बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू झालेल्या रस्सीखेचीचे वैशिष्टय़ दिसू लागले आहे, ते दिल्लीकर केंद्रीय नेते यासाठी आखत असलेल्या डावपेचांमधून. लाट नाही, असे गृहीत धरून ही आखणी केली जात आहे आणि त्यामुळेच नव्या वाटा शोधल्या जात आहेत.. लालू-नितीश हे एकमेकांची वाट अडवणारे नेते आता एकत्र आल्यामुळे मार्ग सुकर न होता उलट गुंताच वाढला आहे, तर भाजपने यादवप्रभाव आणि महादलित अशा दोन मार्गावर लक्ष केंद्रित केले आहे..

राजकारणात लाटा येतात नि जातात. या लाटांसोबत काही अर्धकच्चा मालही वाहून येतो. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील होतो. कालांतराने तो कुठल्याशा किनाऱ्यावर अडकून पडतो. आणीबाणी, मंडल-कमंडल व मंदिर अगदी अलीकडची लोकसभा निवडणूकदेखील लाटांवर स्वार होऊन आली. पण बिहार विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी अशा कोणत्याच लाटेवर स्वार होता येणार नाही. वर्षभरात बदललेली समीकरणे, सामाजिक व सांस्कृतिकऐवजी राजकीय टोक आलेल्या जातीय अस्मिता यांमुळे ही निवडणूक ना भाजपला सोपी आहे ना लोकसभा निवडणुकीत आपटी खाल्लेल्या गणंगांच्या जनता परिवाराला! काँग्रेस या निवडणुकीत रस्त्यावर वर्तुळाकार उभे राहून खेळ पाहणाऱ्या गर्दीसारखी आहे. जिचे खेळाशी काहीही देणे-घेणे नसते; पण ती नसल्यास खेळात मजा येत नाही.
भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेच्या अनुभवातून शहाणा झाला. म्हणजे आता फाजील आत्मविश्वासात भाजपचे नेते नाहीत. आम्हीच येणार; आमच्याशिवाय कोण, विरोधी पक्ष किस झाड की पत्ती.. अशा थाटात बाता मारणे आता बंद झाले आहे. अशा कंडय़ा पिकवणाऱ्या नेत्यांची भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी चांगलीच शाळा घेतली आहे. त्यापैकी एक नेते म्हणजे राम माधव. कुणातरी पत्रकाराने योगाचे निमित्त साधून राज्यसभा टीव्हीविषयी केलेले ट्विट वाचून राम माधवांनी थेट उपराष्ट्रपतींवरच शरसंधान केले. त्यावर तमाम हिंदुत्वप्रेमी समाजमाध्यमी जागृत झाले. ते जागृत झाले म्हणून कथित धर्मनिरपेक्ष सक्रिय झाले व पुन्हा एकदा भाजपवर जातीयवादाचे आरोप समाजमाध्यमातून होऊ लागले. गेला आठवडा सुरू होता होता, रविवारीच हा प्रकार दोनेक तास सुरू होता. त्या वेळी नेमके अमित शहा पाटण्यात होते. बरे समाजमाध्यमींवर पंतप्रधान कार्यालयाची बारीक नजर असते. भाजप व नरेंद्र मोदीविरोधी ट्रेण्ड वाढल्यावर पंतप्रधान कार्यालयातून थेट पाटण्यात फोन गेला व राम माधव यांची कानउघाडणी झाली! त्यानंतर ट्विटरवरून माफीनामा वगैरे वगैरे. असो. सांगण्याचे तात्पर्य हे की, भाजपमधील वाचाळवीरांवर बंधने घालण्यात आली आहेत. याचे मुख्य कारण आहे बिहारची निवडणूक. अशा वाचाळवीरांमुळे या निवडणुकीत भाजपला नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे.
