X

भुते आणि पिशाचविद्या

माझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती.

प्रगत जगात विज्ञानप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे.

माझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती. म्हणजे असे की, आम्हा मुलांना संध्याकाळी इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, इथे मुंजा आहे, तिथे काफ्री आहे, खवीस आहे, जखीण, वेताळ, हे किंवा ते भूत आहे असे त्या त्या भुताच्या नावाने आणि त्यांच्या रूपगुणाच्या भयाण वर्णनासह सांगितले जात असे. त्यामुळे गावात कुठल्या ठिकाणी कुठले भूत राहते व ते केव्हा दिसते आणि ते काय काय करते ही सर्व माहिती आम्हाला अगदी तोंडपाठ असे. गावातील आमच्या आळीच्या (गल्लीच्या) एका तत्कालीन प्रवेशाजवळ एक खारी बाव (विहीर) होती, त्या विहिरीजवळ एक जखीण राहते, ती मुलांना घाबरवते, झोंबते आणि कुणालाही असे भूत लागल्यावर (म्हणजे) भूतबाधा झाल्यावर, गावातील भगताला बोलावून त्याने त्याचे छाछूचे उपचार केल्याशिवाय ते मूळ किंवा तो माणूस बरा होत नसे, अशी माहिती आम्हाला होती.

मी सुमारे नऊ-दहा वर्षांचा असताना एकदा होळी खेळण्यासाठी एका रात्री आम्ही मुले हुतुतू, आटय़ापाटय़ा वगैरे खेळ रात्री उशिरापर्यंत खेळल्यावर, आईच्या परवानगीने, चंदू (नाव बदललेले आहे) या माझ्याहून एक-दोन वर्षे मोठा असलेल्या व गल्लीच्या त्या तोंडाच्या आसपास घर असलेल्या मित्राच्या घराच्या ओटीवर झोपण्याचे आम्ही दोघा मित्रांनी ठरविले. ओटीवर चंदू झोपला घराच्या भिंतीला समांतर आणि मी त्याच्या जवळपास बाहेरच्या बाजूला झोपलो. सकाळी उठलो तर काय? चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली हे त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली?’’ चंदू म्हणाला, ‘‘ते मला ठाऊक नाही, पण ती आली होती हे खरेच. ती जाड, विक्राळ व दागिन्यांनी मढलेली होती. तुला ओलांडून ती माझ्या अंगावर येऊन बसली आणि माझ्या छातीवर व तोंडावर बुक्के व फटके मारत राहिली. सकाळी उठल्यावर पुढे काय झाले ते सर्व तुला ठाऊक आहे.’’ या घटनेचा माझ्या परीने मी लावलेला अर्थ असा होता की, भुते असतात खरी, पण आपण त्यांना किती घाबरतो, यावर त्यांचे पराक्रम अवलंबून असावेत.

