18 September 2020

News Flash

पंतप्रधानांचा झाकोळलेला दौरा

राहुल गांधी यांनी दोषी लोकप्रतिनिधींना अभय देणाऱ्या वटहुकुमावरून मनमोहन सरकारच्या उडविलेल्या चिंधडय़ा आणि नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान

| October 1, 2013 01:38 am

राहुल गांधी यांनी दोषी लोकप्रतिनिधींना अभय देणाऱ्या वटहुकुमावरून मनमोहन सरकारच्या उडविलेल्या चिंधडय़ा आणि नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उडविलेल्या कथित खिल्लीवरून केलेला गदारोळ यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा संयुक्त राष्ट्रांचा दौरा झाकोळला गेला. पंतप्रधान अन्य देशांच्या अधिकृत दौऱ्यावर गेल्यानंतर संपूर्ण देशाने त्यांच्या मागे एकदिलाने उभे असणे आवश्यक असते. किमान त्यांचा मानभंग होईल, असे काहीही न करण्याचे सौजन्य आणि सभ्यता, किमान त्यांच्या पक्षाने तरी दाखविणे गरजेचे असते. राहुल गांधी यांनीच त्याचे भान ठेवले नाही म्हटल्यानंतर मोदी यांच्याकडून तरी तशी अपेक्षा कशी करता येईल? हल्ली लकवा हा एक राष्ट्रीय रोग झालेला आहे. तो जसा कृतीचा असतो, तसाच तो विचारांचाही असतो आणि सर्वपक्षीयही असतो, हे यानिमित्ताने दिसून आले. मनमोहन सिंग यांचे मोठय़ाने बोलणेही पुटपुटल्यासारखे असते. तेव्हा त्यांच्या भाषणांना कोणी जोरदार वगरे विशेषण लावू धजावणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी केलेले भाषण हेही कंठाळी आणि नाटकी या अर्थाने जोरदार नव्हते. परंतु संयुक्त राष्ट्रांचे सभागृह म्हणजे शिवाजी पार्क नव्हे. अशा मंचावर, कसे म्हटले याहून काय म्हटले याला महत्त्व असते आणि त्या बाबतीत मनमोहन सिंग यांनी बाजी मारली. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे, अशी मागणी केली होती. त्याला मनमोहन सिंग यांनी सौम्यपणे दमदार प्रत्युत्तर दिले. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सांगतानाच तो प्रश्न सिमला करारानुसार सोडवायचा आहे. त्यात अन्यांचा हस्तक्षेप चालणार नाही, ही भारताची भूमिका त्यांनी ठणकावून मांडली. या भाषणाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी पाकचा दहशतवादी चेहरा नव्याने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणला. हे वारंवार करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी त्यात कोणतीही कसर सोडली नाही. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात ‘नव्या प्रारंभा’चे सूतोवाच केले होते. मनमोहन सिंग यांनी त्याचे स्वागतच केले, पण पाकच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही, याची खात्री देत असाल, तरच चच्रेतून काही प्रगती होईल, असा इशाराही दिला. हे अधिक महत्त्वाचे आहे. मनमोहन सिंग-शरीफ यांच्या यानंतर झालेल्या भेटीत, प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील परिस्थितीत सुधारण्यावर भर देण्यात आला, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानद्वेष हा ज्यांच्या राजकारणाचा पाया आहे त्यांच्यासाठी या घडामोडी म्हणजे टीकाविषयच असणार. त्याकडे फार गांभीर्याने पाहण्याचे कारण नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात विशिष्ट धोरणसातत्य ठेवावे लागते. मनमोहन सिंग यांनी तेच केले. उद्या भाजपची सत्ता आली तरी ते हेच करतील. ओबामा यांना मनापासून मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदर आहे, हे वारंवार दिसून आले आहे. त्याचा पुरेपूर लाभ सिंग यांनी या भेटीत उठवल्याचेही दिसले. सीरिया प्रश्न चच्रेतूनच सोडवावा अशी अमेरिकाविरोधी भूमिका एकीकडे त्यांनी घेतली, तर दुसरीकडे ओबामांच्या भेटीत दहशतवादाच्या मुद्दय़ावरून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची चालही त्यांनी खेळली. शरीफ संतापले ते त्यामुळेच. सध्याचे वातावरण पाहता, मनमोहन सिंग यांचे हे संयुक्त राष्ट्रांतील अखेरचे भाषण ठरावे. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा अखेरचा अमेरिका दौराही असेल. तो देशपातळीवर झाकोळला, परंतु आंतरराष्ट्रीय मंचावर मनमोहन सिंग चमकले, हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:38 am

Web Title: black visit of the prime minister
टॅग Manmohan Singh
Next Stories
1 शांततेचा साधक
2 जिणे कुणाचे, जाण कुणाला..
3 ‘शून्या’धारित बनावाला पायबंद
Just Now!
X