रवि आमले यांचा ‘‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट’ हा लेख (रविवार विशेष, ३१ ऑगस्ट) वाचला. धर्माधांच्याही आणि धर्माधांच्यामागे जाणाऱ्या लोकांच्याही डोळ्यात त्यांनी झणझणीत अंजन घातले आहे.  त्याच पानावर डॉ. कुमार सप्तर्षी तसेच चतन्य प्रेम यांचाही लेख आहे.
 ‘िहदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा, परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे. कोणतीही धर्मसंसद या धर्माचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. हे ज्यांना खटकते अशा लोकांपुढे आदर्श दिसतात ते किताबी धर्माचे.. धर्माचे अत्यंत किरटे आणि कठोर रूप समोर ठेवून त्याच्या रक्षणासाठी ही मंडळी आग्रही असतात. याच लोकांनी असहिष्णुतेचे एक वेगळेच पर्व िहदू धर्मात आणले आहे,’ असे निष्कर्ष आपण आपल्या लेखात मांडले आहेत. तसे पहिले तर गतकाळात देखील अशी संकटे आली होती. सप्तर्षी यांनी शंकराचार्याबद्दल जे लिहिले आहे तो भाग त्यातलाच म्हणता येईल. मनुस्मृतीची अंमलबजावणी होत असताना िहदू धर्माचे स्वरूप किताबी धर्माचेच होते. मनुस्मृतीमुळेच तर ज्या मुसलमानांचा िहदुत्ववादी द्वेष करतात ते भारतात येऊ शकले. खरे तर िहदुत्ववाद्यांना (खरे तर वैदिकांना) अशा किताबी धर्माच्या स्थापनेसाठी प्रथम जनतेची दिशाभूल करावी लागते, त्यासाठी कोणीतरी निमित्त असावे लागते, ते निमित्त ते कालपरत्वे बदलत असतात. कधी काळी (पेशवाईत) ते निमित्त आजचे बौद्ध होते, तर आज मुसलमान आहेत.
यात एक गोष्ट आणखी स्पष्ट करावी लागणार आहे की, या देशातील जनतेचा ‘आपला’ म्हणावा असा कोणताही धर्म नाही आणि कधीही नव्हता. एवढेच नव्हे तर जगभरात कोणत्याही भूभागातल्या जनतेचा त्यांचा ‘आपला’ म्हणावा असा धर्म नसायचा. कोणताही धर्म हा ‘आपला’ असा कोणाच्या मालकीचा नव्हता. म्हणून ‘कोटय़वधी देव, अनेक पंथ, अनेक मार्ग, विविध उपासना पद्धती यांचे संघराज्य म्हणजे िहदू धर्म आहे’ ही समन्वयी भूमिका वास्तव आणि योग्यच आहे.   किताबी बंदिस्त धर्मात आपल्याच पोळीवर जास्त तूप ओढता येईल, असे त्याचे नेतृत्व करणाऱ्यांचा कयास असतो.  किताबी धर्माने समाजाचे एक डबके होते आणि पूर्ण समाजच सडून जातो. त्यामुळेच हा समाज परकीय आक्रमणे रोखू शकला नाही. परंतु असे धार्मिक नेतृत्व करणारे इतके आंधळे झालेले असतात कीते इतिहासदेखील त्यासाठी बदलतात. येणाऱ्या या संकटापासून वाचण्यासाठी जनतेचे प्रबोधन होणे फार महत्त्वाचे आहे.
    – प्रल्हाद मिस्त्री

