‘राजा हा रयतेचा उपभोगशून्य स्वामी’ हे वाक्य कोणत्याही काळात, कोणत्याही भूमीवरच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवावे, असे आहे आणि राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील ‘संभाजी’च्या तोंडी ते वाक्य आहे. हे नाटक अपूर्ण असतानाच गडकरी यांचे निधन झाले. राजाने राज्याचा उपभोग न घेता प्रजेची सेवा करायची असते, हा आदर्शवत् राजकीय विचार जुना आहे आणि त्याचा शोध काही गडकरी यांनी लावलेला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे ‘रयतेचा राजा’ असल्याचा सर्वमान्य इतिहास आणि शिवरायांचे ‘श्रीमंत योगी’ असे वर्णन करणारी रामदासकृत स्फुटरचना, यांचा आधार ‘राजसंन्यास’ लिहिले जाण्याआधी किमान २०० वर्षे महाराष्ट्रातील कोणत्याही लेखकाला उपलब्ध होता आणि त्यावरून हा ‘राज्य करणे म्हणजे राज्य-उपभोग नसून राजसंन्यास’ असा अर्थही कोणीही काढू शकले असते. तो गडकरींनी काढला आणि नाटकात ते वाक्य ‘संभाजी’च्या तोंडी देताना, नाटकातील ‘संभाजी’ला आता हे आतून समजलेले आहे, असा प्रसंगही रचला. छत्रपती संभाजी महाराजांना रयतेचा राजा होण्याचे तत्त्व उमगले होते, हे सांगणाऱ्या नाटकाचे नावही त्याच तत्त्वावरून, ‘राजसंन्यास’ असे ठेवण्यात आले. मात्र, या नाटकातील प्रत्येक पात्राची काही शल्ये आहेत, काही दु:खे असली पाहिजेत, हे नाटककार म्हणून गडकरी यांनी ठरवलेले होते. त्यामुळे ‘राजसंन्यास’मधील संभाजीदेखील, राजसंन्यासाचे मर्म शिकण्यासाठी कर्तृत्ववान पित्याचा आधार न घेता, स्वत:हून काही दु:खांना सामोरा जाऊन स्वत:ची मते तयार करतो, असे दाखवण्याचा प्रयत्न या नाटकात आहे.
गडकरी यांच्या काळात (सन १८८५ ते १९१९) फेसबुक नव्हते, ट्विटर वा ई-मेल नव्हते आणि ब्लॉगदेखील नव्हते. मतस्वातंत्र्य होतेच; पण व्यक्त होणे, लोकांपर्यंत जाणे यांच्या संधी अत्यंत मर्यादित असल्यामुळे हे मतस्वातंत्र्य ही अगदी थोडय़ांचीच मक्तेदारी असणार, हे उघड आहे. महाराष्ट्रात ही मतस्वातंत्र्याची मक्तेदारी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सामान्य जनांना जाणवलीही नाही, कारण मतस्वातंत्र्य काही एखाद्याच जातीला वा वर्णाला नसते आणि ते सर्वाना असते असा विश्वास महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून मिळत होता. स्वातंत्र्योत्तर काळात ‘सार्वत्रिक मतस्वातंत्र्य’ आणि ‘बहुमताचा आदर’ यांना वाव देणारी व्यवस्था निर्माण झाली खरी; पण यापैकी ‘बहुमताचा आदर’ थेट सत्तेकडे- किंवा सत्तेच्या उपभोगाकडे- नेणारा असल्यामुळे लांगूलचालन, झुंडशाही, बौद्धिक संमोहन असा कोणताही मार्ग वापरून बहुमत= सत्ता हे समीकरण टिकवण्याकडे कल वाढला. १९६६ ते १९९३ या काळात सामूहिक हिंसेलासुद्धा ‘समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया’ ठरवणाऱ्या नेत्यांनी विरोधकांच्या मतस्वातंत्र्याची धूळधाण उडवलीच, पण सामान्य जनांना मतस्वातंत्र्याची गरजच भासू नये, असे वातावरणही तयार केले. तशाही काळात वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी मतस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे काम केलेच.
गेल्या दहा वर्षांत मतस्वातंत्र्य पुन्हा परत मिळाले आहे. त्याच वेळी ‘उत्स्फूर्त प्रतिक्रियां’चा इतिहास ताजाच आहे आणि त्या कशा मिळवायच्या असतात याची प्रात्यक्षिके पाहिलेले अनेक जण आज आहेत. अशा काळात ब्लॉगवरले मतस्वातंत्र्य आणि फेसबुक वा तत्सम स्थळांवरची ‘लोकप्रियता’ यांच्या वारूंवर स्वार होण्याची संधी सायबर कॅफेत जाण्याइतपत खर्च करू शकणाऱ्या कुणाही साक्षराला मिळते आहे आणि फेसबुकावरून झालेल्या प्रचारामुळे लोक निषेध करायला तयार झाले, रस्त्यावर उतरले, याची उदाहरणेही आहेत. तरीदेखील निव्वळ एखाद्या ब्लॉगवरच्या एखाद्या नोंदीमुळे लोक पेटून उठले, असे मराठीत झालेले नाही. हे चांगलेच आहे, असेच बऱ्याच जणांना वाटेल. पण फेसबुक वर एखाद्याने एखादे मत व्यक्त केल्यावर, अनेक लोक त्यासंदर्भात स्वत:चे मत देऊ शकतात आणि त्यात मूळ मत बाजूला पडू शकते, तसे मराठी ब्लॉगमुळे का होऊ नये? यामागे, मराठीत ब्लॉगसाहित्याला वाचकवर्ग कमी आहे, हे एकच कारण पुरेसे असू शकत नाही. ‘आपण बधिर झालो आहोत’ वगैरे विधाने खोटी पडतील, इतपत जाग अनेक ब्लॉगांवर आहे- ब्लॉगनोंदींवर विरोधी कॉमेंट, अगदी शिवीगाळ तसेच ‘सर तुमचे बरोबर आहे’ पद्धतीचे अनुयायित्व अशा सर्व छटा सापडतील, पण चर्चा पुढे नेणारे कमी! जणू काही, ब्लॉग-नोंद ही फक्त दाद देण्याजोगी किंवा तिरस्कार करण्याजोगीच गोष्ट आहे.
