महाविद्यालयीन नाक्यांवरची उडाणटप्पू शेरेबाजी ही ज्याप्रमाणे अभ्यासू प्रतिक्रियांना पर्याय असू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संवादास ट्विटर हा पर्याय नाही. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना हे अमान्य असावे. असे वाटण्यास कारण म्हणजे त्यांचे हल्लीचे वर्तन. आणि त्यातही त्यांनी बुधवारी केलेले ट्वीट. या त्यांच्या ट्विप्पणीमुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या स्वराजबाईंच्या बालिशपणाचेच दर्शन घडले. ते कसे हे समजून घेण्यासाठी संसदेत गेले दोन दिवस जे काही सुरू आहे, त्याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

संसदेचे पावसाळी अधिवेशन मंगळवारी सुरू झाल्यापासून एक मिनिटाचेही कामकाज झालेले नाही. बुधवारीही दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कारण विरोधक घालत असलेला गोंधळ. सध्याच्या गोंधळाचे कारण आहेत पंतप्रधानांचे आडनावबंधू मोदी. हे ललित. त्यांच्या ललितलीला चघळाव्या तेवढय़ा थोडय़ाच. स्वराज आणि वसुंधरा राजे यांना बांधून ठेवणारा समान दुवा म्हणजे या ललितलीला. भारत सरकारने गुन्हेगार जाहीर केल्यानंतर या मोदी यांनी ब्रिटनचा आसरा घेतला. त्या आधी वसुंधरा राजेबाईंचे चिरंजीव, स्वराजबाईंचे पती आणि कन्या यांना त्यांनी चांगले उपकृत केले होते. तेव्हा ब्रिटनस्थित मोदी यांना पत्नीच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी पोर्तुगाल येथे जावयाची वेळ आली असता आवश्यक तो परवाना मिळावा यासाठी स्वराजबाईंनी नियमांना वळसा घालून मदत केली. आपले पती आणि कन्येसाठी ललित मोदी यांनी जे काही द्रव्यादी खर्च केले त्याची परतफेड म्हणून स्वराजबाईंनी असे केले हे उघडच आहे. कायद्याच्या नजरेतून पाहता जे काही झाले तो गुन्हा नाही. तेव्हा त्यांच्या कृत्याने कोणत्याही कायद्याचा, नियमाचा भंग झाला असे नाही. परंतु संकेतभंग मात्र निश्चित झाला. जो पक्ष इतरांना नीतिमत्तेचे, राष्ट्रप्रेमाचे बौद्धिक देण्याची एकही संधी सोडत नाही, त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचे हे कृत्य नतिक भ्रष्टाचारात मोडते. त्याचा बभ्रा झाल्यावर जे काही केले ते आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून केले, अशी सारवासारव स्वराजबाईंनी केली खरी. पण त्यातून पक्षाची आणि त्यांचीही जी काही अब्रू जायची ती गेलीच. तिकडे राजस्थानात वसुंधरा राजेबाईंचे चिरंजीव ललित मोदी यांचे व्यवसाय भागीदार असल्याचे उघड होते तर दिल्लीत स्वराजबाईंचे पती आणि कन्या हे मोदी यांच्या ललित रमण्यातील भागीदार ठरतात. त्यामुळे विरोधी पक्ष संतप्त असून स्वराजबाईंनी राजीनामाच द्यायला हवा, अशी त्यांची मागणी आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा याबाबतचा नतिकतेचा क्रोध हा लटका आहे असे जरी मान्य केले तरी स्वराज आणि वसुंधराबाईंच्या कृत्याने विरोधकांना या कृतककोपाची संधी दिली हे कसे नाकारणार? तेव्हा या दोघींनी, त्यातही विशेषत: स्वराजबाईंनी, राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधक आक्रमक होत असताना त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी सुषमाबाईंनी भलताच उद्योग केला.
