श्रीसद्गुरूंचं अस्तित्व असलेलं स्थान, सद्गुरूबोध जिथं जागृत आहे, असं अंतर्मन आणि एका सद्गुरूतत्त्वालाच जपण्यास अग्रक्रम देणारी गुरुबंधुत्वाची नाती; यातच खरा निवांतपणा दृष्टीस पडतो. जिथे श्रीसद्गुरूंचं अस्तित्व आणि प्रेम यालाच महत्त्व आहे, तिथं मनाला परम शांतीचा अनुभव येतो. सद्गुरू अस्तित्वाची भावना जिथं जागी असते ते स्थान आणि गुरुबंधुत्वाची नाती कशी मूकपणे मनावर संस्कार करतात, याचं फार मनोज्ञ वर्णन शांतारामबापू जामसंडेकर यांनी केलं आहे. ते लिहितात, ‘‘(स्वामी स्वरूपानंद यांचं वास्तव्य जिथं होतं त्या) अनंत निवासाची वास्तू पाहताना ते पहिले दिवस आठवतात. ज्या वास्तूत आमची सद्गुरूमाउली उणीपुरी चाळीस वर्षे वास्तव्य करून राहिली. अनेक आर्त, पिपासू, पीडितांवर तिने आपल्या अमोघ कृपेने वर्षांव केला, ती वास्तू आम्हाला एखाद्या महन्मंगल, पुण्यपावन तीर्थाप्रमाणे आहे. आमचे सद्गुरू आजही चैतन्यरूपाने वास्तव्य करून आहेत. ती. आत्ये, ती. बाबा, ती. तात्या, ती. भाऊ ही सर्व मंडळी आजही अनंत निवासाच्या वास्तूत वावरताना माझ्यासारख्याला जाणवतात. आजही अनपेक्षितपणे वाटते की, ती. भाऊंच्या सौभाग्यवती किंवा आत्ये आतून बाहेर येतील आणि म्हणतील, ‘शांतारामबापू, आज दुपारचा प्रसाद इथेच घ्या बरं का!’ असा आग्रह किती र्वष या वास्तूत आमच्यासाठी होत आला आहे हे सांगता यावयाचे नाही. या वास्तूसंदर्भात जी आपुलकी, जो जिव्हाळा, जो स्नेहाद्र्र ममत्वाचा दृष्टिकोन निर्माण झाला त्यास मुख्य अधिष्ठान आमचे सद्गुरू! सद्गुरू स्थान म्हणून ही वास्तू व या वास्तूत वास्तव्य करून असलेली मंडळी म्हणजे माझ्यासारख्यांचे पूर्वपुण्यच! स्वामीजींची येथील ज्या ज्या चल, अचल, सजीव, पार्थिव अशा विविध वस्तूंवर दृष्टी पडली आहे त्या त्या सर्वाचे सोने होऊन गेले. दैवी गुणसंपत्तीने आणि गृहस्थाश्रमातील आदर्श वस्तुपाठाने संस्कारित असलेली एक अखंड पिढी आम्ही पाहिली. देवदुर्लभ सद्गुरू समर्पित वृत्तीने जीवन जगलेली ही मंडळी काही वेगळाच ठसा उमटवून गेली आहेत.’’ (अनंत आठवणीतील ‘अनंत निवास’, पृ. ३६). सद्गुरूंचा असा सहवास ज्यांना लाभतो त्यांची स्थिती ‘भक्त तो संसारी भाग्यवंत’ अशी होतेच, पण जो त्यांच्या सहवासात नसला तरी क्षणभरही मनानं दुरावला नसतो, त्याचीही स्थिती ‘‘पाहे ज्याची दृष्टि सर्वत्र श्रीहरि। भक्त तो संसारीं भाग्यवंत।। आठवी श्रीहरी नित्य हृदंतरीं। भक्त तो संसारीं भाग्यवंत।।’’ अशीच होते. मग काय होतं? स्वामींचा जो अभंग आपण पाहात आहोत, त्यातील शेवटच्या दोन चरणांत स्वामी सांगतात, काम क्रोध लोभ निमाले संपूर्ण। झालें समाधान अनिर्वाच्य।। स्वामी म्हणे आतां बैसलों निवांत। हरिपायीं चित्त लावोनियां।। अशा भक्ताच्या अंत:करणातून विकार मावळतात, शब्दांत सांगता येत नाही, असं समाधान त्याला लाभतं आणि मग? मग तो सद्गुरूचरणांवर चित्त लावून निवांत बसतो! मग असा साधक निष्क्रिय होतो का? नव्हे! ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढची ओवी त्याबाबतच बजावते!