प्रकल्प, प्रयोग.. आणि‘मार्क्‍स’वादी शिक्षक!
शिक्षकदिनी, शिक्षण क्षेत्रातील चिंतनीय आणि चिंताजनक विषय बरेच आहेत. यापैकी एक मुद्दा येथे मांडतो. प्रकल्पांसाठी इयत्ता दहावीत तसेच बारावीच्या कला, वाणिज्य शाखेत २० गुण राखीव असतात. ते देणे विषय-शिक्षकांच्या हाती असते. मग मुलांच्या गुणांची टक्केवारी वाढवण्यासाठी, शिक्षक या गुणांची खिरापत वाटतात!    
विज्ञान शाखेत, प्रात्यक्षिक अथवा प्रयोगांची स्थितीही थोडय़ाफार फरकाने अशीच आहे. बारावीचे ३० गुण प्रात्यक्षिकांसाठी असतात. विज्ञानातील सिद्धान्त, तत्त्वे प्रयोगांमधून सप्रमाण सिद्ध होतात आणि विद्यार्थ्यांनीही नियमित प्रात्यक्षिके करणे हिताचे असते. परंतु ‘प्रयोगातून विज्ञान’ या गोष्टीवर विज्ञान-शिक्षकांचाच विश्वास राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे. बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनाही प्रात्यक्षिकांचे ३० ‘हातचे गुण’ वाटले जातात. या स्थितीस शिक्षकांसह प्राचार्य, संस्थाचालक देखील जबाबदार आहेत.  अनेक शाळा- महाविद्यालयांत प्रयोगशाळाच नाही. असतील तर प्रयोगसाहित्याची चणचण सदाचीच, विजेच्या लपंडावाचाही अनिष्ट  परिणाम, अशी स्थिती. विज्ञान शिक्षकांना आठवडय़ातून २४ तासांपैकी १२ तासांचा कार्यभार ‘प्रात्यक्षिकांसाठी’ मंजूर झालेला असूनदेखील, प्रयोगाविना गुण-वाटप मात्र सुरू राहते!
अपवाद असतात, असावेत.. पण मुद्दा सार्वत्रिक स्थितीविषयी आहे आणि केवळ गुण-दानाविषयी नसून प्रकल्प आणि प्रयोग यांकडे पाहण्याचा शिक्षकांचा दृष्टिकोन बदलावा, अशी इच्छा आहे.     
– प्रा. एन. बी. देठे, लातूर</p>

इंदिराजींनी की मोदींनी जास्त भ्रमनिरास  केला?
‘काळ्या पशांतील शंभर रुपयेही आणता आले नाहीत’ या मथळ्याखालील बातमी (४ सप्टें.) वाचली.
पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शंभर दिवसांत परदेशातून काळा पसा आणला नाही, म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले आहे. पण आम्हा भारतीय मतदारांना अशा मोहमयी स्वप्ने दाखविणाऱ्या घोषणांची सवय आहे. १९७१च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींनी दिलेली ‘गरिबी हटाव’ ही चतन्यदायी घोषणा आजही चिरतरुण आहे. अविनाशी आहे.
पृथ्वीराजजी, त्यांचे माता-पिताच नव्हे तर सर्व खानदानच इंदिरा गांधी/इंदिरा कॉँग्रेसचे निष्ठावंत. त्यामुळे त्यांना आठवतच असेल की ‘गरिबी हटाव’ या मोहमयी घोषणेस आम्ही मतदारांनी अभूतपूर्व होकारार्थी प्रतिसाद दिला. ५१८ पकी ३५२ ठिकाणी त्यांना विजय मिळाला. मोदींना मात्र ५४३ पकी २८२ जागीच विजय मिळाला नि मते फक्त ३१ टक्के. म्हणजेच इंदिराजींवर जनतेने जास्त विश्वास दाखविला. पण गरिबी हटली काय? संपली काय?
परक्या देशांतून काळा पसा शंभर दिवसांत आणण्याची घोषणा करताना तेथील कायदेकानू मोदींनी विचारात घेतलेले दिसत नाहीत. पण काही झाले तरी तो परकीय मुलूख आहे, याउलट ‘गरिबी हटवणे’ हा अंतर्गत मामला होता. त्यामुळे जास्त भ्रमनिरास कोणी केला? इंदिराजींनी की मोदींनी?
– श्रीधर गांगल, ठाणे</p>

तणावाचे निवारण व्हावे..
‘तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात’ (लोकसत्ता, २९ ऑगस्ट) ही बातमी वाचून वाईट वाटले. विरारमधील वागड गुरुकुल इंटरनॅशनल या निवासी शाळेच्या त्या तिघांनी आत्महत्या केली असेल, तर ती का केली? असा निर्णय लहान वयात कसा घेतला, हे समजणे कठीण. शिक्षण क्षेत्राने शिक्षकांमध्ये तणाव वाढवला आहे, तसा विद्यार्थ्यांचाही तणाव वाढला आहे. अनेकदा पालकही हा तणाव वाढवतात आणि स्वत:देखील तणावग्रस्त होतात, हे दिसले आहे.  
तीन अजाण विद्यार्थी जिवास मुकणे ही हानी आहेच, तशीच ती शिक्षण क्षेत्राला लज्जास्पद बाबही आहे. त्यामुळेच असे वाटते की, त्या तिघांच्या मृत्यूचा तपास करण्यावर न थांबता, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या तणावामागची कारणे शोधून ती कमी करण्याचा प्रयत्न व्हावा.
– फा. अ‍ॅलेक्स तुस्कानो, पालघर