पुढे साधारण चार-पाच वर्षांनी असेल, मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की, खरी नाठाळ भयानक भुते, गावाबाहेरच्या स्मशानात असतात व ती रात्री विशेषत: काळोख्या रात्री कुणालाही सहज दिसू शकतात. या काळापर्यंत मी साधारण चौदा-पंधरा वर्षांचा झालेला असल्यामुळे मला आमच्या घराच्या बाहेरच्या ओटीवर एकटय़ाने झोपण्याची परवानगी मिळालेली होती व काही काळ मी तसा झोपत असे. त्यामुळे मी माझ्या दुसऱ्या एका ताकदवान मित्राला, नंदूला (नाव बदललेले आहे) बरोबर घेऊन रात्री स्मशानात जाऊन तिथे भुतांचा शोध घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एका काळोख्या मध्यरात्री आम्ही दोघे तिथे पोहोचलो. सगळीकडे सामसूम शांतता. स्मशानाच्या आसपास फिरलो. चौकस दृष्टीने शोध घेतला. सापडले काही नाही आणि दोन-अडीच तासांनी आम्ही घरी परत आलो; पण नंतर काय बिनसलं ठाऊक नाही. दुसऱ्या दिवशी नंदू मला म्हणाला, ‘‘शरद, मी काही तुझ्याबरोबर येणे शक्य नाही. तिथे भुतेबिते नाहीत हे मला पटते, पण फार भीती वाटते. त्यामुळे मी तुझ्याबरोबर येणार नाही.’’ झाले. दुसऱ्या दिवसापासून (रात्रीपासून) एक मजबूत काठी हातात घेऊन मी भुते शोधण्यासाठी एकटाच स्मशानात जाऊ लागलो. तो परिसर तसा ओसाड, निर्मनुष्य व भयाण होता. वाऱ्याच्या वाहण्याने वेगवेगळे आवाज ऐकू येत. प्रत्यक्षात नसलेल्या आकृत्या दूरवर आणि जवळपास वावरत आहेत असा भासही होत असे. मी स्मशानाच्या खांबावर व इतरत्र काठी आपटून, सावधगिरीने वावरून दोन-अडीच तासांनी घरी परत येऊन ओटीवर झोपत असे. या गोष्टीचा घरात आईला, वडिलांना किंवा कुणालाही सुगावा लागू देणे तर शक्यच नव्हते. तोपर्यंत मला मित्राकडून हे ज्ञान मिळाले होते की, काही इच्छा अपूर्ण राहून माणसाचा अचानक मृत्यू झाला, तर त्याचा शरीरविरहित असंतुष्ट आत्मा भूतयोनीत अस्तित्वात राहतो व तो आपल्यासारख्या जिवंत शरीरधारी माणसांना झोंबतो, त्रास देतो वगैरे. भौतिक शरीर नसलेल्या, त्या अतृप्त आत्म्यांना त्या वेळी मी काठीने कसा झोडपणार होतो ते मला आता काही आठवत नाही; पण अनेक काळोख्या रात्री स्मशानात शोध घेऊन ‘मी असल्या आत्म्याबित्म्यांना घाबरत नाही’ असा माझ्यापुरता निष्कर्ष काढून मी माझ्या तत्कालीन प्रात्यक्षिक संशोधनाला पूर्णविराम दिला एवढे आठवते.

नंतर पंधरा-वीस वर्षांनी असेल, मुंबईत ऐकलेली एक गोष्ट सांगतो. ती अशी की, वरळी नाक्याच्या दक्षिणेला जवळपास पण मेन रोडवरच एक मोठी चाळ होती. तिथे कोकणी (दक्षिण कोकणी) माणसे राहत असत व त्या चाळीत भुते आहेत अशी वदंता पसरली होती. त्यामुळे त्या गरीब कोकणी लोकांनी तिथल्या खोल्या विकल्या व इतर प्रांतीय व्यापाऱ्यांनी त्या स्वस्तात विकत घेऊन आपले व्यापारधंदे तिथे सुरू केले. त्यानंतर मात्र त्या चाळीत त्या गुजराती, राजस्थानी व्यापाऱ्यांना घाबरवायला ती भुते परत कधी दिसली नाहीत. निष्कर्ष: जो भीत नाही त्याला भुते त्रास देत नाहीत. भीती हेच भूत. असो.

असंतुष्ट आत्मे गूढ शक्तिधारी असतात व ते अदृश्य रूपात आपल्या जगात वावरतात, असे सर्वसाधारणपणे जगातील सर्व देशांमध्ये व प्राचीन काळापासून सर्वकाळी मानले जात असे व आजही अनेक लोक तसे मानतात. त्याचप्रमाणे भुतांना काही विधी, मंत्रतंत्र करून वश करून घेणे व त्यांच्या मदतीने आपली दुष्ट कामे करून घेण्याच्या विद्यासुद्धा अस्तित्वात आहेत, असेही साधारण सगळीकडे व सर्वकाळी मानले गेले आहे. काही मांत्रिक, तांत्रिक, जादूटोणा करणारे, भूत उतरवणारे लोक काही विधी, मंत्रतंत्राच्या व गूढ शक्तीच्या साहाय्याने विरोधकांना हतबल करणे, हानी पोहोचविणे, ठार मारणे अशा एरवी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकतात, असे मानले जाते व त्या विद्यांना जारणमारण, मूठ मारणे, काळी जादू, चेटूकविद्या, पिशाचविद्या व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी नावे आहेत. कधी कधी हे लोक ‘भूकंप, वादळ, महापूर, रोगराईचा प्रसार’ अशा घटनाही घडवून आणू शकतात, असा अंधश्रद्ध लोकांचा विश्वास असतो. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना मात्र या ‘पिशाचविद्या’ म्हणजे लोकांना घाबरवून ‘लुटण्याच्या कला’ वाटतात.

