बिहारमधील नितीशकुमारांसोबत असलेली सतरा वर्षांची युती संपुष्टात आल्यावर संपूर्ण रालोआचीच मोडतोड झाल्याने, नव्या बेरजेची मांडणी करण्याकरिता सरसावलेल्या भाजपला आता लोकसभेच्या आगामी निवडणुकीची गणिते जमविण्यासाठी तात्त्विक आणि वैचारिक जवळीक असलेल्या पक्षांचाच आधार उरलेला आहे. मुळात, हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपमध्येच मौनाचा मार्ग अनुसरून नरो वा भूमिकेला पसंती दिली जात असताना आणि भगव्या रंगाशी थेट नाते सांगणारे अन्य कट्टरपंथी राजकीय पक्ष शोधावेच लागतील, अशी स्थिती देशात झपाटय़ाने फैलावत असताना भगव्याशी बांधीलकी सांगणारे जे प्रादेशिक पक्ष देशात अभावानेच अस्तित्वात असलेले दिसतात, त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेचा क्रमांक पहिला आहे. शिवसेनेसोबतची भाजपची युती केवळ राजकीय नाही, तर वैचारिक पायावर बेतलेली आहे, असे भाजपचे केंद्रापासून राज्यापर्यंतचे सारे नेते वेळोवेळी, न विचारतादेखील, सांगत असले तरी या वैचारिकतेशी बांधीलकी मानणाऱ्या मतपेढीचे विभाजन होऊ नये हाच त्यामागचा राजकीय उद्देश आहे, हे सगळेच जाणतात. महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद पाहता, देशात राष्ट्रीय पक्षाचे स्थान असलेल्या भाजपला महाराष्ट्रात मात्र सेनेच्या धाकटय़ा भावंडाची भूमिका पार पाडावी लागते. सेना-भाजपमधील वैचारिक नात्यामुळे होणाऱ्या मतांच्या बेरजेच्या राजकारणातील फायद्याची गणिते मनसेमुळे बिघडल्यानंतर आता भाजपला मनसेमध्येही काही जुन्या नात्यांचे धागे दिसू लागले आहेत. राज ठाकरे हे एके काळी शिवसेनेतच होते, ते तेथून बाहेर पडले असले तरी हे जुने संबंध विसरता येणार नाहीत, असा सूर भाजपमध्ये कायम उमटू लागला आहे.  रालोआशी निष्ठावंत असलेल्या शिवसेनेशी प्रदीर्घ वैचारिक नाते असले तरी राज ठाकरे यांचा पक्ष भाजपसाठी अगदीच अस्पृश्य नाही, असे मानणारा मोठा गट भाजपमध्ये आहे. असे असले तरी मोठय़ा भावाचा मान राखण्याची संस्कृती हाच महाराष्ट्रातील भाजपसाठी युतीचा धर्म असल्यामुळे मनसेचे कोडे अवघड बनले आहे आणि हे कोडे सोडविण्यासाठी महाराष्ट्रात भाजपचे नेते परोपरीने प्रयत्नशील आहेत. शिवसेनेसोबतच्या वैचारिक नात्याचाच एखादा सूक्ष्म धागा मनसेमध्येही शोधून आणि तोच धागा पकडून हे कोडे सोडविण्याचे प्रयत्न भाजपच्या प्रादेशिक नेत्यांनी केव्हापासूनच सुरू केले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाने रालोआची साथ सोडून अचानक धर्मनिरपेक्षतेचा डंका वाजविण्यास सुरुवात केल्याने, नैसर्गिक मैत्रीच्या अध्यायांचे पठण करीत सेनेसोबतचे संबंध फार ताणले जाणार नाहीत याची काळजी घेणे भाजपसाठी अपरिहार्य झाले आहे आणि नेमकी हीच बाब भाजपसाठी कसरतीची ठरणार आहे. मतांची गणिते जुळविण्यासाठी मनसेची साथ हवी आणि दुसरीकडे शिवसेनेशी असलेले जुने नातेही जपायचे, असा दुहेरी पेच महाराष्ट्रातील भाजपसमोर उभा ठाकला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मंगळवारी मुंबई-भेटीतील सारे नियोजित कार्यक्रम संपवून रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि सेना-भाजपच्या वैचारिक नात्याला आदरपूर्वक उजाळा दिला. सेनेसोबतचे प्रदीर्घ नाते अधिक दृढ करण्याची ग्वाहीदेखील भाजपध्यक्षांनी दिली. मनसेच्या मुद्दय़ावर सेनेला सांभाळून घेण्यासाठी राष्ट्रीय नेते समर्थ आहेत, या जाणिवेने भाजपचे महाराष्ट्रातील नेते आता कदाचित सुखावले असतील.