावी असे. ते म्हणजे सहिष्णुता. आपली जशी एक विचारधारा आहे तशीच समोरच्याचीही ती असू शकते आणि ती आपल्या विचारधारेशी मिळतीजुळती असेलच असे नाही, हे वाजपेयी यांना पुरेपूर मान्य असे. त्यामुळे त्यांच्या कडव्या राजकीय विरोधकाशीदेखील वाजपेयी सहज संवाद साधू शकत. शब्द, रंग, स्वर, गंध आदींमाग्रे घ्यावयाच्या जीवनानुभवांना वाजपेयी यांनी कधीही अव्हेरले नाही आणि आपण म्हणजे कोणी सद्गुणांचा पुतळा आहोत असा कधी आवही आणला नाही. माणूस, मग तो कोणत्याही धर्माचा, पंथाचा आणि पदावरील असो, हा स्खलनशील असू शकतो या आद्य उदारमतवादी विचारावर वाजपेयींची पूर्ण श्रद्धा होती आणि त्यांचे मोठेपण हे की आपल्या समोरच्यासदेखील हा श्रद्धानियम लागू होतो हे ते सहज मान्य करत. त्यामुळे वाजपेयींशी संवादच होऊ शकत नाही, असे कधीही कोणाचेही झाले नाही. अणुऊर्जेच्या मुद्दय़ावर भारत आणि अमेरिका यांच्यात त्या वेळी तणाव असताना वाजपेयींनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या आधी ज्येष्ठ विरोधी नेते माकपचे हरकिशनसिंग सुरजित यांना बोलावून घेतले आणि आपकी आवाज व्हाइट हाऊसतक गूंजनी चाहिए, अशा शब्दांत त्यांना मसलत दिली. सुरजित काय ते समजले आणि त्यानंतर डाव्यांच्या अमेरिकाविरोधी आंदोलनास चांगलीच धार आली. वस्तुत: वाजपेयी आणि सुरजित या व्यक्ती राजकीय विचारधारेच्या अगदी परस्परविरोधी भूमिकांचे प्रतिनिधित्व करतात. परंतु त्यांचे राजकीय मतभेद व्यापक हिताच्या आड आले नाहीत. हा जसा सुरजित यांचा मोठेपणा तसाच वाजपेयी यांचादेखील लाघवीपणा म्हणावयास हवा. त्या लाघवीपणामुळे वाजपेयी सर्वानाच आपलेसे वाटत आणि त्यांच्या स्वभावाचा एकही कंगोरा त्यांच्याशी संवाद साधताना अडथळा ठरत नसे. त्यांच्या तुलनेत मदन मोहन मालवीय यांचे कार्य तसे अपरिचितच. आशिया खंडातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बनारस िहदु विश्वविद्यालयाचे ते संस्थापक. अ‍ॅनी बेझंट यांच्या सहयोगाने हे विद्यापीठ त्यांनी स्थापन केले. ते िहदू महासभेच्या संस्थापक सदस्यांतील एक. मालवीय अभ्यासू होते. आपली उत्तम चालणारी वकिली त्यांनी स्वातंत्र्यलढय़ासाठी सोडली. त्या वेळच्या नेत्यांमध्ये एक प्रकारची नेकी होती. मालवीय हे त्याचे उदाहरण. आज अनेकांना माहीतही नसेल, परंतु सत्यमेव जयते हे स्वातंत्र्योत्तर भारताचे ब्रीदवाक्य ही मालवीय यांची देणगी. इतक्या वर्षांनंतर भारतरत्नच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाची अनेकांना नव्याने ओळख होईल. वाजपेयी त्या मानाने अगदी अलीकडचे.
वृद्धापकाळामुळे वाजपेयी आता किती सजग आहेत किंवा काय याचा अंदाज नाही. परंतु तसे ते असल्यास भारतरत्नमुळे आनंदी होत असताना आपली उदारमतवादी विचारधारा क्षीण होते की काय याची चिंता त्यांच्या मनात निश्चितच दाटून येत असेल. नेहरू असोत वा वाजपेयी. या दोघांच्याही उदारमतवादी, सहिष्णू राजकारणास त्यांच्या अनुयायांकडूनच आव्हान मिळाले. भाजप आज निर्विवादपणे सर्वात प्रभावी पक्ष आहे. त्याच्या राजकीय यशातून ते लक्षात येईलच. पण म्हणून तो तितकाच लोकप्रिय आहे, याची हमी खुद्द भाजप नेत्यांनादेखील देता येणार नाही. यशस्वी होणे आणि जनमनात स्थान मिळवणे या भिन्न गोष्टी आहेत. वाजपेयींना याचे भान होते. त्यामुळे राजकीय यशापयशाच्या पलीकडे ते जाऊ शकले. तेव्हा वाजपेयी यांच्या सहिष्णु परंपरेचा आदर करावयाचा तर भारतरत्न पुरस्कार मालवीय यांच्या बरोबरीने आर्थिक उदारीकरणाला वाट देणारे पी. व्ही. नरसिंह राव यांनाही जाहीर करणे आवश्यक होते. तसे झाले असते तर पुरस्कार घेणाऱ्यांची आणि देणाऱ्यांचीही उंची वाढली असती.
या मनाच्या मोकळेपणामुळे वाजपेयी म्हणजे केवळ निवडणुका जिंकून देणारे यंत्र अशी त्यांची प्रतिमा कधीही झाली नाही. हा मुद्दा भाजपच्या अलीकडच्या नेत्यांनी ध्यानात घ्यावा इतका महत्त्वाचा. तो अशासाठी की निवडणुका जिंकून काय करायचे याबाबत त्यांच्या मनात कधीही संदेह नव्हता. जे काही व्यापक हित साधावयाचे आहे, त्या साध्यसाधनेच्या मार्गातील एक मुक्काम म्हणजे राजकीय यश. परंतु म्हणून ते ईप्सित स्थळ नव्हे. भारतरत्न दिले जात असताना त्यांच्याच शब्दांत याची जाणीव करून घेणे सयुक्तिक ठरेल..
हम पडाव को समझे मंझिल
लक्ष्य हुआ आँखोंसे ओझल
वर्तमान के मोहजाल मे
आने वाला कल ना भुलाए
आओ फिरसे दिया जलाए।

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2014 1:36 am

Web Title: bharat ratna to the statesman politician former pm vajpayee
Next Stories
1 विजयाचे शल्य
2 इनको मन की शक्ती देना..
3 ५६ इंची बुडबुडा
Just Now!
X