बिहार म्हणजे दिल्ली नव्हे याची पुरेपूर जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे दिल्लीसारखा ‘नसीबवाला’ प्रचार ते करणार नाहीत. जातीय समीकरणे उद्ध्वस्त करण्यासाठी पक्षांतर्गत तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विकासप्रतिमेचे भंजन करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बिहार निवडणुकीची छाप आहे. ज्यातून जयप्रकाश नारायण यांच्या सिताब दियारा या गावात स्मारक निर्माण करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांची पंचाईत केली. जयप्रकाश नारायण आणीबाणीविरोधी लढय़ाचे प्रवर्तक होते. ज्या काँग्रेसने आणीबाणी लादली त्याच काँग्रेसशी नितीशकुमार यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी बिहारचा जयप्रकाश नारायण यांच्याशी असलेला संबंध ओळखून भावनिकतेला साद घातली. त्याहीपेक्षा, बिहारचा मोठा भाग व्यापणाऱ्या ‘ईस्ट वेस्ट फ्रंट कॉरिडॉर’ला मान्यता देऊन विकासाचा संदेश दिला. बोधगयामध्ये आयआयएम स्थापण्यात येईल. बिहारच्या निवडणुकीसाठी हे महत्त्वाचे निर्णय मोदींनी घेतले. पण एवढय़ावर बिहारच्या जनतेला भुरळ पाडणे सोपे नाही. त्यासाठी सत्ताविरोधी जनमत एकवटण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे.    
लोकसभा निवडणुकीत स्वतच्या नेतृत्वाचा पर्याय निर्माण करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी किती नालायक आहेत, हे वारंवार मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपोआप त्यांचा पर्याय भक्कम झाला. त्यात थोडा बदल करून भाजपने रणनीती आखली आहे. म्हणजे नितीशकुमार यांच्यावर थेट हल्ला करण्याऐवजी लालूप्रसाद यादव यांच्या ‘यादवी’ची आठवण करून देण्यात येईल. याच लालूप्रसाद यादव यांनी कधी काळी ‘भूरा बाल’ साफ करो, अशी घोषणा दिली होती. ‘भूमिहार-राजपूत- ब्राह्मण व लाला (व्यापारी) म्हणजे भूरा बाल! मराठीत सांगायचे तर पांढरे केस. लालूप्रसाद यादव यांची जातीय अभियांत्रिकी अशी आहे. भूरा बाल साफ करो व ‘माय’ सरकार लाओ – ही लालूंची आत्तापर्यंतची रणनीती होती. माय म्हणजे मुस्लीम व यादव! ही राजकीय समीकरणे आता गुंतागुंतीची झाली आहेत. आता लालूप्रसाद यादव यांची मनस्वी इच्छा आहे ‘भूरा बाल’ बढाओ. तर राज्यातील बाकीच्या समस्त यादववंशीयांना केवळ ‘यादव तितुका मेळवावा’ असे वाटते. लालूंवर राजकारणाने उगवलेला हा सूड आहे. जातीय विषवल्लीवर पोसलेल्या सत्तेची फळे चाखल्यानंतर लालूप्रसाद यादवांना ‘भूरा बाल’ वाढविण्याची उपरती झाली. यादववंशीयांना नितीशकुमारांचे नेतृत्व मान्य नाही. कारण असे सामूहिक नेतृत्व स्वीकारण्याइतपत ‘आणीबाणी’ जनतेत नाही. ही तर ‘जनता परिवारा’साठी आणीबाणीची परिस्थिती आहे. यामुळे बहुसंख्य यादव नितीशकुमार यांना अजूनही स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. राहिले ते ‘माय’ समीकरण तर ते छेदण्यासाठी भाजपने आपला राजस्थानी यादववंशीय चेहरा समोर केला आहे.
राजस्थानमधून राज्यसभा खासदार असलेल्या भूपेंद्र यादव यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी योजनापूर्वक बिहारचे प्रभारी केले. यादव यांनी दिल्लीत व पाटण्यात ‘वॉर रूम’ उभारली आहे. केंद्रीय रसायन मंत्री अनंतकुमार व पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान हे सरकारकडून काम पाहतील.भूपेंद्र यादव यांनी सर्वप्रथम राज्यातील यादववंशीय संस्था-मठाधीशांची यादी तयार करायला घेतली आहे. सत्तेत वाटा नि त्याबदल्यात नितीशकुमारांना टाटा- असा प्रस्ताव बिहारमधील बहुसंख्य समुदायासमोर ठेवण्यात येणार आहे. प्रदेशस्तरावरील नंदकिशोर यादव, रामकृपाल यादव, हुक्मदेव नारायण या भाजपच्या नेत्यांभोवती प्रचार केंद्रित केला जाईल. शिवाय गावगुंडातून नेत्यात मतपरिवर्तन झालेले पप्पू यादव भाजपचा उंबरठा ओलांडण्याची वाट पाहत आहेत. मग भाजपमधील ‘यादवी’ पूर्ण होईल.
