देशाचे राजकारण कुठल्या दिशेने जात आहे, हे समजण्यासाठी बिहारमधील जनमानस महत्त्वाचे असते. त्यामुळेच बिहारमध्ये होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच जनता परिवाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने यश मिळवले असले तरी आता नितीशकुमार व लालूप्रसाद एकत्र आहेत. त्यांच्या मतांची एकत्रित टक्केवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीपेक्षा जास्त आहे. या दोघांनी भाजपविरोधात कितीही पुरोगामी विचारांच्या गप्पा मारल्या तरी बिहारच्या राजकारणात जात ही काही केल्या जात नाही, हे दोघांनाही माहीत आहे. त्यामुळे उच्चवर्णीय मतदार किती, यादव, मुस्लीम, कुर्मी इतर मागासवर्गीय अशी टक्केवारी पुढे ठेवून उमेदवारी बहाल केली जाते. बिहारच्या ठाकुरांकडे लक्ष देणाऱ्या भाजपने अलीकडेच पक्षात नव्याने इतर मागासवर्गीय विभाग स्थापन करावा लागला, तो जातींच्या प्रभावामुळेच. समाजवादी व धर्मनिरपेक्ष राजकारणाची जपमाळ ओढणाऱ्या लालूंनी जातवार झालेल्या जनगणनेचे आकडे जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे, ते ही निवडणुकीच्या तोंडावरच. दबावतंत्र, पक्षांतरे हाही निवडणुकीच्या पडघमांचा अविभाज्य भाग. आताही भाजपचे ज्येष्ठ नेते व पाटणासाहिब मतदारसंघाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे. खरे तर एखाद्या खासदाराने मुख्यमंत्र्यांना भेटण्यात गैर काहीच नाही. पण आता विरोधकांना शत्रू मानण्याची संस्कृती वाढल्याने अशा भेटींची चर्चा अधिक होते. त्यातच बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. आपण भाजपशी एकनिष्ठच, मात्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे सांगता येत नाही, या त्यांच्या वक्तव्याने संशयकल्लोळ वाढला आहे. अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांचा भाजपला किती फायदा झाला, हा प्रश्न वेगळा पण पाटण्यासारख्या प्रतिष्ठित मतदारसंघात अनेक प्रबळ स्पर्धकांवर मात करीत त्यांनी उमेदवारी मिळवली. विशेषत: केंद्रात दूरसंचारमंत्री असलेले रविशंकर प्रसाद या तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून इच्छुक होते. तरीही शत्रुघ्न सिन्हा उमेदवारी आणण्यात यशस्वी झाले. त्यामुळे साहजिक आपण ज्येष्ठ आहोत, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. राजकीय गरज म्हणून बाहेरून आलेल्या रामकृपाल यादव यांच्यासारख्या, लालूंचे एके काळचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला भाजपला मंत्री करावे लागले. मग अन्याय झाल्याची भावना या बिहारीबाबूमध्ये निर्माण झाली. त्यामुळे मग निवडणुकीच्या तोंडावर भेटीगाठी सुरू करून महत्त्व वाढवून घेण्याचे हे उद्योग आहेत. भाजपलाही जनता परिवारातील एकीमुळे जो येईल त्याला पावन करून घेण्याची गरज आहे. परवापर्यंत ज्या खासदार पप्पू यादव यांच्याविरोधात कंठशोष केला ते लालूंपासून दुरावताच आघाडीत सामील करून घेण्याची घाई भाजपने केली. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना भाजपमध्ये घेऊन अतिमागास जातींची मते मिळवण्याची गणिते कागदावर तरी मांडली गेली. आजवर महिला व अतिमागास वर्ग नितीशकुमार यांच्या पाठीशी राहिला आहे. नितीशकुमार यांच्या डीएनएमध्ये दोष अशी जहरी टीका पंतप्रधानांनी शनिवारी मुजफ्फरपूर येथील सभेत केल्याने व्यक्तिगत पातळीवरल्या टोकाच्या टीकेचाही नारळ फुटला आणि उत्तरादाखल लालूप्रसादांनी पंतप्रधानांना कालिया नागाची उपमा दिली. बिहारसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ‘पॅकेज’पेक्षा, राज्याच्या दशा आणि दिशेची चर्चा होण्यापेक्षा रुसवे-फुगवे व आरोप हेच सध्याचे चित्र, मुद्दय़ांचा अभाव दर्शविण्यास प
ुरेसे आहेत.