तो म्हणजे काँग्रेस नेत्यांवर आरोप करण्याचा. कोळसा खाण घोटाळा प्रकरणातील एक मुख्य आरोपी संतोष बग्रोदिया याला परदेशी जाण्यासाठी विशेषाधिकारातून परवानगी द्यावी यासाठी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने प्रयत्न केल्याची ट्विप्पणी सुषमाबाईंनी केली. स्वत:वर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून हा त्यांचा बचाव. म्हणजे मोदी यांना परदेश प्रवासाचा विशेष परवाना देण्याचे अपकृत्य माझ्याकडून घडले असले तरी दुसऱ्या एका गुन्हेगारास असा परवाना मिळावा यासाठी काँग्रेस नेतादेखील प्रयत्न करीत होता, असा त्यांचा प्रतिवाद. या नेत्याचे नाव आपण संसदेच्या सभागृहात जाहीर करू असे स्वराजबाई म्हणाल्या. ही नतिकतेपासून घेतलेली फार मोठी फारकत. याचे कारण त्या म्हणतात तसा प्रकार खरोखरच घडला असेल तर त्या काँग्रेस नेत्याचे नाव त्यांनी तत्काळ जाहीर करावयास हवे. संसदेच्या सभागृहाचा आधार त्यासाठी घ्यायची गरजच काय? त्यांना ती गरज वाटली कारण संसदेच्या सभागृहात काहीही बोलले तरी त्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकता येत नाही. हा झाला एक मुद्दा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे तो मांडून स्वराजबाईंनी नेमके काय साधले? मी चूक केली असेल, पण काँग्रेस नेत्यांचेही चुकलेच अशा स्वरूपाचा हा युक्तिवाद. तो केल्यामुळे काँग्रेसपेक्षा सुषमाबाई लहान ठरतात. याचे साधे कारण असे नतिकानतिकाच्या मुद्दय़ांवर काँग्रेसच्या तोंडास किती आणि कोणाचे खरकटे लागले आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. ते खरकटे लागल्याचे जनतेला दिसल्यामुळेच लोकांनी त्या पक्षाला सत्ताभ्रष्ट केले. तेव्हा त्या पक्षाच्या नेत्यांशी स्वत:ची तुलना करून आपण त्या पातळीवर उतरत आहोत, हे या सुषमाबाईंना लक्षात येऊ नये यात आश्चर्य नाही. याचे कारण सध्या सर्वच्या सर्व भाजपला या रोगाने ग्रासलेले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचादेखील समावेश होतो. त्यांच्या सरकारच्या अकार्यक्षमतेविषयी टीका झाली की पंतप्रधानांचा प्रतिप्रश्न असतो: काँग्रेसच्या ६० वर्षांतील अकार्यक्षमतेबाबत का नाही बोलत? वास्तविक मतदार आपल्या मताधिकारातून त्याचवर तर बोलले आहेत. वसुंधरा राजेबाईंनी ललित मोदी यांना जमीन दिल्याचा आरोप झाला की भाजप नेत्यांचा प्रतिसवाल असतो रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन गरव्यवहाराचे काय? हे असले प्रतिप्रश्न करण्याची सवय भाजपला इतकी लागलेली आहे की ती नकळतपणे स्वपक्षीय नेत्याविरोधातच वापरली गेली. उदाहरणार्थ शांताकुमार. हे भाजपचे हिमाचल प्रदेशचे ज्येष्ठ नेते. सध्या ते अस्वस्थ आहेत विविध भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत म्हणून. त्या संदर्भात त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लिहिलेल्या पत्राची वाच्यता झाल्यावर भाजपचे अतिवाचाळ दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले: हे शांताकुमार काँग्रेसचे वीरभद्रसिंग यांच्या भ्रष्टाचाराबाबत का मौन बाळगून आहेत? म्हणजे या असल्या युक्तिवादातून आपण स्वत:लाच गोत्यात आणीत आहोत, हेदेखील न कळण्याइतके शहाणपण भाजप नेते आता दाखवताना दिसत नाहीत. याचा परिणाम म्हणून मोदी वा अन्य कोणाचेही भक्त नसलेल्या सामान्यजनांनी जर यांना विचारले की तुम्हीही त्यांच्याच.. म्हणजे काँग्रेसच्या मार्गाने निघालेले आहात काय, तर त्याचे या नेत्यांकडे काय उत्तर असेल?
या प्रश्नाचे उत्तर देण्यास ट्विटर कामी येणार नाही. अनेकांपर्यंत पोहोचता येते हे जरी त्या माध्यमाचे वैशिष्टय़ असले तरी अनेकांपर्यंत म्हणजे निश्चित कोणाहीपर्यंत नाही, असाही त्याचा अर्थ असू शकतो. याचे कारण या असल्या माध्यमांचा उपयोग तात्कालिक असतो आणि ते थेट संपर्कास पर्याय असूच शकत नाही. तेव्हा स्वराजबाईंनी हा असला ट्विटरी मार्ग टाळावा आणि भाजप नेत्यांनीही आपल्यावरील आरोपांचा चोख प्रतिवाद करावा. तो करताना भान एवढेच बाळगायचे की इतरांचे गरकृत्य हे स्वत:च्या गरकारभाराचे कारण असू शकत नाही. त्याने पाप केले, मग मी केले तर काय बिघडले हा युक्तिवाद अत्यंत फसवा असतो आणि तो करणे महत्त्वाच्या मंत्रिपदांवरील व्यक्तींना शोभत नाही. साधारणत: इयत्ता चवथीपर्यंतचे शिशू, बालवाडीच्या शिक्षकांनी दंगा केल्यावर रागे भरल्यास असा बचाव करतात. हे भान बाळगले नाही तर भाजपचे रूपांतर बालवाडीत होण्यास वेळ लागणार नाही.