जातीय अभियांत्रिकीच्या या हाणामारीत कस लागेल तो नितीशकुमार यांचा. पिछडा व अतिपिछडा म्हणून त्यांनी यादवेतर मते संघटित केली. दलित व महादलित म्हणून काँग्रेसची मतपेटी पळवली. यामुळेच नितीशकुमार सत्तेत आले. लालूप्रसाद यादव यांच्या काळास ‘जंगलराज’ असे संबोधले जाई. तर नितीशकुमार यांच्यासाठी ‘विकासराज’! परस्परविरोधी ध्रुव एकत्र आले आहेत. सलग नऊ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर नितीशकुमार यांना भाजप जातीयवादी वाटू लागला व त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर बिहारच्या मतदारांनी जदयूला लोकसभा निवडणुकीत धडा शिकविला. आताही जदयू व राजद (नितीश व लालू) यांची युती राजकीय आहे; सामाजिक नाही. त्याचा परिणाम आजही जनमानसावर झालेला नाही. अलीकडे जदयूच्या एका आमदारास खंडणी-खुनाच्या आरोपावरून अटक झाली. याला लालूंचा पायगुण म्हणा हवे तर.  ही युती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसारखी आहे. वरवर सहकार्य व प्रत्यक्षात एकमेकांना संपविण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणे. नितीश व लालूप्रसाद यांच्या समर्थकांमध्ये हीच भावना आहे. त्यात नितीशकुमार यांनी मांडलेली दलित व महादलित संकल्पना मोडून काढण्याच्या प्रयत्नात माजी मुख्यमंत्री जतीनराम माँझी आहेत. कालपरवापर्यंत कुणालाही माहीत नसलेले माँझी एका रात्रीत मुख्यमंत्री झाले व तितक्याच वेगाने सत्तेतून बाहेर गेले. माँझी यांना नितीशकुमार यांनी दिलेल्या वाईट वागणुकीचा संबंध महादलितांनी अस्मितेशी जोडला. त्यामुळे नितीशकुमार यांच्या शपथविधीच्या दिवशी माँझींच्या ‘मूसहर’ लोकांनी चूल बंद करून उपवास पाळला. बिहारची जातीय अस्मिता आजही अशी टोकदार आहे.
बिहारची निवडणूक लाटेवर नव्हे तर जातीय अभियांत्रिकीवर जिंकली जाणार आहे. यात ज्याची समीकरणे जुळून येतील तोच यशस्वी होईल. जनता परिवाराला एकत्र आणून नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी लालूप्रसाद यादव यांना मान्य होईपर्यंत काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी पिच्छा पुरवला. कारण भाजपविरोधात सर्वाना संघटित करण्याचे समाधान काँग्रेसला हवे आहे. बिहारच्या जनमताविषयी आत्ताच भाष्य करणे अयोग्य आहे. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस दिल्लीत तर जदयू-राजद-सप बिहारमध्ये कामाला लागले आहेत. परिवारात एकाचे फारसे काही नुकसान होणार नाही. ते आहेत समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव. त्यांना बिहारच्या राजकारणात किती महत्त्व यापेक्षा तिथे त्यांचे यादव असणे पुरेसे आहे. त्यांची उपयुक्तता तेवढीच. लोजपच्या रामविलास पासवान यांचेही हेच स्थान आहे. जनता परिवार असो वा राष्ट्रीय पक्ष. बिहारी नेत्यांचे वर्णन करण्यास हा शेर पुरेसा आहे –
किसी को क्या पडी तुझे नीचा दिखाने की, तेरे आमाल ही काफी हे तुझे बरबाद करने को!
टेकचंद सोनवणे – tekchand.sonawane@expressindia.com