अभिजित घोरपडे – abhijit.ghorpade@expressindia.com
गडकिल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री किंवा जुन्या शहरांत पाण्यासाठी केलेल्या प्राचीन व्यवस्था आजही पाहता येतात.. पण वाढती वस्ती किंवा बेजबाबदार वावर यांमुळे अशा वारशाचे संरक्षण होत नाही.. त्यामागे असलेल्या व्यवस्थेतून कितीतरी शिकण्यासारखे असूनसुद्धा!
त्र्यंबकेश्वरचा प्रयागतीर्थ तलाव, कोल्हापूरची पाण्याची चावी, चांदवड गावातील नरुटी बारव, शिवनेरीवरील गंगा-जमुना व कमानी टाकी, नगरजवळ बीड रस्त्यावरील हत्ती बारव किंवा धुळे जिल्ह्य़ातील पांझरा नदीवरील फड पद्धत.. या सर्वामधील समान धागा म्हणजे जुनेपणा आणि नेटकेपणाचा!

या आहेत प्राचीन काळातील पाण्याच्या व्यवस्था..  पाहिल्यावर कुतूहल आणि अचंबा वाटावा अशाच या गोष्टी. अतिशय विचारपूर्वक निवडलेले स्थान, पाणलोट-भूजल-भूरचना यांचा उत्तमप्रकारे करून घेतलेला वापर, टिकाऊपणा, संसाधन पुरवून वापरण्याचा विवेक.. अशाप्रकारे कोणते ना कोणते वैशिष्टय़ या व्यवस्थांमध्ये आवर्जून पाहायला मिळते. मात्र त्यांची आताची अवस्था पाहिली की तितकीच हळहळही वाटते. कारण या सर्वच व्यवस्था आता कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अडगळीला पडल्या आहेत, वापराविना पडून राहिल्यामुळे किंवा अविवेकी वापर होत असल्यामुळे संपूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अर्थात ही आहेत काही प्रातिनिधिक उदाहरणे. त्यांच्या प्रमाणेच राज्याच्या सर्वच भागात अशा असंख्य व्यवस्था पडून आहेत, नष्ट होत आहेत. त्यांच्यात जुन्या विहिरी-बारवा आहेत, तळी-तलाव-कुंड आहेत, टाकी आहेत, खापरी पाईप असलेल्या पाणी पुरविण्याच्या व्यवस्था आहेत, बांध-कालवे आहेत. त्यापैकी या काही व्यवस्था अगदी अलीकडेच पाहण्यात आल्या, म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे. प्रयागतीर्थ हे त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिगाजवळ असलेला प्रसिद्ध तलाव अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला. काळ साधारणत: अडीचशे वर्षांपूर्वीचा. त्याचे स्थान असे आहे की त्याला मोठे पाणलोट क्षेत्र लाभले आहे. आसपासच्या डोंगर-टेकडय़ांवरून वाहणारे पाणी ज्या मार्गाने पुढे जाते, त्यावरच हा सुंदरसा तलाव आहे. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आणि त्यात हा तलाव. त्याची अष्टकोनी रचना, त्याच्या तोंडावर असलेली लहानशी पण टुमदार मंदिरे, वेगवेगळ्या पातळ्यांवरून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था, चार बुरुजासारख्या वास्तू यामुळे त्याची शोभा वाढते आणि पाहताक्षणी हा तलाव नजरेत भरतो. हा तलाव पूर्वी वेगवेगळ्या कामांसाठी वापरला जाई. पिण्यासाठी, इतर वापरासाठी, शेतीसाठी आणि अगदी जनावरांना पिण्यासाठीसुद्धा. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनानंतर या तलावाला प्रदक्षिणा घातली जाते.. आता मात्र हा तलाव पाणवनस्पतींची गर्दी झाली आहे. तलावात म्हशीही डुंबताना दिसतात.