 दुसऱ्यांच्या मतांमुळे आपले मतस्वातंत्र्य कसाला लागते, ती संधी घेणारे आणि चर्चा पुढे नेऊ पाहणारे मराठी ब्लॉगवाचक सध्या कमी आहेत. (खुलासा : ‘मनोगत’, ‘उपक्रम’, ‘मिसळपाव’, ‘ऐसी अक्षरे’ आदी चर्चास्थळांबद्दल आपण बोलत नसून केवळ ‘एका व्यक्तीचा ब्लॉग’ म्हणून चालणाऱ्या लेखकाचे ब्लॉग पाहतो आहोत) मतस्वातंत्र्य कसाला लावण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे ओळखून त्या प्रकारे कॉमेंट देणारे वाचक कमी आहेत. स्वत:बद्दल किंवा ललित लिहिणाऱ्या ब्लॉग लेखकांना अशा प्रकारची कमतरता जाणवतही नसेल,  पण मतप्रदर्शक लिखाण (याला पर्यायी (पण गुळगुळीत) शब्द : वैचारिक लिखाण, विश्लेषणपर लिखाण..) करणाऱ्या अनेक ब्लॉगरांनाही चर्चा फक्त समविचारी ब्लॉगरांशीच होऊ शकते, असा अनुभव येत असेल- ही मर्यादा त्यांच्या लिखाणाचीच की वाचकांचीही?
‘वाचक’ ही भूमिका फक्त ग्राहकाची आहे का? आपण ब्लॉग ‘कन्झ्युम’ करतो का?
तसे असेल तर, समाजातल्या अनेक लोकांची अनेक मते- जी कधी तरी बदलली पाहिजेत असे आपल्याला वाटते, ती बदलण्याची संधी आपल्या हातात असूनही गमावतोय की आपण!
इथवरच्या मजकुरात एकाही ब्लॉगचा उल्लेख झालेला नाही. करण्याचे कारणही नव्हते. सावरकरवादी, विवेकानंदवादी, आंबेडकरवादी, सत्यशोधक, बहुजनवादी, अशा अनेक भूमिकांमधून अनेक ब्लॉगांवर मतप्रदर्शने सुरू असतात आणि ‘एक तर शिव्या, नाही तर ओव्याच. चर्चा जी काही होईल ती फार तर समविचारींशी’ हेच बहुतेक ब्लॉगांवर दिसते.
हे आजच लिहिण्याचे कारण म्हणजे राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ या नाटकातून ‘छत्रपती परिवाराची अत्यंत संतापजनक बदनामी’ केली असल्याचे सांगण्यासाठी, वि. का. राजवाडे, द. वा. पोतदार आदींविषयीच्या काही गोष्टी (कथा या अर्थाने) सांगणारी एक तुलनेने ताजी ब्लॉग-नोंद. ती जिथे आहे, त्या ब्लॉगवर २९ डिसेंबर २०१० पासून ते ४ ऑक्टोबर २०१२ पर्यंत उपलब्ध असलेल्या नोंदींची संख्या आहे १४. महिन्यातून सरासरी एक नोंदही न लिहिणाऱ्या या ब्लॉगविषयी चर्चाही कमी असावी, यात काहीही वावगे नाही. पण ‘आपलं आपल्यासाठी लिहिलंय’ अशा पद्धतीचा आणि स्वत:च्या आदरस्थानांना जपणारे असे अनेक ब्लॉग आहेत आणि मतस्वातंत्र्याच्या घोडय़ांवरून स्वारांनाही किती चौखूर उधळता येते, याची उदाहरणे अशा ब्लॉगांमुळे दिसत राहतात. अशा स्वारांच्या टापांखाली गडकरींसारखे किती जण आले असतील!  
‘वाचावे नेट-के’चा प्रस्तुत मजकूर छपाईस जाईपर्यंत राजसंन्यासविषयक नोंदीवर एकही प्रतिक्रिया- कॉमेंट- नव्हती. मतस्वातंत्र्य धसाला लागत नाही याची रुखरुख रास्त असेल; पण अनुल्लेखाने कुणाला मारायचे, याचे पक्के भान मराठी ब्लॉगवाचकांना असल्याबद्दल समाधान व्यक्त करूनच थांबले पाहिजे.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता : http://krantisinh.blogspot.in
सूचना, प्रतिक्रियांसाठी किंवा वाचलेल्या ब्लॉगांची सकारण शिफारस करण्यासाठी ई-मेल-
wachawe.netake@expressindia.com

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
rajesh tope devndra fadnavis
“एक टक्काही दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन”, राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान; जरांगे पाटलांबाबत स्पष्ट केली भूमिका!
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…