पाश्चात्त्य देशांमध्ये असे चेटूक करण्याचे खोटे आरोप करून अक्षरश: हजारो निरपराध स्त्रियांना जिवंत जाळण्यात आलेले आहे, हा इतिहास आहे. म्हणजे जगात सर्व ठिकाणी अशा विद्या खरेच होत्या व आहेत असे मानले गेले आहे. मात्र सर्वत्र त्यांना वाईट, तिरस्करणीय व घाणेरडय़ा विद्या असेच मानलेले आहे; पण अंधश्रद्ध लोकांना असे वाटते की, ‘जरी या विद्या तिरस्करणीय आहेत तरी अशी भुते व अशा विद्या अस्तित्वात आहेत हे मात्र खरे आहे.’

याबाबतचे सत्य हे आहे की, गूढ दुष्ट शक्तींचे अस्तित्व हेच मुळात एक धादांत असत्य आहे. जादूटोणा करणारे लोक हे साध्यासुध्या माणसांना ‘आम्हाला काही दुष्ट शक्ती अवगत आहेत, प्रसन्न आहेत’ असे खोटेच सांगून फसवणारे भगत व गुरू होत. त्यांचे खोटे व भयंकर दावे ऐकून, लोक त्यांना घाबरतात, त्यांना पैसे देऊ करतात व अशा प्रकारे जादूटोण्याचा दावा करणाऱ्यांचा स्वार्थ साधला जातो. ‘भुते खरेच असतात आणि विधी, मंत्रतंत्रात गूढ शक्ती असतात. या दोन्ही सारख्याच अंधश्रद्धा होत.’ मंत्रांविषयी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा म्हटलेले आहे की, ‘मंत्राने शत्रू मरत असेल तर तलवारीची गरजच उरणार नाही.’

आज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. भारतात मात्र आजही अशिक्षित व काही तथाकथित सुशिक्षित माणसेसुद्धा करणी, जारणमारणादी गोष्टींवर विश्वास ठेवतात. महाराष्ट्रात दिवंगत डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली सबंध राज्यभर लोकशिक्षणाचे मोठे कठीण कार्य करून, लोकमत जागृत होऊन त्यांनी सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण केल्यावर रडतखडत का होईना महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जादूटोणाविरोधी कायदा केला आहे.

जगातील सर्व धर्मानी या अघोरी परंपरा ज्यांना पिशाचविद्या मानले जाते त्यांना ‘निंद्य व गर्हणीय’ म्हटलेले आहे हे खरे आहे, परंतु कुठल्याही धर्मशास्त्राने ‘भुतेच नसतात’ व ‘पिशाचविद्यासुद्धा खऱ्या नाहीतच’ असे सांगितले नाही. त्यामुळे काही लोकांना त्या आहेत व त्या धर्मशास्त्राचाच भाग आहेत, असे वाटत राहते. खरे तर माणसाला उपयुक्त व पवित्र वाटणाऱ्या काही चांगल्या दैवी शक्तींबरोबर माणसाला अपाय करणाऱ्या काही वाईट, अपवित्र, अघोरी सैतानी शक्ती, अशा दोहोंचे अस्तित्व हे माणसाचे स्वनिर्मित ‘परस्परपूरक कल्पनारंजन’ आहे.