हीच अवस्था नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या नरुटी बारवेची. चौकोनी आकाराची ही अतिशय सुंदर बारव. चांदवड शहरच मुळी बारवांसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या रंगमहालातील म्हणजेच राजवाडय़ातील तीन-चार मजली बारव तर सर्वात प्रसिद्ध! याशिवाय आणखी पंचवीसेक बारवा तिथे आहेत. पण मोजक्या बारवा वगळता इतरांची अवस्था फारच शोचनीय आहे. उपसा नसल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे आणि त्याला दरुगधीही येते. विशेष म्हणजे या विहिरी वापरात नसल्या तरी काठावर म्हणता येतील इतक्या शेजारी हापसे दिसतात. नगरमधील हत्ती बारव तर घाणीचे आगरच बनले आहे. विहिरीत टाकलेला कचरा नदीप्रमाणे पुढे वाहून जात नसला, तरी ती निर्माल्याने खचाखच भरली आहे. संवर्धनाच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्याची अवस्था बरी असली तरी त्याच्यावरील गंगा-जमुना टाकी असोत, कमानी टाके, नाहीतर एकूण असलेली ५२ टाकी.. या सर्वामध्ये हिरवट रंगाचे पाणी दिसते. काहींमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याच्या बाटल्यांचा खच आढळतो. कोल्हापूरच्या ‘पाण्याची चावी’ द्वारे प्रसिद्ध रंकाळा तलावातून पाणी भुयारी मार्गाने दूर अंतरावर काढून दिले आहे. त्यामुळे धुणे, अंघोळी व जनावरांसाठीचे पाणी दूरवर उपलब्ध होते. त्याचा वापर करून ते पुढे शेतीसाठी वापरले जाते. त्यातमुळे रंकाळ्याचे प्रदूषण होऊ नये, पाणी वापरल्यानंतर त्याचा पुढे शेतीसाठी पुनर्वापर व्हावा, हा विचार. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची ही व्यवस्था आजही काही प्रमाणात सुरू आहे. पण फारसे लक्ष नसल्याने भविष्यात ती मोडकळीला आली तरी ते नवल नसेल. हीच धुळ्याच्या पांजरा नदीवरील फड पद्धतीचीही अवस्था आहे.
या व्यवस्था अशा का अडगळीत पडल्या आहेत, याचे सयुक्तिक कारण कुठेही सापडत नाही. घरात नळ आले म्हणून आड किंवा विहिरी यांच्याकडे दुर्लक्ष झाले. पण घरात नळ असतानाही या व्यवस्थांचा इतर वापर शक्य होता आणि आहे. पण तो झाला नाही. त्यामुळे घराजवळ हक्काचा स्रोत असतानाही आपण मात्र दूरवरच्या जलस्रोतावर अवलंबून राहू लागलो. हे तळी-तलावांबाबत झाले. जुने बंधारे, पाणीपुरवठय़ाची व्यवस्था आणि घराजवळ असलेल्या हौदांबाबतही हेच घडले. जुन्या व्यवस्थांची क्षमता ही प्रचंड प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येला पाणी पुरविण्यास कदाचित पुरेशी पडणार नाही, पण म्हणूनच त्या अधिक उपयुक्त ठरतात. कारण आताच्या पाणीपुरवठय़ाच्या व्यवस्थेवरील बोजा त्या कमी करतात. शिवाय अडचणीच्या काळात हक्काचा स्रोत म्हणून कामीसुद्धा येतात. तरीसुद्धा प्रत्यक्षात त्यांच्याकडेच अडचण म्हणून पाहिले जाते. यापैकी बहुतांश व्यवस्था मुख्यत: भूजलाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे खराब होणे हे एकूणच भूजलाच्या प्रदूषणाला आमंत्रण देणारे ठरते. अनेक ठिकाणी तर हा स्रोत कायमचा बिघडला आहे किंवा बिघडण्याच्या वाटेवर आहे. खरंतर हा आपल्याला मिळालेला मौल्यवान वारसा आहे, बरेच काही शिकविणारा आणि प्रत्यक्ष उपयोगी पडणारासुद्धा! भक्कम व्यवस्था म्हणून आणि पाण्याच्या शाश्वत वापराचा विचार म्हणूनही त्यांचा टिकाऊपणा वादातीत आहे, कारण यापैकी कोणत्याच व्यवस्थेत अविवेकी वापर झालेला नाही. पाणी उपलब्ध आहे म्हणून ते कितीही उपसायचे आणि कशाही प्रकारे वापरायचे, हे त्यात कुठेही दिसत नाही. त्यामुळे तर त्या आजच्या काळात अधिक महत्त्वाच्या ठरतात.
पण या वारशाकडे टाकाऊ म्हणून न पाहता टिकाऊ म्हणूनच पाहिले आहे. वारशाशी कसेही वागा.. तो टिकतोच, अशी यामागची भावना! त्यांच्याशी तसाच व्यवहारही केला आहे. पण या वारशामागे असलेल्या व्यवस्था टाकाऊ आहेत की टिकाऊ, हे समजण्यासाठी आता त्यांच्याकडे पुन्हा नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.